अनियमिततेच्या प्रकरणी कृषी केंद्राचा परवाना निलंबित करण्यासाठी प्रस्ताव
छत्रपती संभाजीनगर – तालुक्यातील कृषी विभागाच्या भरारी पथकाने सोयगाव तालुक्यातील तिडका येथील ‘गणेश कृषी सेवा केंद्रा’ला ९ जून या दिवशी अचानक भेट देऊन पडताळणी केली. यात कृषी निविष्ठा केंद्र अनधिकृतरित्या स्थलांतरित केल्याचे निदर्शनास आले.
बियाणे, खते आणि कीटकनाशके विक्री केंद्राचा व्यवसाय करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी तिडका येथील जागेत परवाना दिलेला होता. संबंधित विक्रेत्याने कृषी विभागाला न कळवता तिडका गावातील मारुति मंदिरातील एका गाळ्यात दुकान चालू केल्याचे निदर्शनास आले. विक्रेत्याने बियाणे साठा नोंदवही ठेवलेली नाही, प्रमाणित केलेले नाही, विक्री देयकावर शेतकर्यांच्या स्वाक्षर्या नाहीत. त्यामुळे संबंधितांचा बियाणे परवाना निलंबित करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे अहवाल सादर केला आहे.