पुणे जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये केवळ १३ टी.एम्.सी. पाणीसाठा शेष !
उपयुक्त पाणीसाठा ६.५९ टक्के एवढाच !
पुणे – जून महिन्याच्या १० दिवसांमध्ये सरासरी ८८.९० मिलीमीटर पाऊस पडला आहे; परंतु जिल्ह्यांतील धरणांमधील पाणीसाठ्यांमध्ये मात्र किंचितही वाढ झालेली नाही. उलट गेल्या वर्षीपेक्षा धरणांतील पाणीसाठा पुष्कळ न्यून झालेला आहे. सध्या जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मिळून केवळ १३.०७ टी.एम्.सी. पाणीसाठा शेष आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे हे प्रमाण केवळ ६.५९ टक्के इतके आहे.
गेल्या वर्षीच्या अनुमाने यंदा उपलब्ध पाणीसाठ्याची अवस्था पुष्कळ बिकट झाली आहे. नाझरे धरणांमध्ये पाणी नसल्याने ते कोरडे पडले आहेत. अन्य १२ धरणांतील उपयुक्त पाणीसाठा हा फारच अल्प आहे. गेल्या वर्षी आजमितीस सर्व धरणांमध्ये मिळून १९.७० टी.एम्.सी. पाणीसाठा उपलब्ध होता. पुणे जिल्ह्यातील २६ सरकारी धरणांच्या व्यतिरिक्त टाटा समुहाची ६ धरणे आहेत. यातील लोणावळा हे धरण कोरडे पडले आहे. या ६ धरणांची एकूण पाणीसाठवण क्षमता ४२.७६ टी.एम्.सी. इतकी आहे. त्यात सध्या ९.४१ टी.एम्.सी. (२२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.