कर परताव्यापोटी केंद्राकडून गोव्याला ५३९ कोटी ४२ लाख रुपये

गोव्याला सर्वांत अल्प, तर उत्तरप्रदेशला सर्वाधिक २५ सहस्र ६९ कोटी ८८ लाख रुपये

पणजी – कर परताव्यापोटी केंद्राने राज्यांना एकूण १ लाख ३९ सहस्र ७५० कोटी रुपयांचा हप्ता घोषित केला आहे. जून २०२४ या महिन्यासाठीच्या नियमित हप्त्याव्यतिरिक्त एक अतिरिक्त हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे या महिन्यात वितरित करण्यात आलेली संचित रक्कम १ लाख ३९ सहस्र ७५० कोटी रुपये झाली आहे. यामुळे राज्य सरकारांना विकासाला आणि भांडवली खर्चाला चालना देता येईल.
२०२४-२५ या वर्षाच्या अंतरिम अर्थसंकल्पात राज्यांना कर हस्तांतरण रकमेपोटी १२ लाख १९ सहस्र ७८३ कोटी रुपयांचे प्रावधान आहे. त्यानुसार या आर्थिक वर्षासाठी १० जून २०२४ पर्यंत राज्यांना एकूण २ लाख ७९ सहस्र ५०० कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. या कर परताव्यामध्ये गोव्याला सर्वांत अल्प ५३९ कोटी ४२ लाख रुपये, तर उत्तरप्रदेशला सर्वाधिक २५ सहस्र ६९ कोटी ८८ लाख रुपये कर परतावा मिळाला आहे. गोव्याच्या शेजारच्या महाराष्ट्र राज्याला ८ सहस्र ८२८ कोटी ८ लाख रुपयांचा, तर कर्नाटकला ५ सहस्र ९६ कोटी ७२ लाख रुपयांचा हप्ता मिळाला आहे.