आग वेगाने पसरल्याने कामगारांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही !

  • कुवेत येथील इमारतीला लागलेल्या आगीचे प्रकरण

  • इमारतीत प्रमाणापेक्षा अधिक कामगार ठेवल्याने होणार कारवाई !

कुवेत येथील इमारतीला लागलेली आग

मंगफ (कुवेत) – येथे १२ जून या दिवशी ६ मजली इमारतीला लागलेली आग इतकी वेगाने पसरली की, लोकांना जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही. येथे सकाळी ६ वाजता इमारतीच्या तळमजल्यावरील स्वयंपाकघरात अचानक सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याचे सांगितले जात आहे. आग वेगाने पसरल्याने वरील मजल्यांवरील लोकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही आणि त्यामुळे अधिक जीवितहानी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीमध्ये ४९ जणांचा मृत्यू झाला. त्यांत ४२ जण भारतीय आहेत. अनेकांना आपत्कालीन सेवांद्वारे सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

१.  कुवेत अग्नीशमन विभागाचे लेफ्टनंट कर्नल अली यांनी एका भारतीय प्रसारमाध्यमाला सांगितले की, इमारतीमध्ये १६० हून अधिक कामगार होते आणि त्यांपैकी बहुतेक भारतीय होते. काही पाकिस्तानी आणि बांगलादेशी कामगारही होते. सर्व जण एकाच आस्थापनात काम करत होते.

२. कुवेतचे गृहमंत्री शेख फहद म्हणाले की, जे काही घडले ते आस्थापन आणि इमारतीचा मालक यांच्या लालसेचा परिणाम आहे.

३. या कामगारांना इमारतीमध्ये जनावरांप्रमाणे ठेवल्यावरून गृहमंत्री फहद यांनी कुवेत नगरपालिका आणि स्थानिक सार्वजनिक प्राधिकरण यांना त्वरित कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. तसेच अशा घटना रोखण्यासाठी सर्व सुरक्षा आवश्यकतांची कार्यवाही (अंमलबजावणी) करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

कुवेतमध्ये २१ टक्के  !

कुवेत अशा आखाती देशांपैकी एक आहे, जिथे भारतियांची संख्या तेथील एकूण लोकसंख्येच्या २१ टक्के आहे. कुवेतमध्ये १० लाख भारतीय सर्वांत खालच्या पदापासून ते वरच्या पदापर्यंत काम करतात. कामगार क्षेत्रात भारतियांचा वाटा ३० टक्के आहे. कुवेतची लोकसंख्या ४२ लाख आहे. येथे जगातील सहाव्या क्रमांकाचे ज्ञात तेलसाठे आहे.भारतीयभारतीय