सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सत्संगात केलेले अमूल्य मार्गदर्शन !
‘एकदा मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन येथे दिले आहे.
१. अध्यात्म बुद्धीने शिकायचा विषय नसून आपण जे शिकतो, ते कृतीत आणायचे असते !
श्री. आशिष जोशी : मी २ वर्षांपूर्वी रामनाथी आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी आलो होतो. तेव्हा माझ्या मनात विचारांचे प्रमाण पुष्कळ होते. मी प्रक्रिया पूर्ण करून मिरज आश्रमात परत गेल्यानंतर माझ्या मनातील विचारांचे प्रमाण अल्प झाले. या वेळी मला प्रक्रियेमध्ये ‘तेव्हा जे शिकलो होतो, ते कृतीत कसे आणायचे?’, हे शिकायला मिळत आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : अध्यात्म हा बुद्धीने शिकायचा विषय नाही. आपण जे शिकतो, ते कृतीत आणायचे असते. छान !
श्री. आशिष जोशी : मी यापूर्वी प्रक्रिया राबवतांना मला ‘प्रक्रिया करतांना आनंद मिळतो’, असे वाटत असे. या वेळी येथे आल्यावर मला त्यातील आणखी बारकावे लक्षात येऊ लागले. ‘माझ्याकडून कोणत्या अयोग्य कृती झाल्या ?’, याचा अभ्यास झाल्यावर आधीच्या तुलनेत मला आता पुष्कळ आनंद मिळत आहे. मला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी रामनाथी आश्रमात येण्याचा निरोप मिळाल्यावर ‘माझ्याकडून काही चुका झाल्या का ?’, असे वाटून मला काही क्षण ताण आला; पण येथे आल्यानंतर ‘देव मला आता पुढच्या टप्प्याचे शिकवत आहे’, असे मला जाणवले आणि त्यातून पुष्कळ आनंद मिळू लागला.
संतांचा आधार महत्त्वाचा असतो !
श्री. आशिष जोशी : मिरज आश्रमात पू. आबाही (सनातनचे ५१ वे (समष्टी) संत पू. जयराम जोशी, वय ८६ वर्षे) आहेत. त्यांचेही मला साहाय्य होते. त्यांची प्रकृती ठीक नसते. आमचा एकाच मजल्यावर निवास असल्यामुळे प्रतिदिन आमची भेट होते. ते माझ्याशी बोलतात आणि माझी विचारपूस करतात. मिरज आश्रमातील साधकांना त्यांचा मोठा आधार आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : संत रुग्णाईत असले, तरी त्यांचा किती आधार असतो ना !’
श्री. आशिष जोशी : प.पू. डॉक्टर, मला मिरज आश्रमात तुमचे अस्तित्व अधिक प्रमाणात अनुभवता येते.’
– श्री. आशिष जोशी, सनातन आश्रम, मिरज.
२. रामनाथी आश्रमात येऊन साधकांमध्ये पालट होतात !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : जे शिकायला मिळाले, ते मिरज आश्रमातील साधकांना सांगायचे आहे.
श्री. आशिष जोशी : हो. पूर्वी मला मोकळेपणाने बोलायला जमत नव्हते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : आता छान जमत आहे ना ?
श्री. आशिष जोशी : हो. आता जमते. पूर्वी माझ्या मनात ‘मनमोकळेपणाने बोलायला जमेल का ? मला ते जमणारच नाही’, असे नकारात्मक विचार असत; पण आता ‘देव मला शिकवणार आहे. मी प्रयत्न करायला हवेत’, असे वाटते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : रामनाथी आश्रमात आल्यावर कसे पालट होतात, ते शिकत आहात ना ? तुम्ही जेथे जाल, तेथे ‘पालट काय झाले’, ते सांगायचे.
श्री. आशिष जोशी : मागील वेळी मला सत्संगात पुढे येऊन बोलायला सांगितले होते. त्याचा मला पुष्कळ ताण आला होता. पूर्वी मला सर्वांसमोर येऊन बोलणे किंवा ध्वनीक्षेपकावर (माईकवर) बोलणे जमत नसे. मला सर्वांसमोर उभे राहून ‘काय बोलायचे ?’, ते सुचत नसे. तेव्हा मी बोललो होतो. तो प्रसंग अजूनही माझ्या डोळ्यांसमोर येतो.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : आता तुम्ही सगळ्यांसमोर बोलत आहात, हा प्रसंग आठवा.
श्री. आशिष जोशी : पूर्वी ‘मला जे जमत नाही, ते करायला नको’, असे वाटत असे; पण आता तसा विचार होत नाही. आता ‘मला जेवढे जमते, तेवढे करूया. जे चांगले-वाईट होणार असेल, ते देवाच्या हातात’, असा माझा विचार असतो.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हे सगळे लिहून द्या. तुमच्या विचारांत टप्प्याटप्याने कसा पालट झाला, ते लिहून द्या. त्यातून इतरांना पुष्कळ शिकायला मिळेल.
– श्री. आशिष जोशी, सनातन आश्रम, मिरज.