श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने
१. जीवनातील नित्य परीक्षेचे महत्त्व
‘समोर जी व्यक्ती आली, तीच आपला ‘गुरु’ आहे’, असे मानून साधना केली पाहिजे. ‘देव कुणाच्या रूपात येऊन आपली कधी परीक्षा घेईल ?’, हे सांगता येत नाही. त्यामुळे उत्तम शिष्य नेहमीच परीक्षेला सामोरे जाण्यासाठी सिद्ध असतो. देव कधी गुरूंच्या रूपाने परीक्षा घेतो, तर कधी सामान्य माणसाच्या रूपातही तो येतो. आपले नित्य जीवन हीच आपली एक परीक्षा आहे. तिला हसत हसत सामोरे जाणे, हीच आपली कसोटी आहे. जीवनातील मायेला भुलला, तो फसला आणि जीवनातील अध्यात्माचा शोध घेण्यासाठी जो जगला, तो जिंकला.
२. ‘संत, गुरु आणि सद्गुरु’, अशा देवाने दिलेल्या पदव्यांनी जीवनाचे सार्थक होते !
केवळ आधुनिक वैद्य आणि अभियंता अशा पदव्या घेऊन उपयोग होत नाही, तर अध्यात्मातील पदवी घ्यावी लागते, म्हणजेच अध्यात्मात साधना करून प्रगती करावी लागते. मगच देवाची पदवी संपादन करता येते. ‘संत, गुरु आणि सद्गुरु’, अशा देवाने दिलेल्या पदव्यांनी जीवनाचे सार्थक होते. गणित, भूगोल इत्यादी अशाश्वत विषयांमुळे नव्हे, तर गुरुकृपेमुळे आणि गुरूंची शिकवण कृतीत आणून साधना केल्याने मोक्ष मिळतो.
३. समाजाला मोक्षप्राप्ती करून देणार्या शिक्षण मंदिरांची नितांत आवश्यकता आहे !
‘भगवंताच्या नामाचे महत्त्व सांगणे, ‘ते कसे घ्यायचे ?’, हे शिकवणे’, हेच खरे शिक्षण आहे. मृत्यूनंतर डोक्यातील ‘गणित आणि विज्ञान’ या सर्व जडातील विषयांची राखरांगोळी होते. केवळ शाश्वत असणारे देवाचे नामच त्या जिवाच्या समवेत जाते. शाळेतील गुरूंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्तम गुरु हा जीवनातील खरा मार्गदर्शक आहे. ‘गुरूंचे महत्त्व जे शाळा शिकवत नाही, ती शाळा आणि ते शिक्षण काय कामाचे ?’, अशा जडातील निरर्थक शिक्षणाने लोकांचे अनेक जन्म वाया जातात. खरी शाळा ही मोक्षप्राप्ती करून देणारी आहे. आपल्या संस्कृतीमध्ये शाळेला मंदिराचा दर्जा दिला आहे. शाळेला ‘शिक्षण मंदिर’, असे संबोधले जाते. आजच्या समाजाला मोक्षप्राप्ती करून देणार्या शिक्षण मंदिरांची नितांत आवश्यकता आहे.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