जलसंपदा विभागाच्या वतीने धरणांच्या सुरक्षिततेचे अन्वेषण

कृष्णा खोर्‍यातील ९०० धरणे सुरक्षित !

प्रतीकात्मक छायाचित्र

पुणे – मोसमी पाऊस यंदा लवकर चालू झाल्याने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने कृष्णा खोरे विकास महामंडळातील छोटी, मोठी आणि मध्यम अशा ९०० धरणांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्वेषण केले. किरकोळ दुरुस्तीसह विविध उपाययोजनाही पूर्ण केल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले. पावसाचा अंदाज पाहून धरणातील पाण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी जलसंपदा विभागाने नियोजन केले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी देणे, पूरस्थितीचा फटका बसणार्‍या नागरिकांचे स्थानांतर करणे, जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधणे अशी दायित्वे पार पाडण्यासाठी जलसंपदा विभाग सज्ज असल्याचे जलसंपदा पुणे विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांनी सांगितले.

धरणांची तपासणी म्हणजे धरणांचे स्थापत्य विषयक लेखापरीक्षण ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात करावे लागते. या अहवालावर धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन केले जाते. यासह धरणातील गळती मोजणे, सांडवा धरणाचे वरील आणि खालील पिचिंग, दरवाज्याची स्थिती, देखभाल दुरुस्ती, वीजपुरवठा, जनरेटर सुविधा अशा विविध घटकांचे अन्वेषण यांमध्ये होते. देशभरातील धरणांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी धरणे पुनर्वसन आणि सुधारणा प्रकल्पामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील उजनी, डिंभे, भाटघर, राधानगरी यांसह सातार्‍यातील ४ धरणांचा समावेश आहे. या धरणाच्या दुरुस्तीसाठी जागतिक बँकेकडून निधी उपलब्ध होणार आहे.