विदेशात हिंदूंची दु:स्थिती आणि वाढते धर्मांतर !
२४ जून २०२४ या दिवशीपासून श्री रामनाथ देवस्थान, गोवा येथे चालू होत असलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या निमित्ताने…
श्री. अजय सिंह यांचा परिचय
श्री. अजय सिंह हे ‘वर्ल्ड हिंदु फेडरेशन’चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ‘वर्ल्ड हिंदु फेडरेशन’ जगातील ४५ देशांमध्ये कार्यरत आहे. ही फेडरेशन युरोप, ऑस्ट्रेलिया आणि आशिया खंडांच्या विविध देशांमध्ये सनातन धर्मप्रचाराचे कार्य करते, तसेच ती हिंदु धर्मावर होणार्या आघातांच्या विरोधात कार्य करण्याचे महत्त्वाचे योगदान देत आहे. ‘जागतिक स्तरावर हिंदूंचे उच्चाटन’ (डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व) या हिंदुविरोधी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा त्यांनी कडाडून विरोध केला होता. वाराणसीमध्ये ‘हलाल जिहाद’विषयी जागृती करण्यासाठी ते सभांचे आयोजन करतात.
१. ‘हिंदु धर्म, ही जीवन जगण्याची पद्धत’, ही संकल्पना हानीकारक !
आपल्याकडे ‘हिंदु ही जीवन जगण्याची पद्धत आहे’, असे काही जण म्हणतात. काही वेळा ही संकल्पना आपल्यासाठी हानीकारक ठरते. संपूर्ण युरोपमध्ये हिंदु धर्माला ‘धर्म’ समजत नाहीत. युरोपमधील केवळ एक किंवा दोन देशांनी हिंदु धर्माला मान्यता दिली आहे. त्यांनी ‘हिंदु’ हा शब्द ‘जीवन जगण्याची पद्धत’, असा घेतला आहे. त्यामुळे तेथे कोणत्याही हिंदु शाळेची नोंदणी झाली नाही. तेथील सरकारकडून आपल्याला कसल्याही सवलती मिळत नाहीत. आपल्या एकाही हिंदु मंदिराची नोंदणी होत नाही. त्यामुळे काही वेळा ही संकल्पना फार हानीकारक ठरते. आपण व्यापक विचारसरणीचे अवश्य असले पाहिजे; परंतु एवढ्याही व्यापक विचारसरणीचे असू नये, जेणेकरून आपलीच हानी होईल.
२. रामजन्मभूमी आंदोलनात सहभाग
मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये बाल स्वयंसेवक होतो. त्यानंतर वर्ष १९८५ पासून मी विश्व हिंदु परिषदेच्या रामजन्मभूमी आंदोलनात सहभाग घेतला. मी दिवंगत अशोक सिंघल, आचार्य राजकिशोर, डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्यासह इतर सर्व लोकांसमवेत कार्य केले आहे. आम्ही १० वर्षे सतत अयोध्येत राहिलो. ते एक प्रकारे महाभारत होते. त्या काळात अध्यात्माचे तेज काय असते, हे मी पाहिले आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रमाणेच श्री. अशोक सिंघल यांच्यामध्येही अध्यात्माचे तेज होते. त्यांच्यामध्ये एवढी शक्ती होती की, त्यांनी आवाहन केल्यानंतर लक्षावधी लोक गोळा होत असत. ३ डिसेंबर या दिवशी अयोध्येत अनुमाने ५ लाख रामभक्त एकत्र आले होते. आम्ही लोक त्यांची व्यवस्था पहात होतो. ५ लाख लोक लहानशा अयोध्येत कसे रहाणार, त्यांचे भोजन, पाणी, येण्या-जाण्याची व्यवस्था कशी होणार ? याची आम्हाला चिंता होती; परंतु ते सर्व ईश्वरीय कार्य असल्याने सर्व पार पडले. त्यामुळे अयोध्येत बाबरी ढासळण्याचे जे ऐतिहासिक कार्य झाले, त्याविषयी कुणीही अहं बाळगण्याची आवश्यकता नाही. ईश्वरानेच त्याच्या नियोजनाप्रमाणे बाबरीला नष्ट केले. एकेकाळी बर्लिनची भिंत उभी राहिली होती; पण कालांतराने तीही पाडली गेली. आता दोन्ही जर्मनीचे एकत्रीकरण झाले आहे आणि लोक एकेक वीट उचलून निघून गेले आहेत. त्याच प्रकारे रामभक्त बाबरीची एकेक वीट उचलून घेऊन गेले आहेत. आता तिचे संपूर्ण अस्तित्व नष्ट झाले आहे.
३. नेपाळमधील माओवादी सरकारमुळे भारत आणि नेपाळ यांच्यात वितुष्ट
महंत अभयनाथ हे रामजन्मभूमी आंदोलनाचे अध्यक्ष होते. त्यांच्याशी माझे फार चांगले संबंध होते. मी त्या वेळी विश्व हिंदु महासंघात आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष होतो आणि कृृष्ण गोपाल टंडन हे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष होते. डॉ. जोगेंद्र झा हेही होते. नेपाळमध्ये माओवाद्यांचे सरकार होते. माओवादाने भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध एकदम वाईट करून टाकले. अजूनही त्याचा पुष्कळ परिणाम दिसून येतो. नेपाळच्या महाराजांच्या काळात कुणाचेही धर्मांतर करण्याचे धाडस होत नव्हते. आज उघडपणे जगभरातील ८० संस्था गिधाडासारख्या एकत्र आल्या आहेत आणि त्या हिंदुत्वाचे अक्षरशः लचके तोडून खात आहेत. त्याविरोधात आम्ही लढत आहोत. नेपाळचे राजकारणी तज्ञ, विद्वान, पत्रकार आणि भारतातील ‘सृजन फोरम’चे कार्यकर्ते यांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न आहे. कोणतेही आंदोलन काही वर्षे चालू शकते; परंतु आपल्या किल्ल्याला भेदून जे लोक येत आहेत, त्यांच्यापासून हिंदु धर्माचे रक्षण करण्यासाठी आपल्याला एक साखळी बनवली पाहिजे.
४. जगातील विविध देशांमध्ये हिंदुत्वाचे कार्य करणारे हिंदुत्वनिष्ठ
आपण सर्व हिंदु संघटना आणि हिंदुत्वनिष्ठ यांना एकत्र केले पाहिजे. आपण आपला किल्ला एवढा बळकट करू की, आपल्या धर्माला उद्ध्वस्त करण्यासाठी आलेल्या शत्रूच्या सैन्याला आपण चांगले प्रत्युत्तर देऊ शकू. आताही मी ४५ देशांमध्ये कार्य करत आहे. आमचे संघटन भारत, नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, भूतान, म्यानमार, थायलंड, सिंगापूर, कंबोडिया, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, फिजी, पापुआ न्यू गिनी याठिकाणी आहे. त्यानंतर आपले काही लोक मॉरिशस, दक्षिण आफ्रिका, झिंबाब्वे, जांबिया, घाना येथे हिंदुत्व वाढवण्याचे कार्य करतात. तेथे स्वामी घनानंद यांनी हिंदुत्वाचा प्रसार केला. त्याच प्रकारे गयानामध्ये स्वामी अक्षरानंद यांनी हिंदुत्वासाठी फार मोठे कार्य केले आहे. त्यांनी तेथे पुष्कळ मंदिरे बांधली असून अनेक शिष्य निर्माण केले आहेत. तेथील कृष्णवर्णीय लोक हिंदुत्वासाठी कार्य करतात आणि भजन गातात. त्याच प्रकारे त्रिनिनाद आणि टोबॅगो येथेही सत्महाराज यांनी पुष्कळ कार्य केले आहे. त्यांनी तेथे हिंदु धर्मासाठी विश्वविद्यालय उघडले, धर्मशाळा उघडल्या आणि शाळा चालू केल्या. त्याचप्रमाणे मॉरिशसमध्ये आपले धनदेव बहादूर, विजय मधु मुनसी, प्रेम बुझावल, माजी प्रधानमंत्री नवीनचंद्र रामगुलाम, सध्याच्या पंतप्रधानांचे वडील अनिरुद्ध जगन्नाथ, अनिल बेचोजी यांच्याशी आमचे पुष्कळ चांगले संबंध आहेत. हिंदुत्वासाठी कार्य करणार्या सर्वांचे मॉरीशसमध्ये एक घर झाले आहे.
५. बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंना राजकीय बळ देण्याची आवश्यकता !
बांगलादेशमध्ये हिंदूंना गुलामासारखे रहावे लागत आहे. तेथील हिंदू शक्तीहीन आणि भयभीत झाले आहेत. त्यांना बळ देण्याची आवश्यकता आहे. त्यांना मानसिक आणि शारीरिक बळ दिले पाहिजे. त्याहूनही त्यांना राजकीय बळ देणे आवश्यक आहे. तेथे हिंदूंच्या अनुमाने २०० संघटना आहेत; परंतु त्या त्यांचा त्यांचा राग आळवत आहेत, ही मोठी समस्या आहे. त्यातही आपल्याच लोकांना फितुर करून बांगलादेशाचे सरकार त्यांच्याकडून हेरगिरी करून घेत आहे. बांगलादेशात हिंदूंची दूरवस्था आहे; पण तेथे सरकारी स्तरावर अद्याप एकही अल्पसंख्यांक आयोग (मायनॉरिटी कमिशन) बनवण्यात आला नाही. तेथे हिंदूंना ‘तुम्हीच तुमचे रक्षण करा’, अशी स्थिती आहे. याउलट भारत सरकारने रोहिंग्यांच्या पुनर्वसनासाठी संपूर्ण प्रयत्न केले. बांगलादेशात प्रत्येक सप्ताहात एक मंदिर तोडले जाते, हिंदूंची भूमी बलपूर्वक बळकावली जात आहे. त्यांच्या घरावर ताबा घेतला जातो. हिंदु मुली आणि महिला यांच्यावर बलात्कार होत आहेत. या सर्व गोष्टी थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्रे काही करतील, याची शाश्वती राहिलेली नाही. ते युक्रेन आणि रशिया यांचे युद्धही थांबवू शकले नाहीत. भारताने म्यानमार सरकारशी बोलणी करून त्यांना भूमी द्यायला लावली. रोहिंग्यांना रोजगार, भूमी, घर कसे मिळेल, यासाठी भारत सरकारने प्रयत्न केले.
