कल्याणीनगर कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलगा २५ जूनपर्यंत बालसुधारगृहात !
बाल न्याय मंडळाचा निर्णय !
पुणे – कल्याणीनगर ‘पोर्शे’ कार अपघात प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीची ‘बाल न्याय मंडळा’ने बालसुधारगृहामध्ये ठेवण्याची समयमर्यादा अजून १३ दिवसांनी वाढवली आहे. त्यानुसार २५ जूनपर्यंत त्याला बालसुधारगृहामध्ये ठेवण्यात येणार आहे. पुणे पोलिसांनी यासाठी अर्ज प्रविष्ट केला होता. त्यावर दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून मंडळाच्या अध्यक्षा अक्षी जैन यांनी हा आदेश दिला आहे.
अल्पवयीन मुलाला १२ जूनपर्यंत ‘बालसुधारगृहात’ ठेवण्याचे आदेश दिले होते. अद्याप मुलाचे समुपदेशन चालू आहे. व्यसनाधिनतेविषयीही त्याला सांगण्यात येत आहे. अपघाताची चित्रफीत प्रसारित झाल्याने आरोपीची ओळख समाजामध्ये झाली आहे. बालसुधारगृहातून सुटका झाल्यास त्याच्या जीविताला धोका आहे, अशी माहिती सरकारी अधिवक्ता आणि साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी मंडळासमोर दिली होती. त्यानुसार वरील निर्णय घेण्यात आल्याचे समजते.