स्वित्झर्लंडमध्ये युक्रेन शांतता शिखर परिषदेला आरंभ
बर्न – रशिया आणि युक्रेन यांच्यातील ८४० दिवस चाललेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्वित्झर्लंडमधील बर्गनस्टॉक रिसॉर्टमध्ये शांतता शिखर परिषद १५ जून या दिवशी चालू झाली. २ दिवस चालणार्या या शिखर परिषदेमध्ये युद्ध थांबवण्यावर तोडगा काढण्यासाठी उपाय काढले जातील. ही आतापर्यंतची चौथी शिखर परिषद आहे. याआधी कोपनहेगन, जेद्दाह आणि माल्टा येथे ३ शिखर परिषदा झाल्या आहेत.
१. स्विस अधिकार्यांनी या परिषदेसाठी १६० देशांना आमंत्रित केले होते. त्यांपैकी भारतासह अनुमाने ९० देशांचे नेते किंवा प्रतिनिधी यात सहभागी झाले आहेत. अनेक मोठ्या देशांनी यात सहभागी होण्यास नकार दिला होता. रशियाला मात्र या शिखर परिषदेचे निमंत्रण पाठवण्यात आलेले नाही.
२. रशियाचा महत्त्वाचा मित्र चीननेही या शिखर परिषदेपासून दूर रहाण्याचा निर्णय घेतला आहे. जी-२० चा विद्यमान अध्यक्ष असलेला ब्राझिल, तसेच सौदी अरेबिया आणि पाकिस्तान हे देशही शिखर परिषदेत सहभागी होणार नाहीत.
३. युक्रेनचे सर्वांत मोठे समर्थक असणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हेही या शिखर परिषदेला उपस्थित रहाणार नाहीत. त्यांच्या जागी उपाध्यक्ष कमला हॅरिस उपस्थित रहाणार आहेत.