त्याचप्रमाणे बांगलादेशातील हिंदूंवरील अन्याय दूर करण्यासाठी भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी राजनैतिक स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक आहे. मानवाधिकार समिती आपल्यासारख्या साध्या सरळ हिंदु संघटनांवर चाबूक ओढते; पण त्यांच्यापैकी कुणाचेही मुसलमानांवर चाबूक ओढण्याचे धाडस नाही. जो अन्याय सहन करत आला आहे तो हिंदु ! त्याच्या रक्षणाचा कुणी वाली नाही. जगात ५६ मुसलमान आणि ३२ ख्रिस्ती देश आहेत; पण हिंदूंचा भारत हा एकच देश आहे. त्याला दडपण्याचे सर्वांचे प्रयत्न आहेत. त्याविरोधात आपल्याला लढण्यासाठी सिद्ध व्हावे लागेल.
६. इंडोनेशियामध्ये हिंदूंच्या लोकसंख्येत वाढ
इंडोनेशियाचा बाली एक प्रांत आहे. तेथे बहुसंख्येने हिंदू रहातात. वर्ष १९९२ मध्ये बालीची लोकसंख्या ९० लाख होती. आजच्या घडीला तेथील लोकसंख्या १ कोटी १० लाखांहून अधिक आहे. जेव्हा जेव्हा मी बाली येथे जातो, तेव्हा मला पुष्कळ आनंद होतो. तेथे मी वर्ष १९९२ पासून जात आहे. सर्वांत मोठ्या मुसलमान राष्ट्रामध्ये जर हिंदूंची लोकसंख्या वाढत असेल, तर तो देश इंडोनेशिया आहे. मॉरिशसमध्ये हिंदूंची लोकसंख्या ५२ टक्के होती, जी आता ४० टक्के झाली आहे.
७. युरोपातील ख्रिस्त्यांचे मानसिक हिंदुकरण करणे शक्य !
युरोपमध्ये हिंदु धर्माविषयी कुणालाही फार माहिती दिली जात नाही. तेथे एकेकाळी हिंदूंची लोकसंख्या ४५ टक्के होती. आज मुसलमानांची लोकसंख्या ३२ टक्के झाली आहे. युरोपीय देशांमध्ये एखादी ख्रिस्ती व्यक्ती हिंदु धर्माकडे वळली, तर तिला तिच्या पंथियांकडून लगेच धमक्या मिळणे चालू होते. त्यामुळे ती व्यक्ती हिंदु बनण्याचे टाळते. युरोपमध्ये ख्रिश्चानिटीने लोकांचे मन भरले आहे. तेथील नवयुवक स्वत:ला ख्रिस्ती समजत नाही; पण त्याला हिंदु बनवले गेले नाही. त्यांना हिंदु धर्माविषयी सांगता येईल, अशी आपल्याकडे कोणतीही संधी नाही. तेथील सरकार त्यांच्या लोकांना हिंदु बनवू देणार नाही. त्यामुळे आपल्याला वेगळी रणनीती बनवावी लागेल. युरोपमध्ये आपण ख्रिस्त्यांना हिंदु बनवू शकत नाही; पण त्यांना मानसिकरित्या हिंदु बनवू शकतो. त्याचे नाव ख्रिस्ती असले तरी चालेल; पण तो आतून हिंदु झालेला असेल. आज याचीच अधिक आवश्यकता आहे. त्यामुळे आपल्याला त्यांना मानसिक रूपाने हिंदु बनवता येईल. आपल्याला नवीन परिवर्तनासह चालावे लागेल. विदेशात हिंदूंसाठी काम करणार्या सर्व संस्था एक दुसर्याचे हात पकडून आहेत. आपली फळी बळकट करणे आवश्यक आहे. आमचे त्यांना निर्वाणीचे सांगणे आहे, ‘आम्ही तुमच्या कोणत्याही व्यक्तीला हिंदु बनवायला जात नाही; पण तुम्ही आमच्या घरात येऊन हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही तुम्हाला उत्तर देऊ.’
– श्री. अजय सिंह, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, वर्ल्ड हिंदु फेडरेशन.