चीनकडून विकत घेतलेली शस्त्रे निकृष्ट ठरल्याने बांगलादेशाचे सैन्य त्रस्त !
ढाका (बांगलादेश) – चीनने बांगलादेशाच्या सैन्याला निकृष्ट शस्त्रे विकल्याचे समोर आले आहे. बांगलादेशाच्या सैन्याच्या म्हणण्यानुसार चीनकडून विकत घेण्यात आलेली लढाऊ विमाने व्यवस्थित बाँबफेक करत नाहीत, रडारही निरुपयोगी आहेत. चीनमधून पाठवल्या जाणार्या सुट्या भागांचा दर्जाही निकृष्ट आहे. यामुळे बांगलादेशाचे सैन्य चिंतेत आहे.
१. बांगलादेशाच्या चीनकडून विकत घेतलेल्या युद्धनौकांनाही तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. बांगलादेशाचे वायूदलही चीनच्या ‘एफ्-७’ लढाऊ विमानांना कंटाळले आहे. या विमानांमध्ये अनेक तांत्रिक दोष आहेत.
२. वायूदलाच्या म्हणण्यानुसार चीनमध्ये बनवलेल्या ‘के-८ डब्लू’ विमानाला काही दिवसांनी समस्या येऊ लागल्या. चीनकडून पुरवले जाणारे एअर इंटरसेप्शन रडारही व्यवस्थित काम करत नाही. बांगलादेशाच्या लढाऊ विमानांमध्ये बसवण्यात आलेले चिनी रडारही अचूक मापदंडांची पूर्तता करत नाहीत.
३. बांगलादेशाच्या सैन्याने चीनच्या ‘नॉर्थ इंडस्ट्रिज कॉर्पोरेशन’कडून ‘मेन बॅटल टँक’ मागवले होते. या टाक्यांची दुरुस्ती आणि देखभाल यांसाठी भाग पुरवण्यात चीनला अडचण येत असल्याचे वृत्त आहे.
४. बांगलादेशाच्या नौदलालाही समस्या येत आहेत. चीनमध्ये बांधलेल्या २ युद्धनौकांमध्ये अनेक त्रुटी आढळल्या. त्यांच्या दुरुस्तीसाठी चिनी आस्थापनांनी अतिरिक्त पैशांची मागणी केली आहे.
५. एक दशकापूर्वी चीनने बांगलादेशाला २ नूतनीकरण केलेल्या पाणबुड्या विकल्या होत्या. बांगलादेशाला नंतर लक्षात आले की, त्या नीट कामच करू शकत नाहीत. गेल्या वर्षी नौदलाने ‘बी.एन्.एस्. निर्मूल’ या युद्धनौकेवर बसवण्यात आलेली ‘सी ७०४’ यंत्रणा काम करत नसल्याची तक्रार केल्यावर चीनच्या आस्थापनाने ही यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी अतिरिक्त पैसे मागितले होते.
म्यानमारचे वायूदलही निकृष्ट चिनी शस्त्रांमुळे त्रस्त !
चिनी वस्तूंच्या निकृष्ट दर्जामुळे केवळ बांगलादेशच त्रस्त नाही, तर म्यानमारचे वायूदलही अडचणीत आले आहे. त्यालाही चिनी लढाऊ विमानांमधील समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तज्ञांच्या मते चीनकडे अजूनही उच्च दर्जाचे सैनिकी उपकरणे सिद्ध करण्याची क्षमता नाही. चीन विकत असलेली बहुतेक शस्त्रे ही दुय्यम दर्जाच्या किंवा अप्रचलित तंत्रज्ञानावर आधारित आहेत. गरीब देश चीनकडून शस्त्रे खरेदी करतात; कारण ती स्वस्त आहेत.
संपादकीय भूमिका
|