अतिक्रमणाच्या विरोधात कुडाळ नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक एकवटले !
कुडाळ – शहरातील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या समोरील चौकात असलेल्या नाल्याला (नाला म्हणजे शहरातील पाणी वाहून जाण्यासाठी केलेली व्यवस्था) लागून एका बांधकाम व्यावसायिकाने केलेले अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे, अशी मागणी कुडाळ नगरपंचायतीच्या सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही पक्षांच्या सर्व म्हणजे एकूण १७ नगरसेवकांनी केली आहे. हे अतिक्रमण मनसेने प्रथम निदर्शनास आणून देऊन त्यावर कारवाईची मागणी केली होती.
कुडाळ नगरपंचायतीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आहे, तर महायुती विरोधी पक्षात आहे. संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या समोरील नाल्याच्या ठिकाणी करण्यात आलेल्या अतिक्रमणाला नगरपंचायतीतील सर्व नगरसेवकांनी एकत्रित विरोध दर्शवल्याविषयी मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी सर्वांचे आभार मानले.
नुकत्याच झालेल्या पावसात या नाल्यावरील अतिक्रमणामुळे चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साठून वाहनचालक, शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, स्थानिक व्यावसायिक आणि अन्य नागरिक यांना त्रास सहन करावा लागत आहे.
संपादकीय भूमिकाअतिक्रमणाच्या विरोधात लोकप्रतिनिधींना असा आवाज उठवावा का लागतो ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ? |