धर्मकार्याचा अखंड ध्यास असलेले चेंबूर (मुंबई) येथील जगप्रसिद्ध प्रवचनकार भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे (वय ८९ वर्षे) संतपदी विराजमान !

  • सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केली आनंददायी घोषणा !

  • रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पार पडला हृद्य सोहळा !

डावीकडून पू. पृथ्वीराज हजारे पू. भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांचा सन्मान करतांना

रामनाथी (फोंडा, गोवा), १२ जून (वार्ता.) – चेंबूर, मुंबई येथील जगप्रसिद्ध प्रवचनकार आणि धर्मभूषण भारताचार्य प्रा. सुरेश गजानन शेवडे (वय ८९ वर्षे) ११ जून २०२४ या दिवशी संतपदी विराजमान झाले. सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात हा हृद्य सोहळा पार पडला. आश्रमातील काही साधकांसाठी भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे (आबा) यांच्या प्रवचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रा. शेवडे यांनी ‘हिंदु धर्माची महती आणि सनातनच्या आश्रमात आलेले अनुभव’ यांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी प्रा. सु.ग. शेवडे संत झाल्याची आनंदवार्ता घोषित केली. सनातनचे पू. पृथ्वीराज हजारे यांनी  प्रा. सु.ग. शेवडे यांचा पुष्पहार घालून, तसेच शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला. यानंतर पू. भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले यांनी पू. शेवडे यांच्याविषयीच्या आठवणी सांगितल्या. याप्रसंगी पू. शेवडेगुरुजी यांचे पनवेल (जिल्हा रायगड) येथील मानसपुत्र श्री. अनंत कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी सौ. प्राची कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. राम होनप, ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निषाद देशमुख आणि ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) मधुरा भोसले यांनी पू. शेवडेगुरुजी यांच्याविषयी केलेल्या सूक्ष्म परीक्षणात जाणवलेली सूत्रे सांगितली. पुढे पू. शेवडेगुरुजी यांच्या सेवेशी संबंधित असलेले साधक श्री. भूषण कुलकर्णी, सौ. अनन्या पाटील आणि श्री. दीप पाटणे यांनी पू. शेवडेगुरुजी यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे सांगितली. (साधकांनी पू. शेवडेगुरुजी यांच्याविषयी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये, तसेच सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांनी केलेली सूक्ष्म परीक्षणे लवकरच प्रसिद्ध करत आहोत. – संपादक)

संत म्हणून घोषित होण्यापूर्वी भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांनी केलेले मार्गर्शन !

उपस्थित साधकांशी संवाद साधतांना डावीकडून पू. भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे, मध्यभागी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले

१. सनातन संस्थेच्या आश्रमात आनंद मिळून ईश्वरनिष्ठा वाढते !

माझ्यावर ईश्वराची अलौकिक कृपा आहे. माझ्याकडे ईश्वराचे लक्ष आहे. सनातन संस्थेच्या आश्रमात आनंद आणि समाधान असून येथे रहायला लागल्यावर ईश्वरनिष्ठा वाढते. त्यामुळे ‘सनातन संस्थेच्या आश्रमात आवडणार नाही’, असे काहीच नाही. आश्रमात आल्यावर माझे स्वागत करण्यात आले, यापेक्षा वेगळा आनंद तो काय ? असे असतांना येथे (आश्रमात) जर कुणाला काही आवडले नाही, आनंद मिळाला नाही किंवा समाधान मिळाले नाही, तर आपण भिकारी आहोत, असे त्याने समजावे. ईश्वराला जे प्रिय आहे, ते सनातनच्या आश्रमात आहे. शास्त्र, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, समर्थ रामदासस्वामी, प्रत्यक्ष भगवंत आणि वेद यांनी जे सांगितले, ते आज प्रत्यक्ष ईश्वररूपाने अवतरलेले प.पू. डॉ. आठवले सांगत आहेत. अशा ईश्वराकडे आपण आलो आहोत, यापेक्षा भाग्य ते काय ?

२. ‘धर्म’ हा ईश्वरनिर्मित, तर पंथ हा मानवनिर्मित असतो !

मला अमेरिकेमध्ये ‘जागतिक हिंदु परिषदे’त भाषण करण्याची संधी मिळाली. तिकडे जाण्यासाठी मला ‘व्हिसा’ आणि पारपत्र लागणार होते. ते मिळण्याची प्रक्रिया ही केवळ २ दिवसांत पार पडली आणि ५ व्या दिवशी मी अमेरिकेला मार्गस्थ झालो. ही माझ्यासाठी देवाने दिलेली मोठी अनुभूती होती. त्या परिषदेत मी धर्माविषयी भाषण केले.

‘केवळ ‘हिंदु’ हा ‘धर्म’ आहे, तर इतर सर्व पंथ (रिलिजन) आहेत. इंग्रजीमध्ये ‘धर्म’ हा शब्दच नाही. ‘धर्म’ आणि ‘रिलिजन’ यांतील महत्त्वाचा भेद म्हणजे ‘धर्म’ हा देवाने निर्माण केला आहे, तर ‘रिलिजन’ हा शब्द मानव-निर्मित आहे. ‘ख्रिस्ती’ हा पंथ येशू ख्रिस्ताने निर्माण केला, तर महंमद पैगंबर यांनी ‘इस्लाम’ पंथ निर्माण केला. ज्या देवाने या विश्वाची निर्मिती केली, त्याच देवाने हिंदु धर्माची निर्मिती केली आहे. संपूर्ण विश्वालाच धर्म आहे. धर्म केवळ माणसांनाच नसतो, तर तो पदार्थ आणि जनावरे यांनासुद्धा असतो. ‘आचारधर्म कुणी बनवला ? प्राणी, लाकूड, वस्तू, पुरुष आणि स्त्री यांनी एकमेकांशी कसे वागावे ?’, याविषयीचे मार्गदर्शन ईश्वराने वेदांमध्ये केले आहे.

२ अ. लाकडाचा धर्म  : लाकूड पाण्यात पडले, तर तरंगते आणि आगीत पडले, तर जळते. हा लाकडाचा धर्म आहे. ज्या ईश्वराने त्या लाकडाला जन्माला घातले, त्याच ईश्वराने ‘त्याने कसे वागावे ?’, हेसुद्धा ठरवले.

२ आ. जनावरांचा धर्म : धर्म हा केवळ मानवालाच नाही, तर जनावरांनासुद्धा आहे आणि ते अधिक प्रमाणात धर्म पाळतात. बैल गायीकडेच पहातो, कधी म्हशीकडे पहात नाही. माणूस मात्र कुणाकडेही पहातो !


पू. सु.ग. शेवडे यांनी आश्रमात रहायला येणे, हा ईश्वरी योग ! – डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले

डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले

कोरोना महामारीपूर्वी प.पू. भक्तराज महाराज यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या अंतर्गत पनवेल येथे कार्यक्रमाचे नियोजन करणे चालू होते. त्या वेळी प्रवचनाच्या दृष्टीने पू. आबांची आम्ही भेट घेऊन निमंत्रण दिले आणि त्यांनी ते स्वीकारून ते कार्यक्रमाला येण्यास सिद्ध झाले. पुढे त्यांची माझी भेट श्री. अनंत कुलकर्णी यांच्या मुलाच्या विवाहाच्या वेळी झाली. यानंतर तिसर्‍यांदा माझा त्यांच्याशी भ्रमणभाषवर संपर्क झाला तो त्यांची धर्मपत्नी सौ. सुमंगला यांना देवाज्ञा झाली त्या वेळी. त्या वेळी प.पू. डॉक्टरांनी त्यांना पत्र लिहिले, ते त्यांना पुष्कळ भावले. काही दिवसांपूर्वी श्री. अनंत कुलकर्णी यांचा भ्रमणभाष आला की, आबांना सनातनच्या आश्रमात रहायला यायचे आहे आणि त्याच्याच आदल्या दिवशी प.पू. डॉक्टर मला म्हणाले, ‘‘शेवडेगुरुजींचे ग्रंथ किती सोपे आणि सुलभ आहेत. आपण त्यांना येथे बोलावूया.’’

‘पू. आबांनी सनातनच्या आश्रमात रहायला येणे, हा ईश्वरी योग आहे’, हेच यातून आपल्याला कळते.

संत घोषित झाल्यानंतर पू. भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांनी व्यक्त केलेले मनोगत !

पू. भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

‘मी संत झालो, म्हणजे मोठा झालो, असे मला वाटत नाही. मला येथे प.पू. डॉ. आठवले यांच्या छत्रछायेखाली आईचे प्रेम मिळाले. आजपर्यंत मी जी काही धर्म आणि ईश्वर यांच्याविषयी श्रद्धा जोपासली, त्यातील परमोच्च स्थान मिळाले, याचा मला आनंद आहे, तसेच मी भाग्यवान आहे. प्रत्यक्ष ईश्वराच्या अवताराने माझे कौतुक केले, हे माझे सौभाग्य आहे.’

श्री. अनंत कुलकर्णी (पू. शेवडेगुरुजी यांचे मानसपुत्र), पनवेल, जिल्हा रायगड यांनी व्यक्त केलेले मनोगत

श्री. अनंत कुलकर्णी

पू. आबांची आणि माझी ओळख वर्ष १९८५ पासून आहे. मी त्यांना सनातन संस्थेचे विविध उपक्रम आणि संस्थेकडून होत असलेले कार्यक्रम यांची माहिती सांगत असतो. त्यांना संस्थेचे कार्य पुष्कळ आवडते. पू. आबा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहायला आले, तेव्हापासून ते सेवा आणि साधना यांचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून आश्रमाचे कौतुक करतात. ते कायम म्हणतात, ‘‘आश्रमात काय कमी आहे ? याची सूचीच करू शकत नाही.’’

सौ. प्राची अनंत कुलकर्णी, पनवेल, जिल्हा रायगड यांनी व्यक्त केलेले मनोगत 

सौ. प्राची कुलकर्णी

पू. आबांचा जो मला सहवास लाभला, तो एकदम घरासारखा आहे. ते मला सून मानून माझ्याकडून त्यांना अपेक्षित असलेली सेवा करवून घेतात. (या वेळी सौ. प्राची कुलकर्णी यांचा भाव जागृत झाला.)