दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : ६ वर्षांच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या !; डोक्यात दगड घालून प्रियकराकडून प्रेयसीची हत्या !…

६ वर्षांच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या !

विकृतीने गाठली परिसीमा !

प्रतिकात्मक छायाचित्र

जळगाव – येथील ६ वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमीष दाखवून ३५ वर्षीय सुभाष इमाजी भिल याने तिच्यावर अत्याचार केले आणि तिची हत्या केली. संशयित आरोपी फरार आहे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


डोक्यात दगड घालून प्रियकराकडून प्रेयसीची हत्या !

प्रतिकात्मक छायाचित्र

पालघर – भर रस्त्यात भांडण झाल्यावर प्रियकराने प्रेयसीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. स्नेहा चौधरी (वय २० वर्षे) असे तिचे नाव असून प्रियकर सुमित नवनीत तांडेल (वय २३ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली आहे.


डोंबिवली येथे आस्थापनाला आग !

डोंबिवली – येथील एम्.आय.डी.सी. फेज २ मधील इंडो-अमाईन्स या आस्थापनाला आग लागली. आगीमुळे हवेत मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले. घटनास्थळावरून स्फोटांचे आवाजही येत होते. त्यामुळे रहिवासी भयभीत झाले. अग्निशमन दलाच्या ५-६ गाड्या आगीवर नियंत्रण मिळवत होत्य. आग लागण्यामागील कारण स्पष्ट झालेले नाही.


पनवेल येथील नाट्यगृह १६ जूनपासून चालू !

आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह

पनवेल – येथील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाची दुरुस्ती गेल्या २ महिन्यांपासून चालू असल्याने ते बंद होते. ५५ लाख रुपये खर्च करून दुरुस्ती पूर्ण झाल्याने १६ जूनपासून नाट्यगृह चालू होईल. नाट्यगृहातील रंगमंचाचे नूतनीकरण केले आहे. काही दिवसांत नाटकांच्या नोंदणीस प्रारंभ होईल.


बुलढाणा येथे चक्रीवादळात हवेत उडून बाळाचा मृत्यू !

बुलढाणा – येथे आलेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात झोक्यात झोपलेल्या ६ महिन्यांच्या बाळाचा हवेत उडून मृत्यू झाला.


नंदुरबार येथे पावसात केळीच्या बागा उद्ध्वस्त

केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या

नंदुरबार – येथे वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाचा मोठा फटका शेतीपिकांना बसला आहे. अनेक ठिकाणी केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. अद्यापही प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे पंचनामे केले नाहीत. यामुळे शेतकरी संतप्त आहेत.


जुलैपर्यंत ६ सहस्र ५२८ गावे सरकार हागणदारीमुक्त करणार

मुंबई – ‘स्वच्छ भारत मिशनच्या टप्पा २’च्या अंतर्गत २०२४-२५ पर्यंत महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्याचे ध्येय ठेवले आहे. या अंतर्गत ३३ सहस्र ९४७ गावे हागणदारीमुक्त झाली असून जुलैपर्यंत ६ सहस्र ५२८ गावे हागणदारीमुक्त करण्याचे ध्येय पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाने ठेवले आहे. याविषयी पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेतली.