माऊलींचा रथ ओढण्याचा मान आळंदीच्या कुर्हाडे कुटुंबियांच्या बैलजोडीला !
पुणे – येत्या २९ जून या दिवशी पंढरपूरकडे माऊलींची पालखी रवाना होणार आहे. देशासह राज्यभरातून आळंदीत वारकरी येत असतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची जय्यत सिद्धता आळंदी नगरीत चालू आहे. या वैभवशाली पालखी सोहळ्यासाठी यंदा माऊलींचा चांदीचा पालखी रथ ओढण्याचा मान आळंदीच्या कुर्हाडे कुटुंबियांच्या हौश्या आणि बाजी या बैलजोडीला मिळाला आहे. २५ वर्षांनंतर हा मान कुर्हाडे कुटुंबियांना मिळाला आहे. यामुळे कुर्हाडे परिवार आनंदी झाला आहे. ही बैलजोडी माऊलींच्या पालखी रथासोबत आळंदी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते आळंदी असा प्रवास करणार असून त्यासाठी बैलजोडीचा नियमित सराव चालू आहे.
कुर्हाडे कुटुंबियांची ही तिसरी पिढी आहे, ज्यांना यंदाच्या पालखी सोहळ्याचा मान मिळाला आहे. बैलजोडीच्या मानासाठी कुर्हाडे परिवाराकडून ७ अर्ज आले होते. सहादू बाबुराव कुर्हाडे यांच्या बैलजोडीला मान मिळाला आहे.