भारतीय संस्कृती, तिने घातलेली बंधने आणि व्यक्तीस्वातंत्र्य !
प्रतिदिन वाचा ‘भारतीय संस्कृती’ची तोंडओळख करून देणारी लेखमालिका !
‘दुसर्याची वस्तू ही आपली नाही. त्यामुळे ती आपण संमती न घेता उचलून आणणे, ही चोरी आहे. दारू पिणे निषिद्ध आहे. आई-वडिलांचा आदर करावा, मोठ्या माणसांचा मान राखावा, देव आपल्यावर नित्य लक्ष ठेवून असतो; म्हणून ‘त्याला आवडेल’, असेच वागावे. देवाला न आवडणारे कर्म म्हणजे पाप, तर परोपकार हे पुण्यकर्म आहे, कर्तव्य पार पाडणे, हे पुण्यकर्म नाही. ते आवश्यक कर्म आहे’, या विचारांना आदर्श मानणे, सहस्रो वर्षांपासून आदर्श मानत रहाणे, हे भारतीय संस्कृतीचे लक्षण आहे.
It is better to light a candle than curse the darkness (म्हणजेच अंधार अंधार म्हणून रडत रहाण्यापेक्षा निदान एक तरी दिवा प्रथम लावावा, हे बरे) या विचाराने ‘भारतीय संस्कृती’ हे छोटेसे पुस्तक आमच्या नव्या पिढीला भारतीय संस्कृतीची तोंडओळख व्हावी; म्हणूनच लिहून प्रकाशित करत आहोत. १२ जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘भारतीय संस्कृतीतील व्यक्तीजीवन आणि विविध प्रकारची बंधने अन् प्रकार’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(लेखांक २)
लेखांक १. वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/803164.html
२. विविध प्रकारची बंधने अन् प्रकार
२ उ. शारीरिक बंधने : प्रत्येक व्यक्तीने शारीरिक बंधने पाळणे हितावह असते. एकाच वेळी ४ पाहुणे आले. चहा ठेवा म्हटले, ‘४ कप’ ! इतक्यात एकजण म्हणाला, ‘मला बिनसाखरेचा हं !’ एकाने म्हटले, ‘मी चहा घेत नाही !’ तिसरा पाहुणा म्हणाला, ‘चहापेक्षा जिरे-धन्याचे पाणीच द्या.’ ४ पाहुणे ४ प्रकार ! एकाला मधुमेह असल्याने तो गोड चहा घेत नाही. एकाला उष्णतेचा त्रास झाला होता; म्हणून त्याने धने-जिर्याचे पाणी घेतले. जो चहा घेत नव्हता, त्याला कॉफी दिली. चौथ्याला साखर घालून चहा दिला. शरिराच्या विकारांनुसार आणि आवडी-निवडीनुसार प्रत्येकाचा आहार असतो. तसाच तो असावा. वृद्धांनी उपासतापास न्यून करावेत. आधीच शरीर दुबळे झालेले असते, त्यात आणखी उपवास करून शरिराला क्षीण का करावे ?
२ ऊ. मानसिक बंधन : ‘अहं’ म्हणजे मी. मी कसा, याविषयी माझ्याच आग्रही कल्पना म्हणजे ‘अहंकार’. आपल्या आग्रही मनाला आवरून कर्तव्यबुद्धीने वागणे, हे मानसिक बंधन आहे.
२ ए. आर्थिक बंधन : या सर्वांवर वरताण करणारे आणखी एक बंधन व्यक्तीगत जीवनात शक्तीमान आहे. काही गोष्टी कराव्याशा वाटतात; पण घडते वेगळेच ! ‘मनात येते हत्ती घोडे पालखीत बैसावे । देवाजीच्या मनात याला पायि चालवावे ।’, म्हणजे ‘माणसाच्या मनात किती काही इच्छा असल्या, तरी देवाच्या मनात जसे आहे तसेच घडते.’
अनेक गोष्टी मनात गर्दी करतात, हे घ्यावे, ते घ्यावे, असे होऊन जाते. १० लाखांची सदनिका घ्यावी, त्यात ५ लाखांचे ‘इंटिरियर डेकोरेशन’ (घर आतून सजवणे) करावे, ३ ते ४ लाखांची गाडी घ्यावी, विमानाने जगप्रवास करावा, असे काय काय मनात येते; पण पैसा कुठून आणणार ? हे आर्थिक बंधन कसे झुगारून लावणार ? पण संस्कृती सांगते, ‘आपण अशा आवाक्याबाहेरच्या अपेक्षा करून दुःखी होऊच नये.’ मृच्छकटिक नाटकात चारुदत्त म्हणतो,
दारिद्र्यान्मरणाद्वा मरणं मे रोचते न दारिद्र्यम् ।
अल्पक्लेशं मरणं दारिद्र्यमनन्तकं दुःखम् ।। – मृच्छकटिक, अंक १, श्लोक ११
अर्थ : दारिद्र्य आणि मरण यांतून मला मरण आवडेल, दारिद्र्य नाही; (कारण) मरणाने अल्प काळ दुःख होते, दारिद्र्यात मात्र अनंत काळ दुःख सोसावे लागते.
