फोंडा, गोवा येथील सनातनच्या ६२ व्या (समष्टी) संत पू. (श्रीमती) सुमन नाईक (वय ७५ वर्षे) यांनी केलेल्या प्रार्थना !
पू. (श्रीमती) सुमन नाईक या स्वत:साठी प्रार्थना न करता साधकांसाठी करतात. त्यावरून संतांची प्रार्थना कशी असते, हे लक्षात येईल. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. सूनेकडून योग्य साधना होण्यासाठी गुरुचरणी प्रार्थना होणे
‘घरी माझी सून सौ. सर्वदा संदेश नाईक ही घरची सर्व कामे न कंटाळता करते. ती मला लागणार्या सर्व गोष्टी वेळोवेळी उपलब्ध करून देते. तिच्यामुळे मला सेवेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाता येते; म्हणून माझ्याकडून तिच्याप्रतीही कृतज्ञता व्यक्त होते. मी गुरुदेवांना प्रार्थना करते, ‘तिला सद्बुद्धी द्या आणि तिच्याकडून योग्य ती साधना करून घ्या.’
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी घडवलेले साधक पाहून पुष्कळ कृतज्ञता वाटून त्यांच्यासाठी प्रार्थना होणे
मी आश्रमात जाते, तेव्हा गाडीचे चालकसाधक माझी भावपूर्ण सेवा करतात. मी गाडीत बसायला जाते, तेव्हा ते गाडीचे दार उघडून मला आदराने बसायला सांगतात. त्यांची प्रत्येक कृती भावपूर्ण असते. गाडी आश्रमात पोचल्यावर गाडीचे दार उघडायला साधक तत्पर असतात. हे सगळे बघून ‘देव माझ्यासाठी किती करतो ?’, असा विचार येऊन माझी पुष्कळ भावजागृती होते आणि गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त होते. ‘गुरुदेवांनी साधकांना कसे घडवले आहे’, या विचाराने माझा शरणागतभाव जागृत होतो. माझ्याकडून गुरुचरणी प्रार्थना होते, ‘साधकांकडून नेहमी अशीच भावपूर्ण सेवा होऊ दे आणि त्यांची पुढच्या पुढच्या टप्प्यांची साधना होऊ दे. गुरुदेवा, तुम्ही त्यांची प्रगती करून घ्या.’
– (पू.) श्रीमती सुमन नाईक, कपिलेश्वरी, फोंडा (गोवा) (२६.१.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |