साधकांमध्ये आंतरिक पालट घडवणारे पू. रमानंद गौडा !
तेलंगाणा येथील दौर्यात पू. रमानंद गौडा यांच्या समवेत शिकण्यासाठी आलेल्या साधकांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. सौ. विनुता शेट्टी, भाग्यनगर, तेलंगाणा
१ अ. ‘प्रत्येक सेवेची व्याप्ती काढून त्यानुसार सेवा करायला हवी’, हे शिकता येणे : ‘जानेवारी २०२४ मध्ये पू. रमानंद गौडा तेलंगाणा राज्यात दौर्यावर आले होते. या वेळी आंध्रप्रदेश येथील काही साधकही शिकण्यासाठी तेलंगाणा येथे आले होते. दौर्यामध्ये शिकायला आलेल्या साधकांकडे दौर्यातील विविध सेवा होत्या. उत्तरदायी साधकांनी दौर्यातील सेवांची व्याप्ती काढून सेवेतील साधकांना त्याचे नियोजन करून देणे अपेक्षित होते; पण आम्ही तसे नियोजन न केल्यामुळे पू. रमानंदअण्णांनी आम्हा साधकांना त्या सेवांची व्याप्ती काढून सेवांचे नियोजन करून द्यायला सांगितले. त्यामुळे सर्व साधकांना ‘सेवेची व्याप्ती लक्षात घेऊन नियोजन कसे करायचे ?’, हे शिकता आले.
१ आ. प्रत्येक सेवेविषयी सतर्कता आणि गांभीर्य असणे : पू. रमानंदअण्णांच्या दौर्याच्या वेळी आमच्याकडे वेगवेगळ्या सेवा असायच्या. पू. रमानंदअण्णा त्या सर्व सेवांची नोंद ठेवून आमचा पाठपुरावा घ्यायचे. आम्ही साधकांनीही आपापल्या सेवांची नोंद केलेली असूनही आमच्याकडून एखादी सेवा करायची राहून जात असे; पण पू. रमानंदअण्णांकडून एकही सेवा रहायची नाही. यातून ‘पू. रमानंदअण्णांमध्ये प्रत्येक सेवेविषयी किती गांभीर्य आणि सतर्कता आहे’, हे आमच्या लक्षात आले.
१ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची महती गातांना भावावस्थेत जाणारे पू. रमानंदअण्णा ! : साधकांना मार्गदर्शन करतांना आणि साधकांशी वैयक्तिक बोलतांना प्रत्येक वेळी पू. रमानंदअण्णांच्या मुखात गुरुदेवांचे नाव असायचे. ‘श्री गुरूंविना या जीवनात शाश्वत काय आहे ?’, हे सांगतांना त्यांच्या डोळ्यांतून भावाश्रू यायचे आणि ते भावावस्थेत जायचे. त्या क्षणी ‘ते गुरुदेवांना अनुभवत आहेत’, असे आम्हाला जाणवायचे. त्यामुळे ‘श्री गुरु हेच आपले सर्वकाही आहेत. आपल्यालाही श्री गुरुंसाठीच जगायचे आहे. आपल्या जीवनाचे प्राधान्यही गुरुदेवच आहेत’, अशी आमची जाणीव वाढली.
१ ई. हिंदु राष्ट्राचे कार्य संतच करू शकतात’, हे गुरुवचन सिद्ध करणारे पू. रमानंदअण्णा ! : पू. रमानंदअण्णांचा हा दौरा पुष्कळ चैतन्यमय झाला. यात दौर्यांत अनेक ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग चालू झाले. ‘संतांच्या चैतन्याचा परिणाम कशा प्रकारे होतो ?’, ही अनुभूती त्यांच्या दौर्यातील सेवांशी संबंधित सर्व साधकांनी घेतली. त्यातून ‘हिंदु राष्ट्राचे कार्य संतांकडून होणार आहे’, हे प.पू. गुरुदेवांचे वाक्य आम्हा सर्व साधकांना प्रत्यक्ष अनुभवता आले.’
