पुरंदर येथील विमानतळ मूळ जागेवरच उभारणार !
पुणे – पुरंदर येथील प्रस्तावित मूळ जागेवरच आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याच्या प्रस्तावाला नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) संमती दिली आहे. त्यामुळे राज्य सरकार भूसंपादनाला गती देईल अशी माहिती नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या वार्तालापात ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना राज्य सरकारने या विमानतळासाठी पुरंदर येथील जागा निश्चित केली होती. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एम्.ए.डी.सी.) या प्रस्तावाला केंद्रीय नागरी वाहतूक मंत्रालयानेही संमती दिली होती; मात्र महाविकास आघाडीच्या सरकारने नव्या जागेवरील विमानतळाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला.
राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आल्याने मूळ जागेवरील विमानतळाचा प्रस्ताव नव्याने केंद्राकडे पाठवला असून या जागेला संरक्षण मंत्रालया पाठोपाठ ‘डीजीसीए’ने ही संमती दिली आहे. त्यामुळे राज्यशासनाच्या वतीने भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती दिली जाईल, असेही मोहोळ यांनी सांगितले. सहकाराला बळकटी देत आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशातून लवकरच नवे राष्ट्रीय सहकार धोरण निश्चित करण्यात येणार आहे. वैकुंठ मेहता सहकारी संस्थेमध्ये सहकार विद्यापीठ साकारण्याच्या प्रस्तावालाही चालना देण्यात येईल, असे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले.