पुणे येथील ‘रिंग रोड’साठी नेमलेल्या अभियंत्यांच्या नियुक्त्या रहित !
‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’चा निर्णय !
पुणे – ‘रिंग रोड’च्या (वर्तुळाकार रस्ता) कामासाठी काढण्यात येणार्या निविदा या अंदाजित रकमेपेक्षा ४० ते ४५ टक्के अधिक दराने आल्या. त्यावरून नियुक्त करण्यात आलेल्या कार्यकारी अभियंत्यांकडून निविदा प्रक्रिया राबवतांना दुर्लक्ष झाल्याचे आढळून आले. तसेच अभियंत्यांच्या नियुक्त्या करतांना पुणे विभागाकडून वरिष्ठ कार्यालयाची अनुमती घेण्यात आली नसल्याने या नियुक्त्या रहित करण्याची नामुष्की ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’च्या (एम्.एस्.आर्.डी.सी.) पुणे विभागावर आली आहे. (संबंधित नियुक्त्या करणार्यांवर कारवाईही होणे आवश्यक ! – संपादक)
‘रिंग रोड’ रस्त्याचे काम गतीने मार्गी लागावे, तसेच निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात यावी, यासाठी प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र कार्यकारी अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली. अशा प्रकारे ६ अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्त्या परस्पर केल्या असल्याचे निदर्शनास आल्यानंतर एम्.एस्.आर्.डी.सी.चे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या रहित केल्याचे समजते.