सनातन कुटुंबातील ‘कुटुंबप्रमुख’ या नात्याने सर्वच वयोगटांतील साधकांची मात्या-पित्यासम काळजी घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ (अर्थ : संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे) या उक्तीप्रमाणे स्वतः प्रत्येक क्षणी आचरण करतात आणि साधकांनाही तशाच प्रकारे आचरण करण्याची शिकवण देतात. सध्याच्या कलियुगात ३ – ४ जणांच्या कुटुंबातही एकमेकांशी न पटण्याचे प्रमाण अधिक आहे. असे असतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी सहस्रो साधकांना कुटुंबभावनेने एकत्र रहायला शिकवले. विविध प्रांतातील, विविध भाषिक अनेक साधक सनातन संस्थेच्या आश्रमांत एकत्रित रहातात, ते परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रीतीमुळे. सनातन कुटुंब घडण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतः पुष्कळ कष्ट घेतले आहेत आणि साधकांनाही कृतीच्या स्तरावर तसे प्रयत्न करायला शिकवले आहे. सनातन कुटुंबाचे ‘कुटुंबप्रमुख’ या नात्याने परात्पर गुरु डॉक्टर सर्वच वयोगटातील साधकांची कशी काळजी घेतात ? याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांवर करत असलेला प्रीतीचा वर्षाव

१ अ. वयस्कर साधक हळू चालत असल्याचे पाहून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतःची चाकाची आसंदी त्यांना घेऊन जाण्यासाठी देणे आणि ‘चालू न शकणार्‍या वयस्कर साधकांना चाकाच्या आसंदीत बसवून त्यांना आश्रम दाखवा’, असे सांगणे : एकदा एक वयस्कर साधक आजारपणामुळे हळू चालत होते. ते पाहून परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतःची चाकाची आसंदी त्यांच्यासाठी लगेच दिली आणि साधकांना त्यांना आसंदीत बसवून घेऊन जाण्यास सांगितले. परात्पर गुरु डॉक्टरांनी सहजतेने स्वतःची आसंदी साधकांसाठी उपलब्ध करून दिली. असे प्रसंग अनेकदा घडले आहेत. परात्पर गुरु डॉक्टर स्वतःच्या आचरणातून ‘साधक आणि त्यांच्यात अंतर आहे’, असे कधीही भासू देत नाहीत. अतिशय जवळच्या व्यक्तीसाठी आपण एखादी कृती करू, तशी कृती परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येक व्यक्तीसाठी तितक्याच सहजतेने आणि अतिशय प्रेमाने करतात. ज्या वयस्कर साधकांना चालणे शक्य होत नाही, त्यांना चाकाच्या आसंदीत बसवून आश्रम दाखवण्याच्या विषयीही आरंभी परात्पर गुरु डॉक्टरांनी सुचवले.

१ आ. पावसाळ्याच्या दिवसांत वयस्कर साधिकांनी केस धुतल्यानंतर त्यांना त्रास होऊ नये, यासाठी ‘हेयर ड्रायर’ उपलब्ध करून देण्यास सांगणे : पावसाळा चालू झाल्यावर डोकेदुखी, सर्दी, ताप यांसारखे शारीरिक त्रास वाढतात. आश्रमातील वयस्कर साधिकांनी केस धुतल्यानंतर त्यांचे केस लवकर न सुकल्यास त्यांना ‘सर्दी, डोकेदुखी किंवा ताप’, यांचा त्रास होऊ नये, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकांसाठी ‘हेयर ड्रायर’चा (केस सुकवण्यासाठी वापरले जाणार्‍या लहान यंत्राचा) वापर करण्यास सांगितले. त्यांनी ‘वयस्कर आणि रुग्णाईत साधिकांना त्रास होऊ नये’, या उद्देशाने ‘हेयर ड्रायर’ उपलब्ध करून द्यायला सांगितले. आईही इतकी काळजी घेऊ शकत नाही, अशा लहान लहान गोष्टींचा विचार परात्पर गुरु डॉक्टर साधकांच्या संदर्भात करतात.

१ इ. ‘साधकांना त्रास होऊ नये’, यासाठी आश्रमात उद्वाहकाची (लिफ्टची) सुविधा उपलब्ध करून देण्यास सुचवणे : पूर्वी परात्पर गुरु डॉक्टर पुष्कळ रुग्णाईत असतांनाही जिन्याने वर-खाली करायचे; मात्र ‘आश्रमातील वयस्कर आणि आजारी साधक यांना त्रास होऊ नये’, या उद्देशाने त्यांनी रामनाथी आश्रमात उद्वाहकाची (लिफ्ट) सुविधा उपलब्ध करून देण्यास सुचवणे.

१ ई. साधकांसाठी प्रसाधनगृहात आरसे बसवणे : आश्रमात घरी असतात, तसे मोठे आरसे नव्हते. साधकांना घरी मोठ्या आरश्यात पहाण्याची सवय असते. ते लक्षात घेऊन परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांसाठी प्रसाधनगृहात (कपाटाला असतो त्याप्रमाणे) मोठा आरसा लावायला सुचवले. कुटुंबातील प्रमुख व्यक्ती जशी घरातील प्रत्येकाच्या वयाचा विचार करून सर्व गोष्टी करते, त्याप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरही सहस्रो साधकांचे मोठे कुटुंब असूनही प्रत्येक वयोगटातील साधकांचा विचार करतात.

