भाजप ‘अहंकारी’, तर विरोधी पक्षांच्या ‘इंडी’ आघाडी ‘रामविरोधी’ !
रा.स्व संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांचे विधान
नवी दिल्ली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालावरून भाजपवर टीका केली आहे. त्यांनी सत्तारुढ भाजपला ‘अहंकारी’, तर विरोधी पक्षांच्या ‘इंडी’ आघाडीला ‘रामविरोधी’ म्हटले आहे. १३ जून या दिवशी इंद्रेश कुमार हे जयपूरजवळील कानोतामध्ये ‘रामरथ अयोध्या यात्रा दर्शन आणि पूजन समारंभा’त बोलत होते.
इंद्रेश कुमार म्हणाले, ‘‘प्रभु श्रीराम हे सर्वांशी न्यायाने वागतात. लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी रामाची भक्ती केली त्यांच्यात हळूहळू अहंकार निर्माण झाला. श्रीरामाने त्यांना सगळ्यात मोठा पक्ष बनवले खरे; पण त्यांचा पूर्ण हक्क (पूर्ण बहुमत) त्यांना दिला नाही. त्यांची शक्ती देवाने रोखली. ज्यांनी (इंडि आघाडीने) रामाला विरोध केला, त्यांना देवाने अजिबातच ताकद दिली नाही. सर्वांनी मिळूनदेखील या आघाडीला अव्वल क्रमांकापर्यंत पोचता आले नाही. देवाचा न्याय सत्य असतो.’’
इंद्रेश कुमार पुढे म्हणाले की, ज्या पक्षाने प्रभु श्रीरामाची भक्ती केली त्या पक्षाला आता २४१ जागांवर अडून बसावे लागले. अहंकारी लोकांना देवाने मोठा पक्ष बनवले; परंतु ताकद दिली नाही. दुसरीकडे ज्यांना प्रभु श्रीरामाविषयी जराही आस्था नव्हती, त्या सर्वांना मिळून २३४ जागांवरच रोखले.