पुणे शहरातील अशास्त्रीय सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्यांमुळे ‘पुणे जलमय’ होत असल्याचे भूगोल अभ्यासकांचे म्हणणे
अल्प वेळेत पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरांतील रस्त्यांवर पाणी साचले असे प्रशासनाचे म्हणणे !
पुणे – महापालिका प्रशासनाने विकासाच्या नावाखाली सिद्ध केलेले अशास्त्रीय रस्ते, खड्डे टाळण्यासाठी गल्ली-बोळांमध्ये बांधलेले सिमेंट-काँक्रीटचे रस्ते आणि पाण्याचा निचरा करणार्या सांडपाणी वाहिन्यांचे ढिसाळ नियोजन हे पुणे शहर ‘जलमय’ होण्यास कारणीभूत ठरत आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याचे सर्व मार्ग बंद केल्यामुळे शहरात पुराचा धोका वाढल्याची चेतावणी भूगोल अभ्यासकांनी दिली आहे. याविषयी महापालिका प्रशासनाने मात्र अल्प वेळेत पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरांतील रस्त्यांवर पाणी साचले, असे कारण दिले आहे.
स्वत:च्या लाभासाठी सोयीस्कररित्या वळवलेले नाले, राडारोडा टाकून बुजवलेले नाले, तसेच नैसर्गिक जलस्रोत बुजवल्यामुळे पडणारे पावसाचे पाणी डोंगरउतारावरून थेट रस्त्यावर येते. पावसाचे पडणारे पाणी ३५ टक्के भूमीत मुरणे अपेक्षित असते. सध्या काँक्रिटीकरणामुळे ते पाणी भूगर्भात जाण्याचे सर्व मार्ग रोखल्याने ९५ टक्क्यांहून अधिक पाणी वाट मिळेल तिकडे वहात आहे, असे भूगोल अभ्यासक सांगत आहेत.
शहरातील ३०० हून अधिक जलस्रोत गायब !
वर्ष १९९१ ते २०१६ या कालावधीत रामनदी, आंबील ओढा, वाघोली, वडकी, नांदोशी, भैरोबानाला येथे मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आले. काही ठिकाणी ओढ्याची लांबी, रुंदी अल्प करण्यात आली. या कालावधीमध्ये शहरातील ३०० हून अधिक लहान-मोठे जलस्रोत बुजवण्यात आले, असे भूगोल अभ्यासक डॉ. श्रीकांत गबाले यांच्या संशोधनातून पुढे आले आहे. तसेच अशास्त्रीय दृष्टिकोनातून झालेल्या बांधकामामुळे पूरप्रवण क्षेत्रे वाढल्याचा निष्कर्ष त्यांनी मांडला आहे.
शहरातील पूर येण्याची संभाव्य ठिकाणे !
बालाजी कॉलनी (वसाहत), सूस रस्ता, बालाजीनगर, बालेवाडी फाटा, बाणेर पेट्रोलपंप, भुसारी कॉलनी, बंडगार्डन, दांडेकर चौक, दीपबंगला चौक, संतोष हॉल चौक, शंकर महाराज मठ, सिंहगड रस्ता, श्रीधर कॉलनी (हिंगणे), कर्वे पुतळा, कुसारबाग (कोंढवा), माकर्ेट यार्ड, मित्र मंडळ चौक, सुतारवाडी (पाषाण), वडगाव पूल आणि वारजे पुल यांसह ६१ ठिकाणे पूरप्रवण क्षेत्रांमध्ये मोडतात.