एस्.टी. महामंडळाच्या पुणे विभागातून यंदा आषाढी यात्रेसाठी २८० हून अधिक एस्.टी. बस सेवा !
राज्यभरातून ५ सहस्र एस्.टी.बस सोडणार !
पुणे – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (‘एस्.टी.’कडून) प्रतिवर्षी आषाढी वारीनिमित्त जादा बस गाड्या सोडण्यात येतात. यंदाही पुणे विभागातील विविध आगारांतून २८० हून अधिक बस गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारीकाळात ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना विनामूल्य प्रवास देणारी ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सवलत देणारी ‘महिला सन्मान’ योजना यांसारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू रहाणार आहेत. एस्.टी. महामंडळाच्या वतीने यंदा गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे, तसेच राज्यभरातून एस्.टी.च्या ५ सहस्र बस सुटणार आहेत. अधिकाधिक भाविक-प्रवाशांनी, एस्.टी.च्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एस्.टी. महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
गाव ते पंढरपूर एस्.टी. सेवा !
राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एस्.टी. बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी ‘भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा’, असे आवाहन एस्.टी. महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.