अभिनेत्री नूर मालाबिका हिच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी !
|
मुंबई – अभिनेत्री काजोलची ‘द ट्रायल’ या वेब सीरिज मधील सहकलाकार ३७ वर्षीय अभिनेत्री नूर मालाबिका दास हिचा कुजलेल्या अवस्थेतील पंख्याला लटकलेला मृतदेह ६ जूनला तिच्या मुंबईच्या लोखंडवाला येथील सदनिकेत सापडला. शेजारील सदनिकेतून दुर्गंधी येत असल्याची तक्रार येथील रहिवाशांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात केली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांना तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. या प्रकरणी ‘ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन’ने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तिच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. (काही दशकांपूवी आत्महत्या केलेल्या दिव्याभारती पासून ते आताचे सुशांत सिंग आणि त्याची साहाय्यक दिशा सालियन अशा अनेकविध कलाकारांच्या आत्महत्येनंतर तरी हिंदी चित्रपटसृष्टीतील अशा संशयास्पद प्रकरणांचे सखोल अन्वेषण व्हायला हवे ! – संपादक)
असोसिएशनने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नूरचा अकाली मृत्यू हा भारतीय चित्रपटसृष्टीतील आत्महत्यांच्या ‘ट्रेंड’ची (चर्चेत असलेल्या विषयाची) आठवण करून देणारा आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत अशा दुःखद घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे यामागील मूळ कारणांचे सखोल अन्वेषण करणे आवश्यक आहे. अभिनेत्री नूर मालाबिका दास हिच्या आत्महत्या प्रकरणाचे सर्व बाजूंनी अन्वेषण करावे. त्यातून सत्य समोर येईल आणि तिला न्याय मिळेल. यासाठी तुम्ही सर्व संभाव्य दिशेने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी विनंती आम्ही करत आहोत.
पोलिसांनी अभिनेत्रीच्या कुटुंबियांशी संपर्क साधला; मात्र कुणीही न आल्याने शहरातील बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार्या स्वयंसेवी संस्थेच्या साहाय्याने ९ जूनला तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.