२. सौ. सविता कणसे, विशाखापट्टणम्, आंध्रप्रदेश
२ अ. ‘क्षमायाचना करतांना आपले मन आणि शरीर दोन्ही वाकले, तरच पापक्षालन होते’, याची साधकांना जाणीव करून देणे : ‘एकदा काही साधक समष्टीमध्ये क्षमायाचना करत होते. ‘त्या साधकांनी मनापासून क्षमायाचना केली नाही’, हे पू. रमानंदअण्णांच्या लक्षात आले. ते त्या साधकांना म्हणाले, ‘‘उगीच करायची; म्हणून क्षमायाचना करू नका. क्षमायाचना करतांना आपल्याला त्या चुकीचा पश्चाताप आणि खंत वाटायला हवी. क्षमायाचना करतांना आपले मन आणि शरीर दोन्ही वाकायला हवे. असे झाले, तरच त्या क्षमायाचनेचा साधकाला लाभ होतो. अशी मनापासून क्षमायाचना केली, तरच आपले पापक्षालन होते आणि तो स्वभावदोषही न्यून होण्यास साहाय्य होते.’’
३. श्रीमती पद्मा शेणै (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६३ वर्षे), भाग्यनगर, तेलंगाणा
३ अ. पू. रमानंदअण्णांमधील चैतन्यामुळे साधकांमध्ये आंतरिक पालट होऊन सतत सेवारत राहूनही साधक उत्साही आणि क्रियाशील असणे : ‘पू. रमानंदअण्णांचा तेलंगाणा येथील दौरा १० दिवसांचा होता. दौर्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पू. रमानंदअण्णांच्या मार्गदर्शनाची सिद्धता करणे, वेगवेगळे धर्मप्रेमी आणि साधक यांच्याशी पू. अण्णांची भेट करून देणे, तेथील सर्व व्यवस्था पहाणे’, अशा अनेक सेवा असायच्या. रात्री निवासस्थानी परत आल्यावर ‘आज दिवसभरात प्रयत्नांमध्ये कुठे न्यून पडलो ?’, याविषयी सत्संग आणि पू. रमानंदअण्णांचे मार्गदर्शन असायचे. हे सर्व होऊन रात्री झोपायला उशीर व्हायचा. दुसर्या दिवशी सकाळी ६ वाजता उठून त्या दिवशीची सिद्धता चालू करावी लागत असे. प्रतिदिन असे नियोजन असूनही दौर्यातील सर्व साधक क्रियाशील आणि उत्साही होते. या दौर्याच्या वेळी पू. रमानंदअण्णांनी आम्हा सर्व साधकांमध्ये आंतरिक पालट घडवून आणला. ‘संतांमधील चैतन्यामुळे साधकांकडून सेवा कशा होतात ? आणि साधकांमध्ये पालट कसा होतो ?’, हे मला शिकता आले.’
४. सौ. मीना कदम (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे) आणि श्री. अनिल कदम, विशाखापट्टणम्, आंध्रप्रदेश
४ अ. संतांच्या चैतन्याचे महत्त्व ! : ‘तेलंगाणामध्ये तेलुगु भाषा बोलली जाते. पू. रमानंदअण्णांनी समाजातील व्यक्ती आणि धर्मप्रेमी यांना हिंदी भाषेतून मार्गदर्शन केले. तरीही सर्वांनी शेवटपर्यंत एकाग्रतेने पूर्ण मार्गदर्शन ऐकले. यातून संतांमधील चैतन्याचे महत्त्व माझ्या लक्षात आले. ‘संतांमधील चैतन्याने गुरुकार्य होते आणि साधकही घडतात’, हे आम्हाला शिकता आले.
४ आ. अनुभूती : पू. रमानंदअण्णांच्या जागी मला प.पू. गुरुदेवांचे दर्शन झाले.
५. कृतज्ञता
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या कृपेने पू. रमानंदअण्णांच्या दौर्यातून आम्हा सर्व साधकांना शिकता आले’, यासाठी आम्ही साधक श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. चेतन जनार्दन आणि सौ. विनुता शेट्टी (दोघे भाग्यनगर), सौ. मीना कदम (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) , विशाखापट्टणम्, आंध्रप्रदेश (१५.२.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |