UN On Israel Hamas War : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत गाझामधील युद्धविराम प्रस्तावाला संमती
न्यूयॉर्क (अमेरिका) – संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामाचा ठराव संमत करण्यात आला. हा ठराव अमेरिकेकडून मांडण्यात आला होता. १५ पैकी १४ देशांनी याचे समर्थन केले, तर रशियाने यावरील मतदानापासून स्वतःला दूर ठेवले. इस्रायलने या ठरावाला संमती दिली होती.
UN Security Council adopts US drafted Gaza ceasefire resolution#UnitedNations #UNSC #Israel#IsraelHamasWar #IsraelPalestineConflict pic.twitter.com/RTJTzg6OwK
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 11, 2024
युद्धविराम प्रस्तावात ३ टप्प्यांत युद्ध संपवण्याची चर्चा आहे. पहिल्या टप्प्यात ६ आठवड्यांचा युद्धविराम असेल. या काळात हमासच्या कह्यातील काही इस्रायली ओलीस आणि इस्रायलमध्ये बंदीवान असलेले पॅलेस्टिनी यांची सुटका करण्यात येईल. यानंतर दुसर्या टप्प्यात युद्ध पूर्णपणे थांबवून उर्वरित ओलिसांची सुटका केली जाईल. शेवटच्या टप्प्यात गाझा पट्टीचे पुनर्वसन करण्याचा उल्लेख आहे.
हमास नष्ट होईपर्यंत युद्ध थांबणार नाही ! – नेतान्याहू
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी प्रस्तावाचा काही भाग सार्वजनिक केला आहे. इस्रायल कायमस्वरूपी युद्धबंदीबद्दल तेव्हाच बोलेल, जेव्हा हमासचा संपूर्णपणे नाश होईल.
हमासने मात्र संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत संमत झालेल्या ठरावाचे स्वागत केले आहे. हमासने तो मध्यस्थांशी चर्चा करण्यास सिद्ध असल्याचे सांगितले.
ठराव स्वीकारण्यास इस्रायल बाध्य नाही !
न्यूयॉर्क टाइम्सच्या मते, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सदस्य देशांनी ठरावांचे पालन करणे आवश्यक आहे. तथापि इस्रायल हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी किंवा अस्थायी सदस्य नाही. अशा स्थितीत हा प्रस्ताव स्वीकारण्यास तो बांधील नाही. सुरक्षा परिषदेत ठराव झाला, तरी त्याची कार्यवाही येथे करता येत नाही.