रुग्णाईत असतांनाही आनंदी आणि गुरुदेवांच्या सतत अनुसंधानात असणार्या सनातनच्या ४८ व्या (व्यष्टी) संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी !
‘फोंडा, गोवा येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. श्रिया राजंदेकर (वय १३ वर्षे) हिला पू. निर्मला दातेआजी यांच्याविषयी जाणवलेली आणि शिकायला मिळालेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.
१. ‘नामजपाचे विस्मरण होऊ नये’, यासाठी योजलेली युक्ती !
‘बर्याच वेळा पू. दातेआजी वैखरीतून नामजप करतात. ‘नामजपाचे विस्मरण होऊ नये’, यासाठी त्या जो नामजप करायचा आहे, तो त्यांच्या हातावर लिहून घेतात.
२. शारीरिक त्रास होत असतांनाही आनंदी राहून अखंड नामजप करणे
मागील काही दिवसांपासून पू. दातेआजी रुग्णाईत आहेत. एकदा मी त्यांच्याकडे गेले होते, तेव्हा पुष्कळ शारीरिक त्रास होत असूनही त्या आनंदी दिसत होत्या. त्यांच्या चेहर्यावरून ‘त्या रुग्णाईत आहेत’, असे वाटतच नव्हते. या स्थितीतही त्या गुरुदेवांच्या अनुसंधानात राहून अखंड नामजप करत होत्या. आम्हा साधकांना थोडा जरी शारीरिक त्रास झाला, तरी लगेच नामजपाचा विसर पडतो. ‘रुग्णाईत असतांनाही गुरुदेवांच्या अनुसंधानात राहून अखंड नामजप केला पाहिजे’, हे महत्त्वाचे सूत्र मला पू. दातेआजींकडून शिकता आले.
पू. दातेआजींच्या छायाचित्राच्या जागी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवणे
आम्ही पू. वामन (सनातनचे २ रे बालसंत, वय ५ वर्षे) यांच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त आश्रमातील सर्व संतांना आमच्या घरी बोलवले होते. तेव्हा पू. दातेआजीही आमच्या घरी आल्या होत्या. आम्ही त्यांच्या समवेत छायाचित्र काढले होते. त्यातील पू. दातेआजींच्या समवेत काढलेले छायाचित्र पहातांना आम्हाला पू. दातेआजींच्या जागी त्यांचे अस्तित्व न जाणवता गुरुदेवांचेच अस्तित्व जाणवत होते. – कु. श्रिया राजंदेकर
३. पू. दातेआजींची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी जाणवलेली एकरूपता !
अ. मी पू. दातेआजींना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत प्रवेश करते, तेव्हा मला मी ‘गुरुदेवांच्याच खोलीत प्रवेश करत आहे’, असे जाणवते.
आ. अनेक वेळा मला पू. दातेआजींमध्ये गुरुदेवांचा भास होतो.
इ. ‘त्या माझ्याकडे पहातात, तेव्हा गुरुदेवच माझ्याकडे पहात आहेत’, असे मला अनेक वेळा जाणवते.
ई. पू. दातेआजींच्या बोलण्यामध्ये पुष्कळ गोडवा आहे. ‘त्यांचे बोलणे ऐकतांना गुरुदेवच बोलत आहेत’, असे मला वाटते.
४. पू. दातेआजींचा गुरुदेवांप्रती असलेला अपार भाव !
‘पू. दातेआजींच्या मनात गुरुदेवांप्रती पुष्कळ भाव आहे. मी कधी गुरुदेवांच्या संदर्भात दातेआजींशी बोलते, तेव्हा त्यांचा भाव जागृत होतो. त्या उत्स्फूर्तपणे त्यांना गुरुदेवांविषयी आलेली अनुभूती मला सांगतात. त्यातून मला ‘गुरुदेवांप्रती भाव कसा असायला हवा ?’, हे शिकता येते.
५. अनुभूती
५ अ. पू. दातेआजींना भेटून गेल्यावर मला ‘नवीन ऊर्जा मिळाली’, असे वाटते.
५ आ. पू. दातेआजींना भेटल्यानंतर मन निर्विचार होते.
५ इ. ही स्थिती साधारण २ – ३ दिवस टिकून रहाते.
यातून ‘पू. दातेआजींच्या चैतन्याचा परिणाम बराच काळ टिकून रहातो’, हे माझ्या लक्षात आले.
६. प्रार्थना आणि कृतज्ञता
‘हे गुरुदेव, पू. दातेआजींकडून शिकायला मिळालेली सूत्रे मला माझ्या कृतीत आणता येऊ देत’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे. ‘हे गुरुदेव, आपल्याच अनंत कृपेने मला पू. दातेआजींचा सहवास लाभत आहे’, यासाठी माझ्या मनात अखंड कृतज्ञताभाव राहू दे.
‘आपणच माझ्याकडून ही सूत्रे लिहून घेतली’, यासाठी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. श्रिया राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय १३ वर्षे), फोंडा, गोवा. (९.६.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |