राष्ट्र आणि धर्म यांचा प्रखर अभिमान असलेले अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी अपार भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ८९ वर्षे) !
‘मी सनातन संस्थेच्या कार्यानुषंगाने मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांतील काही सेवा करत होतो. या सेवांच्या निमित्ताने माझा अनेक संत, प्रवचनकार, वक्ते, लेखक आणि राजकारणी इत्यादींशी संपर्क आला. तेव्हा माझा भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे (आबा) यांच्याशीही संपर्क आला. मला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
(हे लिखाण प्रा. सु.ग. शेवडे संत होण्यापूर्वीचे आहे. – संकलक)
१. साधी रहाणी
भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे (आबा) चेंबूर येथे त्यांच्या पत्नीच्या समवेत जुन्या घरातील एका लाकडी माळ्यावरील लहानशा जागेत रहात असत. धोतर, सदरा आणि टोपी अशी त्यांची साधी वेशभूषा असते. ते भारतभर फिरले आहेत आणि विदेशातही गेले आहेत; मात्र तरी त्यांनी त्यांचा भारतीय पोषाख अन् साधेपणा सोडला नाही. ‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’ हे सुवचन त्यांना तंतोतंत लागू पडते.
२. स्वयंशिस्त
ते त्यांच्या कार्यक्रमाच्या अगोदर काही खात-पीत नसत. त्यांचे भाषण किंवा प्रवचन झाल्यावर शक्यतो ते एक कप गरम दूध पीत असत. या उतार वयातही ते ‘रात्री वेळेत झोपणे, सकाळी लवकर उठणे, वैयक्तिक आवरून नामस्मरण करणे’, इत्यादी कृती नित्यनेमाने करतात.
३. काटकसरीने संसार करणे
आबांची उपजिविका प्रवचने आणि व्याख्याने घेणे यांवर चालते. त्यांना मिळणार्या उत्पन्नातून त्यांनी काटकसरीने संसार केला.
४. वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ असूनही मृदुभाषी
आबा हे देश आणि जागतिक स्तरावर घडणार्या घडामोडी यांचा अभ्यास करतात. त्यांची आकलनशक्ती उत्तम आहे. त्यांचा राष्ट्र आणि धर्म यांविषयी ज्ञानसंपादन करण्याचा पुष्कळ व्यासंग आहे; मात्र त्यांना त्या ज्ञानाचा अहं नाही. ते मृदुभाषी आहेत. ते त्यांच्या प्रवचनातून सोप्या भाषेत धर्मशास्त्राचे महत्त्व सांगून ‘धर्मशास्त्र कृतीत कसे आणावे ?’, याविषयी सांगतात. त्यांनी काही ग्रंथही लिहिले आहेत.
५. वक्तृत्वकौशल्य
आबा समोर लिखाणाचा कागद किंवा टीपण न ठेवता प्रवचने किंवा भाषणे देतात. ते प्रसंगोचित विनोद करून श्रोत्यांना हसत-खेळत राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे ज्ञान देतात. श्रोत्यांना प्रवचनात मंत्रमुग्ध करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे त्यांची प्रवचने ऐकण्यासाठी ठिकठिकाणाहून लोक येतात. आबा बोलता बोलता सहजतेने हिंदु धर्माची महानता समोरच्या व्यक्तींच्या गळी उतरवतात. हिंदु राष्ट्र-जागृती सभेतही ते वक्ते असायचे. सभेची एकूण वेळ ठरलेली असे. एखाद्या वेळी एखाद्या वक्त्याचे बोलणे अधिक वेळ चालले, तर आबा तारतम्याने अल्प वेळेत त्यांची सूत्रे चांगल्या प्रकारे मांडून श्रोत्यांची मने जिंकत असत.
६. राष्ट्र आणि धर्म यांचा प्रखर अभिमान असणे
६ अ. मुलगा-नातू यांच्यावर राष्ट्र आणि धर्म यांचे संस्कार करणे : आबांमध्ये राष्ट्र आणि धर्म यांविषयी प्रखर अभिमान आहे. त्यांनी त्याचे सुपुत्र डॉ. सच्चिदानंद शेवडे आणि नातू वैद्य परीक्षित शेवडे यांच्यावर राष्ट्र अन् धर्म यांचे संस्कार केले आहेत. ते दोघेही राष्ट्र आणि धर्म यांचे अभिमानी असून ते आबांचा वारसा पुढे चालवत आहेत.
६ आ. हिंदु धर्माच्या विरोधी वातावरण असूनही प्रवचनांतून धर्मजागृती करणे : आबांचे लिखाण, तसेच प्रवचने, भाषणे, वागणे आणि बोलणे यांतून त्यांचा धर्माभिमान सहज जाणवतो. आबांच्या ऐन उमेदीच्या काळात महाराष्ट्र आणि केंद्र या दोन्ही ठिकाणी हिंदुद्वेष्ट्यांची सत्ता असल्यामुळे हिंदु धर्माच्या विरोधी वातावरण होते. असे असूनही आबा राष्ट्र आणि धर्म यांविषयी प्रखरपणे अन् सडेतोड बोलून धर्मजागृती करत असत. त्यामुळे आबांना बराच संघर्ष करावा लागला. त्यांनी आतापर्यंत लाखो किलोमीटरचा प्रवास करून १३ सहस्र ५०० हून अधिक प्रवचने, तसेच कीर्तने आणि व्याख्याने घेतली आहेत. एकलव्याप्रमाणे प्रवचनांद्वारे ते कुशलतेने धर्मसेवा करत असत. भगवंतानेच आबांचे रक्षण केले असून त्यांच्याकडून राष्ट्र आणि धर्म यांची अवर्णनीय सेवा करून घेतली आहे.
७. बोलल्याप्रमाणे वागणारे आणि वेळेचे पालन करणारे भारताचार्य सु.ग. शेवडे !
मी आबांना हिंदु राष्ट्र-जागृती सभा किंवा गुरुपौर्णिमा यांसाठी वक्ता म्हणून निमंत्रण द्यायला जात असे. ते त्यांची व्यस्तता आणि अन्य कार्यक्रमांचे नियोजन पाहून वक्ता म्हणून येण्याचे मान्य करत असत; पण एकदा त्यांनी होकार दिल्यावर मी निश्चिंतपणे कार्यक्रमाचे आयोजन करू शकत असे. त्यासाठी आबांचा पाठपुरावा पुन्हा कधीच घ्यावा लागत नसे. ‘आबा वेळेवर आणि ठरवल्याप्रमाणे येतील’, याची मला निश्चिती असे. त्याप्रमाणे ते कार्यक्रमाला न चुकता वेळेवर येत असत.
(क्रमशः)
– (पू.) शिवाजी वटकर (वय ७७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.६.२०२४)