अविरत धर्मकार्य करणारे चेंबूर (मुंबई) येथील जगप्रसिद्ध प्रवचनकार, धर्मभूषण आणि भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे (वय ८९ वर्षे) संतपदी विराजमान !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केली आनंददायी घोषणा
रामनाथी (फोंडा, गोवा) – अविरत धर्मकार्य करणारे जगप्रसिद्ध प्रवचनकार, धर्मभूषण आणि भारताचार्य प्रा. सुरेश गजानन शेवडे (वय ८९ वर्षे) ११ जून २०२४ या दिवशी संतपदी विराजमान झाले. ते मूळचे चेंबूर, मुंबई येथील आहेत. भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे हे १९ मे या दिवशीपासून रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात वास्तव्याला आहेत. ११ जून या दिवशी आश्रमातील काही साधकांसाठी भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांच्या प्रवचनांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर ते संत झाल्याची आनंदवार्ता सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी घोषित केली. सनातनचे पू. पृथ्वीराज हजारे यांनी त्यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला. याप्रसंगी डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले यांची वंदनीय उपस्थिती लाभली. पू. भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर नितांत श्रद्धा आहे. या वेळी काही साधकांनी आणि त्यांच्या समवेत सेवा करणार्या साधकांनी शिकायला मिळालेली सूत्रे अन् अनुभूती सांगितल्या.
(सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)
कार्यक्रमात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी व्यक्त केलेले मनोगत
धर्मकार्य करून संतपदी विराजमान झालेले जगप्रसिद्ध प्रवचनकार, धर्मभूषण आणि पू. भारताचार्य प्रा. सु. ग. शेवडे !
आज येथे उपस्थित असलेले जगप्रसिद्ध प्रवचनकार, धर्मभूषण आणि भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांना माझा साष्टांग नमस्कार ! त्यांच्या उपाध्यांमधूनच त्यांच्या अफाट कार्याची कल्पना येते.
१. त्यांनी आजवर जगभरात १३ सहस्र ५०० हून अधिक प्रवचने केली आहेत.
२. त्यांनी अमेरिकेत ५५० प्रवचने केली आहेत.
३. वर्ष २०१६-१७ मध्ये ब्रिटनमधील ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये म्हणजे, तेथील संसदेत संबोधित करतांना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती दिली.
४. छत्रपती संभाजी महाराजांविषयी गेली अनेक दशके होणारा अपप्रचार प्रा. सु.ग. शेवडे यांनी ‘शंभूराजे’ हे पुस्तक लिहून पुराव्यांनिशी खोडून काढला. या विषयावर त्यांनी अनेक लेखही लिहिले आणि प्रवचनेही केली. यामुळे पुढे छत्रपती संभाजी महाराजांविषयी होणारा अपप्रचार थांबला. थोडक्यात म्हणजे ते धर्मावर होणारी आक्रमणे रोखण्यासाठी प्रयत्नरत असणारे एक मोठे शिलेदार आहेत.
५. त्यांनी वर्ष १९९१ मध्ये शेगाव येथील श्री गजानन महाराजांची ‘श्री गजानन बावनी’ लिहिली. तिच्या आजवर ३ कोटींहून अधिक प्रती वितरित झाल्या आहेत. असे ते एकमेवाद्वितीय आध्यात्मिक लेखक आहेत.
६. त्यांनी आजवर राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित विविध विषयांवर १४ ग्रंथ लिहिले आहेत.
आता त्यांच्या ग्रंथांचे वैशिष्ट्य सांगतो. आतापर्यंत मी अध्यात्मातील विविध विषयांवर २७७ ग्रंथ लिहिले आहेत. त्याच्या मार्च २०२४ पर्यंत ८८ लाख २८ सहस्र प्रती प्रकाशित झाल्या आहेत. या ग्रंथांत मला सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान आणि इतर ग्रंथात वाचलेले ज्ञान, असा मजकूर आहे. इतर लेखकांच्या एकेका ग्रंथात ‘नवीन ज्ञान’ म्हणून केवळ ४-५ पानांवर खुणा करतो. ते ज्ञान वाचकांना वाचायला मिळावे, यासाठी आपल्या ग्रंथांच्या पुढच्या आवृत्तीत घेतो; पण शेवडे यांच्या ग्रंथाच्या जवळ जवळ प्रत्येक पानावर ‘नवीन ज्ञान’ म्हणून मी खुणा करतो. त्यांच्या एकेका ग्रंथात पुष्कळ ज्ञान आहे. उद्यापासून त्यावरील लेखमाला दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रतीदिन प्रकाशित करणार आहोत.
७. त्यांच्या कार्याची ओळख केवळ काही शब्दांत करून देणे शक्य नाही. त्यावर स्वतंत्र एक ग्रंथ होईल, इतके त्यांचे कार्य व्यापक आहे.
ही त्यांच्या ऐहिक कार्याची ओळख झाली. आता त्यांच्या आध्यात्मिक, म्हणजेच त्यांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेची ओळख करून घेऊया.
१. वयाच्या नवव्या वर्षी मुंज झाल्यापासून ते आतापर्यंत, म्हणजे वयाच्या ८९ व्या वर्षापर्यंत प्रतीदिन, म्हणजे गेली ८० वर्षे संध्या करत आहेत.
२. वर्ष १९७६ मध्ये त्यांनी इंदूरचे थोर संत प.पू. नाना महाराज तराणेकर यांचा अनुग्रह घेतला.
३. त्याच वर्षी गुरुंच्या आज्ञेने श्री. शेवडे यांनी शाळेतील नोकरीचे त्यागपत्र देऊन प्रवचनांच्या माध्यमातून धर्मप्रसाराच्या कार्यास वाहून घेतले. त्यांच्या या ५० वर्षांच्या धर्मसेवेनंतर वयाच्या ८९ व्या वर्षीही ते धर्मप्रसाराच्या कार्यात तितकेच उत्साही आहेत.
४. वर्ष १९८५ मध्ये त्यांनी आयोजित केलेल्या बद्रीनाथ-केदारनाथ या यात्रेत मी सहभागी झालो होतो. त्या वेळी आमची प्रथम भेट झाली. त्यावेळी पूर्ण यात्रेत त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून मला त्यांच्याकडून अध्यात्मातील अनेकविध पैलू शिकता आले.
५. माझी साधना आणि त्यांचा अध्यात्माचा अभ्यास असल्यामुळे मला त्यांच्याकडून रोज अध्यात्मविषयक नवीन काही तरी शिकायला मिळत आहे. ते माझ्यासाठी ज्ञानाचा मोठा स्त्रोत आहेत. राष्ट्र, धर्म आणि हिंदू संस्कृती या विषयांबाबत माझी जी जिज्ञासा होती, तिची यांच्यामुळे पूर्तता होत आहे.
६. त्यांना त्यांच्या कार्याचा अन् अनुभवांचा थोडाही गर्व, म्हणजे अहं नाही.
७. इतके अनुभवी, ज्ञानी आणि माझ्यापेक्षा वयाने ७ वर्षांनी मोठे असूनही ते या वयातही मला भेटायला आल्यावर वाकून नमस्कार करतात. यावरून त्यांच्यामध्ये नम्रता, लीनता किती आहे, हे लक्षात येते.
८. त्यांचे बोलणे नेहमी आध्यात्मिक स्तरावरचे असते. त्यांच्या बोलण्यात मोकळेपणा असतो. त्यांच्या तोंडून कधीही अपशब्द निघत नाहीत. ते सतत शिकण्याच्या स्थितीत असतात.
त्यांचे हे सर्व गुण खरे तर त्यांच्या संतत्त्वाची लक्षणे आहेत. त्यामुळे आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की, त्यांनी त्यांच्या धर्मसेवेच्या माध्यमातून आज ७१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठला आहे. त्यामुळे आपले श्री. सु.ग. शेवडे हे ‘पूजनीय सु.ग. शेवडे’ आहेत. हे सांगण्यात मला पुष्कळ आनंद होत आहे.’