शेवटपर्यंत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अखंड अनुसंधानात असणारे सनातनचे ४६ वे (समष्टी) संत पू. (कै.) भगवंत कुमार मेनराय !
सनातनचे ४६ वे (समष्टी) संत पू. (कै.) भगवंत कुमार मेनराय (वय ८५ वर्षे) यांच्या देहत्यागानंतरचा आज १० वा दिवस आहे. त्या निमित्ताने…
‘मूळचे फरिदाबाद (हरियाणा) येथील आणि आता रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहाणारे पू. भगवंत कुमार मेनराय रुग्णाईत असतांना त्यांची कन्या सुश्री (कु.) संगीता मेनराय यांना त्यांच्याविषयी जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. रुग्णालयात अतीदक्षता विभागात भरती असतांनाही सतत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अखंड अनुसंधानात असल्यामुळे पुष्कळ आनंदी दिसणे
‘२४.५.२०२४ या दिवशी पू. पिताजींना (माझ्या वडिलांना (सनातनचे ४६ वे (समष्टी) संत पू. भगवंत कुमार मेनराय यांना)) गोवा येथील मणिपाल रुग्णालयातील अतीदक्षता विभागात भरती केले होते. २६.५.२०२४ या दिवशी मला त्यांच्या चेहर्यावर पुष्कळ आनंद जाणवत होता. मी त्यांना या आनंदाचे कारण विचारल्यावर ते मला म्हणाले, ‘‘आताच प.पू. डॉक्टर मला भेटून गेले.’’ प्रत्यक्षात प.पू. डॉक्टर रामनाथी आश्रमातच होते. यावरून ‘तीव्र शारीरिक त्रासातही पू. पिताजींचे मन श्री गुरूंच्या अखंड अनुसंधानात होते’, असे मला जाणवले. पू. पिताजींना रुग्णालयात भरती केल्यापासून त्यांना त्रास होत असूनही त्यांचे हात शेवटपर्यंत नमस्काराच्या मुद्रेतच होते. शेवटचे ४ दिवस ते पूर्वीपेक्षाही अधिक आनंदी दिसत होते.
२. लहान बाळाप्रमाणे निरागस दिसून चेहर्यावर स्मितहास्य असणे
मागील १५ दिवसांपासून त्यांची स्थिती लहान बाळासारखी झाली होती. त्यांचे हसणे लहान निरागस बाळासारखे वाटत होते. तीव्र शारीरिक त्रास होत असूनही ते झोपल्यावरही त्यांच्या चेहर्यावर स्मितहास्य दिसायचे. तेव्हा मला वाटायचे, ‘ते ईश्वर किंवा श्री गुरु यांच्या अनुसंधानात आहेत.’ रुग्णालयात असतांना अधूनमधून मी त्यांचे हात-पाय, कंबर दाबून देत असे. तेव्हा मला त्यांचा स्पर्श लहान बाळासारखा जाणवायचा. त्यांची त्वचा लहान बाळाप्रमाणे कोमल झाली होती.
३. गंभीर रुग्णाईत असतांनाही प्रत्येक कृती योग्य आणि आदर्श करण्याचा प्रयत्न करणारे पू. पिताजी !
पू. पिताजींना पुष्कळ अशक्तपणा येऊन त्यांची शक्ती क्षीण झाली होती. कधीकधी ते पूर्ण शुद्धीतही नसायचे. त्यांना त्यांचा हात वर करता येत नसे, तरीही त्यांना खोकला आल्यावर ते स्वतःचा हात तोंडासमोर धरण्याचा प्रयत्न करायचे. त्यांना पातळ पदार्थ देण्यासाठी नाकातून नळी घातली होती. ‘त्यांनी ती नळी काढू नये’, यासाठी रुग्णालयात त्यांचे हात हलकेसे बांधले होते. मी झोपल्यावर रात्री मधेच त्यांनी मला उठवले आणि त्यांचे हात सोडायला सांगितले. त्यांचा हात सोडल्यावर त्यांना खोकला आला, तेव्हा त्यांनी त्यांचा हात स्वतःच्या तोंडासमोर नेण्याचा प्रयत्न केला. यावरून ते ‘संत म्हणून प्रत्येक कृती आदर्शच करत होते’, असे माझ्या लक्षात आले.
४. सतत इतरांचा विचार करणे
त्यांना पुष्कळ अशक्तपणा आल्यामुळे त्यांचे बोलणे अस्पष्ट झाले होते. तरीही त्यांचे जेवण आल्यावर ते त्यांच्या समवेत आलेल्या प्रत्येक साधकाचे नाव घेऊन मला विचारायचे, ‘ते जेवले का ?’ मी किंवा आमच्या समवेत असलेल्या साधकांचे जेवण झाले नसेल, तर ते आम्हाला जेवून यायला सांगायचे.’
त्यांच्यात आज्ञापालन आणि इतरांचा विचार हे गुण पुष्कळ प्रबळ होते. ‘संतांमध्ये साधना किती मुरलेली असते ? ते कुठल्याही स्थितीत योग्य तसेच वागतात’, हे मला वरील प्रसंगांतून शिकता आले.’
– सुश्री (कु.) संगीता मेनराय (मधली मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (५.६.२०२४)