पर्यावरणाचा समतोल राखण्याचे दायित्व पार पाडा !
५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण’ दिवस म्हणून साजरा केला गेला; पण हा दिवस वर्षातून एकदाच साजरा करून उपयोग नाही, तर वर्षभर पर्यावरणाची काळजी घेतली, तरच त्याला खरा अर्थ प्राप्त होईल ! पर्यावरणाच्या प्रदूषणाची सद्यःस्थिती आणि करावयाच्या उपाययोजना यांविषयीचे विश्लेषण येथे दिले आहे.
१. पर्यावरणदिनाची प्रतिवर्षी पालटणारी घोषवाक्ये
पर्यावरणाची गुणवत्ता वाढावी; म्हणून पोषक वातावरण निर्माण करणे, हाच पर्यावरण दिन साजरा करण्यामागील प्रमुख हेतू आहे. प्रतिवर्षी पर्यावरण दिवस साजरा करतांना घोषवाक्य असते. जसे ५ जून २०११ या दिवशी भारताची प्रथमच यजमानपदी निवड झाली होती. तेव्हा ‘वन निसर्ग आपल्या सेवेसी’, असे घोषवाक्य होते. यानंतर ५ जून २०१८ या दिवशी भारताची पुन्हा यजमानपदी निवड झाली, तेव्हा ‘प्लास्टिक प्रदूषणाशी संघर्ष’, असे घोषवाक्य होते. यंदाचा पर्यावरण दिवस कोलंबियात साजरा झाला, त्या वेळी ‘जैवविविधता’ हे आपले घोषवाक्य होते.
२. जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना
वर्ष २०२४ च्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना भूमी पुनर्स्थापना, वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिबंध अशी आहे.
अ. भूमीच्या पुनर्स्थापनेत जंगल क्षेत्र वाढवणे, मातीची धूप रोखणे, शाश्वत शेतीच्या पद्धतीचा अवलंब करणे आणि नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करणे यांसारख्या उपाययोजना येतात.
आ. वाढत्या वाळवंटीकरणामुळे पाण्याचा अभाव आणि हवामान पालटाचा धोका वाढण्याची शक्यता असते.
इ. दुष्काळ ही गंभीर समस्या आहे. वाढते तापमान, अनियमित पाऊस यांमुळे दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. शेती उत्पादन न्यून होणे आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणे या गोष्टी संभावतात.
३. प्रदूषणाचे विविध प्रकार
३ अ. वायूप्रदूषण : कारखान्यांमध्ये निर्मिती प्रक्रियेतून वायू, धूर निर्माण होतो. हा वायू आरोग्यासाठी हानीकारक असतोच; पण त्यातून सभोवतालचे वातावरण दूषित होते. वाहनांची वाढती संख्या, जुनी वाहने, वेळीच सर्व्हिसिंग न होणारी वाहने यांमुळेही प्रदूषण होते. प्रदूषण नियंत्रण मंडळ असतांनाही असे होणे यात काहीतरी त्रुटी आहेत.
३ आ. ध्वनीप्रदूषण : ध्वनीप्रदूषणात कारखान्यातील यंत्रांचे आवाज, वाहनांचे कर्कश हॉर्न, सायलेन्सरविना चालणारी वाहने, कर्कश डी.जे. हे आवाजास कारणीभूत ठरतात.
३ इ. जलप्रदूषण : कारखान्यातील निर्मिती प्रक्रियेतून निर्माण होणारे रसायनमिश्रित दूषित पाणी नद्या-नाल्यांत सोडले जाते. असे प्रदूषित पाणी पिऊन जनावरे मृत्यूमुखी पडतात. मोठ्या शहरांत सांडपाण्याची विल्हेवाट व्यवस्थित केली जात नाही.
३ ई. प्लास्टिक प्रदूषण : प्लास्टिकचा कचरा, जुनी इलेक्ट्रिक उपकरणे फेकून दिली जातात; पण ती नष्ट होत नाहीत. प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी येऊनही त्यांचा सर्रास वापर चालू आहे. प्लास्टिक खाऊन सहस्रो जनावरे मृत्यूमुखी पडतात. रस्त्यावर अनेक दिवस पडलेल्या कचर्यातून विषारी वायूची निर्मिती होते.
४. पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी काय करावे ?
४ अ. वृक्षलागवड करावी ! : प्रदूषणामुळे वातावरणात पालट होऊन पर्यावरणीय समतोल ढासळतो. मोठ्या प्रमाणात होणार्या वृक्षतोडीमुळे ऑक्सिजनचे प्रमाण न्यून होत आहे. प्रत्येकाने एक रोप लावण्याचा आणि त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प करायला हवा.
४ आ. अभियान गांभीर्याने राबवावे ! : पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. त्याला आपणच पायबंद घालायला हवा. पर्यावरणाशी संबंधित अभियान ठिकठिकाणी राबवले जाते; पण ते आणखी गांभीर्याने राबवायला हवे. अजूनही बाजारपेठेत प्लास्टिकच्या पिशव्या सापडतात, रस्त्यावर थुंकणार्यांचे प्रमाणात न्यून होत नाही. प्रदूषण नियंत्रण महामंडळ, ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका यांनी त्यांचे कर्तव्य आणि दायित्व आत्मीयतेने पार पाडायला हवे. वेळप्रसंगी दंडात्मक कारवाई करावी.
४ इ. निसर्गाची काळजी घ्यावी ! : प्रत्येक दिवशी आपण निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. ‘आपण सारे वसुंधरेचे सेवक आहोत’, याचे भान ठेवायला हवे. आपण कितीही प्रगती केली, तरी निसर्गाची शक्ती अफाट आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण, पर्यावरणस्नेही म्हणून जगण्याचा संकल्प करायला हवा. पर्यावरणाचा समतोल राखणे, हे सामूहिक दायित्व आणि कर्तव्यही आहे.
– श्री. दिलीप देशपांडे, जळगाव