१ उ. घरी राहून सेवा करणार्‍या साधकांसाठी संतांना ठिकठिकाणी जाऊन नामजप करायला सांगणे : घरी राहून सेवा करणार्‍या साधकांचे आध्यात्मिक त्रास अल्प होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी संतांना महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आदी राज्यांतील विविध जिल्ह्यांत जाऊन त्यांना साधकांसाठी नामजप करायला सांगितले. ‘साधकांच्या साधनेतील आध्यात्मिक अडथळे दूर होऊन त्यांची साधना चांगली व्हावी’, या उद्देशाने त्यांनी संतांना प्रसारात जाण्यास सांगितले. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी मागे त्यांना ‘साधकांची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, असाच ध्यास असतो’, असे लक्षात येते.

१ ऊ. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये साधकांच्या अनुभूती छापून आल्यावर त्यांना प्रसाद देणे : एखाद्या साधकाची व्यष्टी साधना चांगली चालू असल्याविषयी एखादी अनुभूती किंवा लेख दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून आल्यास परात्पर गुरु डॉक्टर त्या साधकाला प्रसाद (खाऊ) देण्यास सांगून त्याचे कौतुक करतात. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृतीतून त्यांची साधकांच्या साधनेकडे लक्ष देऊन त्यांना साधनेत पुढे जाण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याची तळमळ लक्षात येते.

२. साधकांना घडवणे

२ अ. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना पोशाखातील सात्त्विक-असात्त्विक गोष्टी शिकवून नीटनेटकेपणे रहाण्यास शिकवणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना पोशाखातील अयोग्य आणि सात्त्विक-असात्त्विक गोष्टी लक्षात आणून दिल्या. त्यांनी साधकांना कपड्यांचे सात्त्विक रंग, नक्षी, शिवण आदी लहान गोष्टींविषयी सांगितले. साधकांच्या सदर्‍याचे दोरे किंवा साधिकांच्या ओढणीचे धागे निघालेले असल्यास ते कापणे, कपड्यांची उंची अल्प असल्यास ती वाढवून घेणे, आदी गोष्टींविषयी साधकांना सांगितले. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना नीटनेटकेपणे रहाण्यास अगदी सहजतेने शिकवले. त्यांनी याविषयी पुनःपुन्हा सांगितल्यामुळे या गोष्टी आता साधकांच्या अंगवळणी पडल्या आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांनी विविध वयोगटांतील सहस्रो साधकांची कधी आई, तर कधी वडील होऊन काळजी घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत.

२ आ. वयोवृद्ध आणि रुग्णाईत साधकांची काळजी घ्यायला शिकवणे : ‘तरुण साधकांनी वयोवृद्ध आणि रुग्णाईत साधकांची काळजी कशी घ्यायला हवी ?’, हे परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना स्वतःच्या आचरणातून शिकवले. परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतः त्यांच्या आई-वडिलांची सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण केली आहे. वयोवृद्ध आणि रुग्णाईत साधकांच्या सगुण सेवेचा साधनेसाठी होणारा आध्यात्मिक लाभ परात्पर गुरु डॉक्टरांनी समजावून सांगितल्याने साधक ती सेवा भावपूर्ण करू लागले. परात्पर गुरु डॉक्टरांनी या सेवेतील बारकावेही साधकांच्या लक्षात आणून दिले. स्वतः आदर्श कृती करून इतरांनाही आपल्याप्रमाणे आदर्श कृती करायला शिकवणार्‍या परात्पर गुरु डॉक्टरांविषयी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती अल्पच आहे.

२ इ. वयाने मोठ्या असणार्‍या साधकांसह बालसाधकांनाही स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवायला शिकवणे : आश्रमातील सर्व साधक स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतात. परात्पर गुरु डॉक्टरांनी बालसाधकांनाही चुका लिहायला शिकवण्यास सांगितले. यामुळे लहान वयातच बालसाधक स्वतःमधील स्वभावदोषांवर मात करण्यास शिकत आहेत. बालसाधकही मनापासून स्वभावदोष निर्मूलनासाठी प्रयत्न करत आहेत. केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळेच लहान वयातच बालसाधकांच्या मनात स्वतःमधील स्वभावदोषांवर मात करून स्वतःत पालट करून आध्यात्मिक प्रगती करण्याचे ध्येय निर्माण झाले आहे.

‘साधकांची प्रगती व्हावी’, यासाठी त्यांना निरपेक्षपणे साहाय्य करणार्‍या, स्वतःच्या अस्तित्वाने त्यांच्या जीवनात आमूलाग्र पालट घडवून आणणार्‍या परात्पर गुरु डॉक्टरांविषयी कितीही लिहिले, तरी ते अपुरेच आहे. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी कुटुंबप्रमुख या नात्याने जो आदर्श आम्हाला घालून दिला आहे, त्याप्रमाणे आम्हा सर्व साधकांचेही आचरण होऊ दे’, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’

– सौ. श्रद्धा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.१२.२०२२)