अर्थात् दारिद्र्य हे आर्थिक बंधन आहे. मुंबईत एका वृद्ध दांपत्याने आत्महत्या केली. का ? तर पैसा प्रचंड होता त्यांच्याजवळ ! ५० कोटी रुपये होते म्हणे; पण त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्याकडून पैसे काढून घेण्यासाठी त्यांना छळत, मारत असत म्हणे ! भारतीय संस्कृती मानते की, व्यक्तीगत जीवनाला आर्थिक बंधन हा एक प्रभावी अडसर आहे; म्हणून अमर्याद द्रव्य हेही दुःखाला कारण ठरते. द्रव्याचा रास्त उपयोग करून ते सत्कारणी लावण्याचे बंधन भारतीय संस्कृतीने घातले आहे.
जोडोनियां धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें वेच करी ।। – (तुकाराम गाथा, अभंग २८५४, ओवी १ आणि २)
(अर्थ : योग्य मार्गाने पैसा मिळवावा; पण त्या पैशालाच लिप्त राहू नये. अलिप्तपणाने तो खर्च करावा.)
हे आर्थिक बंधन आहे. ‘उदास विचारें वेच करी ।’, म्हणजे ‘पैसा अलिप्तपणाने योग्य तेथे खर्च करावा.’ याचाच अर्थ हाती पैसा आहे; म्हणून उधळू नकोस, चैन-विलास-व्यसनांत अनाठायी खर्च करू नकोस.
३. व्यक्तीस्वातंत्र्य
भारतातील प्रत्येक व्यक्ती कायद्याने पूर्णपणे स्वतंत्र आहे. तरीही तिला कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक बंधने अटळ आहेत, म्हणजेच तिचे व्यक्तीस्वातंत्र्य मर्यादित आहे. कौटुंबिक बंधनांमुळे मनुष्य घरच्या सर्वांना टाकून निघून जाऊ शकणार नाही. खरे तर ही बंधने, म्हणजे त्याच्या वागणुकीच्या मर्यादा आहेत. अमर्याद व्यक्तीस्वातंत्र्य पाश्चात्त्य देशांत आहे. त्यांच्या स्वातंत्र्याला सांस्कृतिक मर्यादा नसल्या, तरी शारीरिक, मानसिक आणि आर्थिक मर्यादा आहेतच. राजकीय मर्यादा तर कुणालाच चुकलेली नाही.
अमेरिकेत ५० टक्के विवाह वर्षाभरात मोडतात म्हणे. मुख्यतः कारण Individualism म्हणजे व्यक्तीस्वातंत्र्यवाद. मी काय खावे ? कुठे जावे ? कुणाशी लग्न करावे ? केव्हा घरी यावे ? तसेच आपल्या एखाद्या मैत्रिणीसमवेत फिरायला जावे कि नाही ? यावर तेथे सांस्कृतिकदृष्ट्या काहीही बंधन नाही.
३ अ. व्यक्तीस्वातंत्र्यांच्या मर्यादा ! : ‘मी केव्हाही घरात येईन, केव्हाही जाईन, कुठेही जावे, काहीही खावे, काहीही घ्यावे, काहीही करावे. मी कसे वागावे, यावर कोणतेही नियंत्रण नसावे’, असे भारतीय संस्कृतीला मान्य नाही. पूर्वी तर मी कोणता व्यवसाय करावा, हे माझ्या जन्मजातीवरून ठरत असे. आता आपण ती मर्यादा तोडली आहे. कुणीही कोणताही व्यवसाय करावा. त्याचा जन्माशी वा जातीशी संबंध नाही, असे जीवन आता चालू आहे. पूर्वीच्या पद्धतीचा हेतू प्रामुख्याने अर्थशास्त्रीय, समाजशास्त्रीय आणि वंशशास्त्रीयही होता.
(क्रमशः उद्याच्या दैनिकात)
– पू. भारताचार्य धर्मभूषण प्रा. सुरेश गजानन शेवडे
(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)
लेखांक ३. वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/803954.html