गणेशोत्सवानिमित्त हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारणार !
पुणे येथील ‘दगडूशेठ हलवाई गणपति ट्रस्ट’च्या वतीने ही प्रतिकृती सिद्ध करण्यात येणार !
पुणे – ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट’, सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने ट्रस्टच्या वतीने १३२ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. आशियातील सर्वात उंच शिवमंदिर म्हणून हे मंदिर ओळखले जाते. उत्तुंग हिमालयाच्या सानिध्यात प्रतिष्ठित आणि अत्यंत पवित्र असलेल्या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति ट्रस्टच्या वतीने साकारण्यात येणार असून भाविकांकरता विशेष आकर्षण ठरणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली. हे मंदिर स्थापत्यकलेचा चमत्कार आहे. पुराणातील उल्लेखानुसार भगवान शिवाच्या सर्वांत प्राचीन मंदिरांपैकी एक असून हे मंदिर एकेकाळी भगवान शंकराचे विश्रामस्थान होते, असे मानले जाते.
सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात सजावटीचा शुभारंभ सोहळा कलादिग्दर्शक अमन विधाते आणि दीपाली विधाते यांच्या हस्ते पार पडला. या वेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.