भारतीय संस्कृतीतील कुटुंबजीवन !
पू. प्रा. सु.ग. शेवडे यांनी लेखन केलेली ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !
‘दुसर्याची वस्तू ही आपली नाही. त्यामुळे ती आपण संमती न घेता उचलून आणणे, ही चोरी आहे. दारू पिणे निषिद्ध आहे. आई-वडिलांचा आदर करावा, मोठ्या माणसांचा मान राखावा, देव आपल्यावर नित्य लक्ष ठेवून असतो; म्हणून ‘त्याला आवडेल’, असेच वागावे. देवाला न आवडणारे कर्म म्हणजे पाप, तर परोपकार हे पुण्यकर्म आहे, कर्तव्य पार पाडणे, हे पुण्यकर्म नाही. ते आवश्यक कर्म आहे’, या विचारांना आदर्श मानणे, सहस्रो वर्षांपासून आदर्श मानत रहाणे, हे भारतीय संस्कृतीचे लक्षण आहे.
It is better to light a candle than curse the darkness (म्हणजेच अंधार अंधार म्हणून रडत रहाण्यापेक्षा निदान एक तरी दिवा प्रथम लावावा, हे बरे) या विचाराने ‘भारतीय संस्कृती’ हे छोटेसे पुस्तक आमच्या नव्या पिढीला भारतीय संस्कृतीची तोंडओळख व्हावी; म्हणूनच लिहून प्रकाशित करत आहोत. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘भारतीय संस्कृतीतील व्यक्तीजीवन, विविध प्रकारची बंधने अन् प्रकार, चतुर्विध आश्रम, विवाह आणि जन्म-मृत्यू हे कुटुंबात येण्या-जाण्याचे मार्ग आणि सर्वांना सामावून घेणार्या एकत्र कुटुंबपद्धतीचे लाभ’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत. (लेखांक ५)
लेखांक ४. वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org marathi/804112.html
प्रकरण २
६. विभक्त कुटुंबपद्धतीचे दुष्परिणाम
६ इ. वृद्धांचा प्रश्न : सगळीच मुले जर स्वतंत्र राहिली, तर अर्थात् आई-वडिलांना सुद्धा स्वतंत्रच रहावे लागते. त्यांना वार्धक्याच्या वयात आधाराची आवश्यकता असते. नव्या आत्मकेंद्रित वृत्तीने आई-वडीलसुद्धा नकोसे झाले आहेत. मग ‘माझ्याकडेच का ?’, प्रत्येकाकडे ते थोडे थोडे दिवस रहातील ‘किंवा’ त्यांनी हवे तेथे रहावे, आम्ही हवे तर पैसे देऊ !’, असे अनेक विचार पुढे येऊ लागतात. ज्यांनी आपले कोडकौतुक करून आपल्याला लहानाचे मोठे केले. आपल्यासाठी खस्ता खाल्या, तेच आपल्याला नकोसे व्हावे ? शेवटी वृद्धाश्रम हाच उपाय ! तेथे सुद्धा हालच ! असो.
६ ई. घटस्फोट : स्वभाव जुळत नाहीत; मग घ्या घटस्फोट ! पण मग मुलांचे काय ? त्यांचे पालनपोषण कुणी करायचे ? आईने कि बापाने ? त्यांच्या मनावर जे विकृत परिणाम आपण केले, त्याचे काय ? त्यांच्यासमोर होणारी भांडणे, शिवीगाळ, मारामार्या ! कुणाचे हे दायित्व ? इतके करून पुन्हा दुसरे लग्न ! पुन्हा नवा संसार ! पुन्हा नवी जुळवाजुळव ! नव्या समस्या ! आणि तेथेही पटेल कशावरून ?
६ उ. नैतिक समस्या : विभक्त कुटुंबातील नोकरी करणार्यांचा नोकरीच्या ठिकाणी अन्य अनेक व्यक्तींशी परिचय होतो. संपर्क येतो. त्यातून कुणी कुणी विशेष जवळ येतात. त्यातूनच काही अनैतिक गोष्टींचा जन्म होऊ शकतो. यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही. तीच गत नोकरीमुळे घरापासून १०-१० घंटे दूर रहावे लागण्यामुळेही होते. या सर्वांचा परिणाम, म्हणजे कौटुंबिक जीवनातील शुद्धता गढूळ होतेे.
‘लेकी’ हा पाश्चात्त्य लेखक लिहितो –
Family is the centre and the archetype of the state and the happiness and the goodness of the society depends on the purity of the domestic life.
ही ‘डोमॅस्टिक लाईफ’ची प्युरिटी (शुद्धता) जर समाप्त झाली, तर सोसायटीचा ‘हॅपिनेस’ (समाजाचा आनंद) आणि ‘गुडनेस’ (भलेपणा) लयाला गेल्याविना कसा राहील ? थोडक्यात म्हणजे कौटुंबिक जीवनातील सोज्वळ, शुद्ध आणि पवित्र प्रेम ज्या समाजातील सर्व कुटुंबांत असेल, तो समाज सुखी आणि चांगला असेल, यात शंका नाही !
७. वैदिक भारतीय संस्कृतीची विशेष शिकवण !
भारतीय संस्कृतीत गृहस्थाश्रमाला अनन्यसाधारण महत्त्व आहे; कारण हा आश्रम अन्य आश्रमांचा आधार आहे. ब्रह्मचर्याश्रमातील आई-वडिलांच्या गृहस्थाश्रमातच लहानाची मोठी होतात. वृद्ध वानप्रस्थी, तरुण गृहस्थाश्रमीच्याच आश्रयाने राहतात. चतुर्थाश्रमी संन्यासी भिक्षावृत्तीने, निःस्वार्थबुद्धीने समाज, ईश्वर आणि धर्म यांची सेवा करतात. त्यांचेही उदरभरण गृहस्थाश्रमीच्या आश्रयावर होते. मग, मी आणि माझी मुले एवढाच विचार कुटुंब म्हणून करून कसे चालेल ?, म्हणून वैदिक भारतीय संस्कृतीची विशेष शिकवण अशी आहे की,
ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् ।
तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद़् धनम् ॥
– ईशावास्योपनिषद़्, श्लोक १
अर्थ : ‘जगातील सर्व जीवन ईश्वराने व्यापलेले आहे. कर्ता करविता तोच आहे’, या भावाने स्वतःच्या कर्तेपणाचा त्याग करून, मनुष्याने जीवनातील यथाप्राप्त भोग भोगीत जावे. कुणाच्याही धनाविषयी आसक्ती बाळगू नये. याचाच अर्थ सारे जग ईश्वराने व्यापलेले आहे. त्याचा उपभोग तू त्यागबुद्धीने घे. दुसर्याचे धन लुबाडण्याची बुद्धी ठेवू नकोस.’
(क्रमशः)
– भारताचार्य, धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.
(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)