नागरिकांनी मध्यस्थांकडे (एजंट) जावे म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ऑनलाईन सेवा किचकट केल्या का ? – माजी परिवहन आयुक्त महेश झगडे

माजी परिवहन आयुक्त महेश झगडे

पुणे – वाहन चालवण्याचा परवाना मिळण्यासाठी नागरिकांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो. या ऑनलाईन प्रक्रियेतील त्रुटी वारंवार समोर येत आहे. नागरिकांनी मध्यस्थांकडे (एजंट) जावे म्हणून ही प्रक्रिया अत्यंत किचकट केली का ? असा प्रश्न माजी परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी विचारला. वाहन परवान्याचे नूतनीकरण करतांना त्यांना आलेल्या अडचणींमुळे त्यांनी याविषयी सूत्रे उपस्थित केली आहेत.  वाहन चालवण्याच्या परवान्याचे नूतनीकरण करण्याची ऑनलाईन प्रक्रिया किचकट असल्याचे त्यांना लक्षात आले.  अनावश्यक गोष्टी टाळून ऑनलाईन प्रक्रिया सहज आणि सोपी असावी, आर्.टी.ओ.तील सेवांसाठी मध्यस्थांकडे जाणे नागरिकांनी टाळावे अशी महत्त्वपूर्ण सूत्रेही त्यांनी सांगितली.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वाहन चालवण्याचा परवाना घेण्यासाठी केंद्र सरकारच्या परिवहन मंत्रालयाच्या ‘सारथी’ प्रणालीवर जाऊन अर्ज करावा लागतो; मात्र ऑनलाईन प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने अनेक जण स्वतः अर्ज करण्याऐवजी मध्यस्थांकडे जातात. मध्यस्थांचे आर्थिक लागेबांधे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी असतात. त्यामुळे नागरिकांकडून पैसे घेऊन मध्यस्थ ही कामे करून देतात.

याविषयी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सांगितले की, परिवहन विभागाच्या सेवा ऑनलाईन देण्याची प्रणाली राष्ट्रीय सूचना केंद्राने सिद्ध केली आहे. त्यांना सांगितलेल्या सुधारणा राष्ट्रीय सूचना केंद्र इतर राज्यांशी सल्लामसलत करून राबवते.