सिद्धगिरी मठाची राजकीय हेतूने अपकीर्ती करून षड्यंत्र रचणार्यांवर कारवाई करा !
२५ गावांतील ग्रामस्थांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
कोल्हापूर – श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाला तब्बल १ सहस्र ३५० वर्षांपेक्षा अधिक मोठी परंपरा आहे. ज्या घटनांचा मठाशी संबंध नाही, त्यांचा संबंध जोडून केवळ सिद्धगिरी मठाच्या अपकीर्तीसाठी अहोरात्र काही मंडळी सुपारी घेतल्यासारखे काम करत आहेत. यामुळे कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता अधिक आहे. राजकीय हेतूने सिद्धगिरी मठाची अपकीर्ती करून षड्यंत्र करणार्यांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन कणेरी, कणेरीवाडी, कोगील बुद्रु, खुर्द यांसह पंचक्रोशीतील २५ गावांतील नागरिकांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना दिले.
आध्यात्मिक व्यासपिठाचा एक भाग म्हणून २० मे या दिवशी विश्व हिंदु परिषदेने सिद्धगिरी मठावर ‘संत संमेलन’ घेण्याची इच्छा प्रकट केली. त्यामुळे मठाने संमेलन घेण्यासाठी जागा आणि सेवा उपलब्ध करून दिली. यात कोल्हापुरातील सर्व संप्रदायांचे संत, महंत आणि धार्मिक अधिकारी सहभागी झाले होते. या संमेलनास जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हे मठाचे कार्य काही समाजकंटकांना आवडत नाही आणि यातूनच ‘सिद्धगिरी मठावर मोर्चा काढणार’ अशी वल्गना काही लोक करत आहेत. तरी अशा लोकांवर तात्काळ गुन्हा नोंद करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या प्रसंगी शशिकांत खोत, निशिकांत पाटील, एम्.डी. पाटील, दत्तात्रय पाटील, प्रमोद पाटील, वैभव पाटील, अनिल नाईक, सदाशिव स्वामी, सुरेश पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.