सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात शिकायला मिळालेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
‘श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात आम्हाला पुष्कळ सूत्रे शिकायला मिळतात. साक्षात् नारायणाचा सत्संग मिळणे, ही आमच्यासारख्या पामरांवर परात्पर गुरुदेवांनी केलेली अपार प्रीतीच आहे. त्यांच्याकडून शिकायला मिळालेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे मी त्यांच्या चरणी अर्पण करते.
१. ‘परात्पर गुरु डॉक्टर साक्षात् श्रीविष्णूचे अंशावतार आहेत’, हे लक्षात येणारे प्रसंग
१ अ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या देहात संपूर्णतः श्रीविष्णुतत्त्व अवतरित झाल्यामुळे त्यांच्या देहाशी घर्षण होऊन निर्माण झालेला नादही दैवीच असणे : ‘पूर्वी एकदा सत्संगाच्या वेळी परात्पर गुरुदेव चित्रीकरण कक्षात आले नव्हते; परंतु त्यांना ‘जीटू माईक’ (ध्वनीवर्धक) लावला होता. ते चित्रीकरण कक्षाच्या बाहेर आल्यावर त्या माईकचे घर्षण झाले आणि एक नाद उत्पन्न झाला. मला तो नाद पुष्कळ दैवी जाणवून तो ‘कृष्णविवर’ या नादाप्रमाणे जाणवला. हा नाद ऐकून माझे मन निर्विचार झाले. यावरून माझ्या लक्षात आले की, ‘परात्पर गुरुदेवांच्या देहात संपूर्णतः श्रीविष्णुतत्त्व अवतरित झाल्यामुळे त्यांच्या देहाशी घर्षण होऊन निर्माण झालेला नादही दैवीच आहे.’
१ आ. साधकांनी ऋषिमुनी, साधू आणि धृवबाळ यांच्यासारखी तपश्चर्या न करताही साधकांवर सदैव श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांची सूक्ष्मदृष्टी असणे : ‘श्रीमन्नारायणाची दृष्टी आपल्यावर पडावी’, यासाठी ऋषिमुनी आणि साधू अनंत जन्म तप करायचे. धृवबाळानेही कठीण तपश्चर्या केली; परंतु साधकांना असे काहीच करावे लागले नाही, तरीही श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांची दृष्टी सूक्ष्मातून सदैव साधकांवर असते आणि आपण ती स्थुलातूनही अनुभवली आहे. याविषयी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
१ इ. श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉक्टर आणि साधक यांच्या भेटीच्या वेळी सप्तर्षी अन् महर्षीही सूक्ष्मातून सत्संग ऐकण्यास येणे : पूर्वी सप्तर्षी आणि महर्षि श्रीमन्नारायणांची वाणी ऐकण्यास सत्संगात उपस्थित असायचे. त्याचप्रमाणे आता ‘कलियुगात श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरुदेवांचा साधकांसाठी सत्संग असतो, तेव्हा सप्तर्षी आणि महर्षि सूक्ष्मातून सत्संग ऐकण्यास आले आहेत आणि ‘देव साधकांना काय सांगतो ?’, हे ऐकण्यासाठी ते पुष्कळ उत्सुक आहेत’, असे मला जाणवले.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अंतःकरण साधकांविषयी प्रीती आणि कारुण्य यांनी भरलेले असणे
जेव्हा एखादा साधक चांगले प्रयत्न करतो आणि परात्पर गुरुदेवांना त्याविषयीचे आत्मनिवेदन करतो, तेव्हा गुरुदेवांच्या मुखकमलावर एक वेगळेच समाधान असते अन् ते त्याच्याकडे पुष्कळ कृपाळू दृष्टीने पहातात. ते पाहून माझीही भावजागृती होते. यावरून माझ्या लक्षात आले की, ‘देव भावाचा भुकेला आहे.’ त्याचप्रमाणे परात्पर गुरुदेवही साधकांमधील भाव पहातात. जेव्हा एखादा साधक त्यांना अपेक्षित असे प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ते म्हणतात ‘‘आता माझी काळजी मिटली.’’ खरंच नारायणाची आपल्यावर किती करुणा आहे ? परात्पर गुरु डॉक्टरांचे अंतःकरणच साधकांविषयीच्या प्रीतीने आणि कारुण्याने भरले आहे.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले हे सहजावस्थेत असूनही त्यांनी स्वतःची चूक स्वीकारणे
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव सहजावस्थेत असतात. एकदा ते बोलता बोलता म्हणाले, ‘‘माझे चुकले.’’ त्या वेळी मला जाणीव झाली की, ते साक्षात् परमेश्वर असूनही त्यांच्यात किती सहजता आहे ? आपण आपल्याकडून अनेक चुका झाल्या, तरीही ‘माझे चुकले’ असे म्हणत नाही.
‘हे गुरुदेवा, आपल्या सत्संगात आम्हाला अनेक सूत्रे शिकायला मिळतात, ती मला कृतीतही आणता येऊ देत. मला सतत शिकण्याच्या स्थितीत रहाता येऊ दे. ही सूत्रे तुम्हीच माझ्याकडून लिहून घेतलीत, त्याबद्दल आपल्या ब्रह्मांडव्यापी चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– परात्पर गुरुदेवांची,
कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
|