ईश्वराप्रती नितांत श्रद्धा असलेले पू. भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे (वय ८९ वर्षे) !
‘पू. भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात काही दिवस वास्तव्याला आहेत. त्यांच्या समवेत असतांना माझ्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. आनंदी आणि उत्साही
पू. भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे (पू. आबा) यांच्यामध्ये आनंद आणि उत्साह ओतप्रोत भरला आहे. त्यांच्याकडून आनंदाचे प्रक्षेपण होत असते. ते प्रसंगावधान राखून विनोद करतात आणि हसवतात.
२. शिस्तबद्ध दिनक्रम
ते रात्री वेळेत झोपतात आणि सकाळी लवकर उठून वैयक्तिक आवरून नामस्मरण करतात अन् ‘गजानन सप्तशती’चा अध्याय वाचतात.
३. प्रेमभाव
पू. आबा सर्वांशी प्रेमाने बोलतात. त्यांनी अनेक जणांना जोडून ठेवले आहे. आबा त्यांची प्रेमाने आणि आपुलकीने विचारपूस करतात अन् त्यांना आधार देतात.
४. प्रत्येक परिस्थिती आनंदाने स्वीकारणे
एकदा आम्ही एका मंदिरात गेलो होतो. त्या वेळी तेथे आम्हाला उन्हात काही अंतर अनवाणी जावे लागले. तेव्हा पाय भाजत असतांनाही पू. आबा म्हणाले, ‘‘वाह ! वाह ! मजा येते.’’ ‘ते प्रत्येक परिस्थिती आनंदाने स्वीकारतात’, असे मला जाणवले.
५. साधकांचे कौतुक करणे
साधकांनी त्यांना प्रसाद, महाप्रसाद, तसेच औषधे दिल्यावर ते साधकांचे कौतुक करतात. ते म्हणतात, ‘‘तुम्ही साधक माझी किती काळजी घेता ! तुम्ही कोण लागता माझे ? तुम्ही एवढी लहान मुले सर्व सोडून इकडे आलात. तुमची मागच्या जन्माची पुण्याई आहे, नाही तर तुमच्या मनात साधनेचे विचारही आले नसते. ही केवळ परमेश्वराची कृपा आहे.’’
६. ईश्वरावर नितांत श्रद्धा
एकदा ते मला म्हणाले, ‘‘जीवनातील अनेक प्रसंगात परमेश्वराने माझी काळजी घेतली आहे. माझी विदेशांतही पुष्कळ व्याख्याने झाली. ही केवळ परमेश्वराची कृपा आहे. तो परमेश्वर आपले सर्व पहातो. आपण केवळ त्याच्यावर नितांत श्रद्धा ठेवावी. ‘जीवनात आलेला प्रत्येक प्रसंग, म्हणजे ईश्वराची इच्छाच आहे’, असे मी समजतो. वामनपंडितांनी सांगितल्याप्रमाणे,
‘अहो येतां जातां उठत बसतां कार्य करितां ।
सदा देतां घेतां वदनिं वदतां ग्रास गिळितां ।
घरीं दारीं शय्येवरि रतिसुखाचे अवसरीं ।
समस्तांची लज्जा त्यजुनि भगवच्चिंतन करीं ।।’
याचाच अर्थ परमेश्वराची भक्ती करावी.’’
पू. भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सनातन संस्था यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !
अ. ‘रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम स्वर्ग आहे. येथे साक्षात् परमेश्वर रहातो. तो तुम्हा सर्वांचे अंतरंग जाणतो.
आ. प.पू. डॉक्टरांचा अध्यात्मात मोठा अधिकार आहे, तरीही ते साधेपणाने रहातात आणि बोलतात.
इ. मी त्यांना भेटल्यावर ते मला वाकून नमस्कार करतात. ते आमच्या संवादातील काही सूत्रे लिहून घेतात.
ई. त्यांनी पुष्कळ ग्रंथ लिहिले आहेत. सनातनचे अनेक आश्रम आहेत. हे सर्व कार्य केवळ परमेश्वरच करू शकतो.
उ. प.पू. डॉक्टरांचा मान पुष्कळ मोठा आहे. माझ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी मला आश्रमात बोलावले. मी आता सर्वाधिक आनंदी आहे.
ऊ. त्यांनी स्थापन केलेली सनातन संस्था, तिचे कार्य सर्वकाही अद्भुत आहे. असे मी जगात कुठेही पाहिले नाही.’
– श्री. दीप संतोष पाटणे (२.६.२०२४)
७. गजानन महाराजांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
अ. एकदा ते मला म्हणाले, ‘‘वर्ष १९७६ मध्ये मला स्वप्नात गजानन महाराजांनी दर्शन दिले. त्या वेळी त्यांनी मला स्वप्नात उपदेश करून मोठ्या संकटातून वाचवले. तेव्हा मला त्यांच्याविषयी काही ठाऊक नव्हते.’’
आ. वर्ष १९९० मध्ये चेंबूर, मुंबई येथे आमच्या घराजवळ रहाणारे एक गुरुजी आमच्याकडे येऊन म्हणाले, ‘‘अमुक ठिकाणी गजानन महाराज आले आहेत आणि त्यांनी तुम्हाला भेटण्यासाठी बोलावले आहे.’’ प्रत्यक्षात गजानन महाराजांनी वर्ष १९१० मध्ये देहत्याग केला. माझा त्यांच्या बोलण्यावर प्रथम विश्वास बसेना; मात्र त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी त्या ठिकाणी गेलो. तेथे मी खोलीच्या समोर गेलो आणि खोलीचा दरवाजा उघडल्यावर मला साक्षात् गजानन महाराजांचे दर्शन झाले. त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि कंठ दाटून आला. मी त्यांच्या चरणांवर डोके ठेवले. तेव्हा महाराज म्हणाले, ‘सगळे चांगले होईल बर.’’
इ. त्यानंतर वर्ष १९९१ मध्ये ‘‘मी शेगाव येथे गेल्यावर माझ्या हातून ‘श्री गजानन महाराज बावन्नी’ साकार झाली.’’
‘पू. आबांच्या सेवेच्या निमित्ताने मला पुष्कळ काही शिकता आले’, त्याबद्दल परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता !’
– श्री. दीप संतोष पाटणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(२.६.२०२४)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |