स्वातंत्र्यवीर सावरकर हे प्रखर राष्ट्रभक्त होते ! – अविनाश धर्माधिकारी
कोल्हापूर – स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमध्ये शिकत असतांना क्रांतीकारकांचे संघटन केले आणि भारतात विदेशी कपड्यांची पहिली होळी त्यांनी केली. वयाच्या १६ व्या वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांच्या जीवनाचे ध्येय निश्चित केले, तर वयाच्या २८ व्या वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली. देशासाठी सर्व अर्पण केलेले स्वातंत्र्यवीर सावरकर हे प्रखर राष्ट्रभक्त होते, असे मार्गदर्शन ‘चाणक्य मंडळ परिवारा’चे संस्थापक श्री. अविनाश धर्माधिकारी यांनी केले. ते ९ जून या दिवशी ‘आरिश चॅरिटेबल ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. राजवीर अजित नरके यांच्या वतीने ‘राष्ट्रभक्त सावरकर आणि आजचा युवा भारत’ या विषयावर ‘अमृतसिद्धी सांस्कृतिक भवन’ येथे आयोजित व्याख्यानात बोलत होते. या प्रसंगी शिवसेनेचे माजी आमदार श्री. चंद्रदीप नरके, ‘गोकुळ’चे संचालक श्री. अजित नरके, भाजपचे श्री. महेश जाधव यांसह अन्य उपस्थित होते.
१. ‘गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी सर्व स्वातत्र्यवीरांचे योगदान आहे’, असे सांगितले आहे. असे असतांना काही जण केवळ गांधीजींमुळे स्वातंत्र्य मिळाले, असे सांगतात. मदनलाल धींग्रा हे क्रांतीकारक होते; मात्र त्यांचा इतिहास आज शिकवला जात नाही. आज देशात सांस्कृतिक आणि राष्ट्रीय भान हरपले आहे. त्यामुळे तरुणांनी निश्चय करून ध्येय बाळगून भारतमातेसाठी कार्य करणे अपेक्षित आहे.
२. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा मिळालेली असतांनाही कारागृहात अलौलिक असे ग्रंथ त्यांनी लिहिले. स्वातंत्र्यवीर सावरकर हे उत्कृष्ट वक्ते होते. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपल्या सर्वांसाठी आदर्श आहेत. चाफेकर बंधू हे वयाच्या १६ व्या वर्षी फासावर गेले. याउलट आज १६ व्या वर्षी तरुण पिढी व्यसनाधिनतेकडे वळत आहे.
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. किरण दुसे यांनी श्री. अविनाश धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना ‘हिंदु राष्ट्र : आक्षेप आणि खंडण’, हा ग्रंथ भेट दिला. या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे, ‘गोकुळ’चे संचालक श्री. अजित नरके, ‘आरिश चॅरिटेबल ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. राजवीर अजित नरके उपस्थित होते. याच समवेत श्री. राजवीर नरके यांना ‘हलाल जिहाद ?’, आणि ‘लव्ह जिहाद’ हे ग्रंथही भेट देण्यात आले. |
संपादकीय भूमिकादेशातील पाठ्यपुस्तकांमध्ये सर्वच क्रांतीकारकांचा इतिहास शिकवला जाण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत ! |