‘कलेतून ईश्वरप्राप्ती’ कशी होते, याची झलक दर्शवणारे साधिकांनी ब्रह्मोत्सवादिवशी सादर केलेले नृत्य !
११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी साधिकांनी श्रीविष्णूच्या दशावतारांवर आधारित नृत्य सादर केले. हे नृत्य पहातांना ‘सात्त्विक नृत्या’विषयी माझे चिंतन झाले.
‘संगीतकलेतून ईश्वरप्राप्ती’ हे ध्येय साध्य होण्याच्या दृष्टीने अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाच्या वतीने संशोधनात्मक प्रयोग आणि अभ्यास केला जातो. ‘कलेला तम-रज स्थितीतून सात्त्विकतेकडे नेणे आणि शेवटी केवळ ‘ईश्वरप्राप्तीसाठीच कला’ या स्थितीपर्यंत येणे’, असा हा प्रवास आहे. यासाठी समाजात प्रबोधनही केले जाते. ११.५.२०२३ या दिवशी झालेल्या सात्त्विक नृत्यात वरील हेतू साध्य झाल्याचे मला अनुभवायला मिळाले. नृत्य सादर करणारे कलाकार, त्यांचे पोषाख, अलंकार आणि शृंगार, नृत्याचे पदन्यास, हावभाव (अभिनय) नृत्याचे संगीत, प्रेक्षकवर्ग आणि नृत्य सादरीकरणाचे स्थल असे सर्वच घटक सात्त्विक होते.
१. ब्रह्मोत्सवात साधिकांनी श्रीविष्णूचे दशावतार दर्शवणारे सात्त्विक नृत्य सादर करणे
‘सात्त्विक नृत्य’ म्हणजे ‘सत्शी संबंधित नृत्य.’ ‘दशावतार’ म्हणजे भगवान श्रीविष्णूच्या विविध अवतारांशी संबंधित नृत्य. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अंशावतार आहेत’, असे महर्षींनी सांगितले आहे आणि साधकांचा भावही तसाच आहे. त्यामुळे ‘श्रीविष्णूचे दशावतार’ या नृत्याच्या वेळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी त्यांच्या अवतारी कार्याचेच वर्णन सादर करत आहोत’, असा नृत्य करणार्या साधिकांचा भाव होता.
२. साधिकांच्या हालचाली आणि पदन्यास समान असणे
या नृत्यात सहभागी असलेल्या १० पैकी ३ साधिकांना शास्त्रीय नृत्याचे ज्ञान होते. उर्वरित साधिकांना ते नव्हते, तरीही सर्वच साधिकांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर सुंदररित्या नृत्य सादर केले. सर्व साधिकांच्या हालचाली आणि पदन्यास एकसारखे होत होते. सामूहिक नृत्य असल्याने सर्वांचे हातवारे, पदन्यास समान येण्याला पुष्कळ सराव आणि नृत्याचे ज्ञान असणे आवश्यक असते. सर्वांच्या चेहर्यावरील हावभाव आणि त्यांचा अभिनय भगवंतभक्तीचे स्मरण करून देणारा आणि आनंददायी होता. सर्वजणी लयबद्धतेने नृत्य करत होत्या.
३. नवरसांचे उत्तम सादरीकरण
साधिकांच्या चेहर्यावर नवरसांचे उत्तम सादरीकरण होते. साधिका ईश्वरासमोर नृत्य करत असतांनाचा आनंद अनुभवत आहेत’, असे मला अनेकदा जाणवले. त्यांनी श्रीकृष्णाचा खट्याळपणा, परशुरामाचे धीर-गंभीर रूप, मंत्रमुग्ध गोपी, शेषरूप आणि पहुडलेले श्रीविष्णु अतिशय सुरेखरित्या सादर केले गेले.
४. सजीव मुद्रांनी युक्त मुद्राभिनय
साधिकांनी नृत्य करतांना विविध ठिकाणी साकारलेल्या मुद्रा सजीव वाटत होत्या, उदा. श्रीविष्णूच्या चतुर्भुज रूपातील कमळाची आकृती दर्शवणारी शास्त्रीय नृत्यप्रकारातील ‘अलपदम्’ मुद्रा, श्रीविष्णूचा शंख दर्शवणारी ‘मुष्ठि’ मुद्रा इत्यादी. अशा प्रकारे या नृत्यात सादर केलेल्या मुद्रा पहातांना ‘संबंधित देवतेचे तिथे तत्त्व अवतरले आहे’, असेच मला जाणवत होते. नृत्यात मुद्रा करतांना कलाकाराचा भाव असेल, तरच संबंधित तत्त्व अधिक प्रमाणात आणि अधिक काळ अनुभवायला येते’, असे मला जाणवले.
५. चेहर्यावरील सुंदर हावभाव !
५ अ. सर्वच साधिकांच्या चेहर्यांवर सुंदर हावभाव असणे : नृत्याचे सादरीकरण करतांना चेहर्यावरील हावभावाला महत्त्व असते. चेहर्यावर हावभाव उत्तमरित्या येण्यासाठी शास्त्रीय नृत्य शिकलेल्यांनाही पुष्कळ प्रयत्न करावे लागतात. देवतांवर आधारित नृत्याभिनय सादर करतांना देवतांप्रतीचा भाव चेहर्यावर येण्यासाठी कलाकाराला विशेष प्रयत्न करावे लागतात. सर्वच कलाकारांना ते जमेल, असे नाही. प्रत्यक्षात ब्रह्मोत्सवात श्रीविष्णूचे अवतार नृत्याभिनयाद्वारे साकारतांना नृत्य शिकलेल्या ३ साधिकांसमवेतच नृत्यज्ञान नसलेल्या उर्वरित ७ साधिकांच्या चेहर्यावरही सुंदर हावभाव होते. जणू ‘त्या नृत्यात पारंगत आहेत’, असेच वाटत होते. सर्व साधिकांनी नृत्य भावपूर्णरित्या सादर केले. (सर्वच साधिका किमान ५ वर्षांपेक्षाही अधिक काळ साधनारत आहेत. त्यात काही दैवी बालिका होत्या, तर काही साधिकांचा आध्यात्मिक स्तरही चांगला आहे. )
५ आ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेल्या साधिकांच्या भावामुळेच त्यांना हावभाव आणि अभिनय सहज जमला आहे’, असे वाटून ‘कलाकारांनी भक्ती करणे, साधना करणे किती महत्त्वाचे आहे !’, हे माझ्या लक्षात आले. (क्रमश:)
– होमिओपॅथी वैद्या (सुश्री (कु.)) आरती तिवारी, (भरतनाट्यम् विशारद) महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (११.६.२३)
भाग २ : https://sanatanprabhat.org/marathi/805774.html
|