म्हापसा परिसरातील जीर्ण इमारतींकडे सरकारचे दुर्लक्ष
म्हापसा, ११ जून (वार्ता.) – पेटेचे भाट, खलपवाडा, म्हापसा येथील जीर्ण झालेल्या कोसकर अँड केसरकर इमारतीचा सज्जा कोसळल्याची घटना ७ जून या दिवशी घडली होती. यामुळे शहरातील खासगी आणि सरकारी जीर्ण इमारतींचे सूत्र पुन्हा ऐरणीवर आले आहे. इमारतींचे मालक आणि भाडेकरू यांच्यामधील गुंता सोडवता न आल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.
म्हापसा येथे धोकादायक इमारतीमध्ये सरकारी इमारतींची संख्या अधिक आहे. यामध्ये कोमुनिदाद प्रशासक इमारत, म्हापसा आयटीआय इमारत, सरकारी शाळा, जुन्ता हाऊस, सार्वजनिक बांधकाम खाते, पोलीस खाते, आरोग्य खाते, वीज खाते, ‘आझिलो’ रुग्णालय आणि सरकारी निवास यांचे गाळे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे गंगा अपार्टमेंट, सफारी हॉटेल, धेंपो टॉवर, बेलाविस्ता अपार्टमेंट यांसह शहरातील काही व्यावसायिक जुन्या एकमजली इमारतींचाही यांमध्ये समावेश आहे. काणकोण येथे वर्ष २०१४ मध्ये इमारत कोसळण्याची दुर्घटना घडल्यानंतर म्हापसा नगरपालिकेने शहरातील काही जीर्ण होऊन मोडकळीस आलेल्या इमारतींचे मालक आणि भाडेकरू यांना ‘गोवा नगरपालिका कायद्याचे कलम १० अंतर्गत नोटिसा बजावल्या होत्या. पालिका क्षेत्रात अनेक जुन्या इमारती भाडेकरूंच्या कह्यात आहेत. इमारतीच्या मालकांना नाममात्र भाडे मिळत असल्याने या इमारतींची दुरुस्ती आणि देखभाल यांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. काही ठिकाणी मालक आणि भाडेकरू यांच्यामधील वादामुळे काही इमारतींचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या इमारती अजूनही धोकादायक स्थितीत आहेत. वर्ष २०१९ मध्ये जुनी उपनिबंधक कार्यालयाची इमारत कोसळली होती आणि त्यानंतर पालिकेने जुनी मामलेदार कार्यालयाची इमारत पाडली होती; मात्र शहरातील इतर धोकादायक इमारतींविषयी पालिकेने कोणताच निर्णय घेतलेला नाही. म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्ष डॉ. नूतन बिचोलकर म्हणाल्या, ‘‘७ जून या दिवशी इमारतीचा सज्जा कोसळण्याच्या घटनेनंतर पालिकेने पालिका क्षेत्रातील जीर्ण झालेल्या इमारतींचे सर्वेक्षण करण्याचे ठरवले आहे. कनिष्ठ अभियंत्याच्या मार्फत हे काम केले जाणार आहे. पालिकेचे मुख्याधिकारी लवकरच सर्वेक्षणाच्या कामाची रूपरेषा निश्चित करणार आहे.’’