कर्नाटकमध्ये हलालविरोधी आंदोलनाला मिळालेले यश !

२४ जून या दिवशीपासून रामनाथ देवस्थान, गोवा येथे चालू होत असलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या निमित्ताने…

(टीप : हलाल म्हणजे इस्लामनुसार जे वैध ते)

१. हिंदु जनजागृती समितीमुळे ‘हलाल प्रमाणपत्रा’ची ओळख 

‘आपल्याला भारतमातेच्या प्रत्येक राज्यात ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या विरोधात आंदोलन यशस्वी करायचे आहे. आम्ही कर्नाटकमध्ये जे केले, ते प्रत्येक हिंदूने करायला हवे. त्यासाठी मी केवळ ३ प्रमुख सूत्रे मांडणार आहे. ज्याच्या साहाय्याने तुम्ही तुमचा प्रभाग, गाव आणि शहर येथे हे आंदोलन राबवू शकता. वर्ष २०१७ मध्ये मला ‘हलाल अर्थव्यवस्थे’ची माहिती मिळाली. ही अर्थव्यवस्था भारताला अत्यंत धोकादायक ठरत आहे. त्यामुळे आपले राष्ट्र आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत आहे, तसेच हलाल अर्थव्यवस्था, म्हणजे हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्याविरोधी असलेले षड्यंत्र आहे. हिंदु जनजागृती समिती आणि समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांच्यामुळे मला या विषयाची सर्वप्रथम ओळख झाली.

श्री. प्रशांत संबरगी

२. हलाल प्रमाणपत्राविषयी लोकांमध्ये जागृती करण्याचा निर्धार 

त्यानंतर मी ‘हलाल अर्थव्यवस्थे’विषयी पुष्कळ माहिती मिळवली. या माहितीच्या आधारे पुष्कळ चलत्‌चित्रे बनवून सामाजिक माध्यमांवर (सोशल मिडियावर) प्रसारित केली. आमचा प्रचार सामाजिक माध्यमे, व्हॉटस्ॲप, पी.डी.एफ्. धारिका यांपुरताच मर्यादित होता. आपले हिंदु बंधू-भगिनी हे सर्व वाचून बाजूला ठेवत होते. ‘हलालविषयी काहीतरी सांगत आहेत’, इतकाच विचार ते करत होते. ९० टक्के हिंदूंना याविषयी काहीच चिंता वाटत नव्हती; मात्र आम्हाला याविषयी लोकांमध्ये जागृती करायची होती. आम्हाला प्रत्येक हिंदु आणि भारतीय यांच्या मनात ‘हलाल अर्थव्यवस्था देशाला धोकादायक ठरत असून ती भारताला कमकुवत बनवत आहे’, हे बिंबवायचे होते. बेंगळुरूमध्ये असलेल्या आमच्या २० जणांच्या गटाने हे आंदोलन केवळ ‘यू ट्यूब’, ‘फेसबुक’ यांपुरतेच मर्यादित न ठेवता रस्त्यावर उतरून जागृती करण्याचे ठरवले.

३. हलालविरोधी जागृतीला काँग्रेसच्या नेत्यांचा विरोध

आम्ही या विषयावरील १ सहस्र पत्रके छापून प्रतिदिन वितरण करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे १५ दिवस आम्ही ही पत्रके वितरित केली. आम्ही श्री. रमेश शिंदे यांच्या मार्गदर्शनातील सूत्रे असलेली १ लक्ष पत्रके छापून घेतली. आम्ही ही पत्रके घेऊन १५ दिवस बेंगळुरू येथील प्रत्येक घरात गेलो. आम्ही लोकांना घरातील नेहमीच्या वापरातील उत्पादनांच्या वेष्टनावर असलेले ‘हलाल’चे चिन्ह दाखवले, तसेच मांस खरेदीविषयी जागृती केली. निवडणुकीच्या वेळी करण्यात येणार्‍या प्रचाराप्रमाणे आम्ही सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत याविषयी लोकांमध्ये जागृती करत होतो. त्यामुळे राष्ट्रविरोधी काँग्रेस पक्षाच्या एका स्थानिक पुढार्‍याने आम्हाला ‘तुम्ही घराघरात पत्रके वाटत आहात. त्यामुळे जातीय तणाव वाढत असून  तेढ निर्माण होत आहे. तुम्ही हिंदूंमध्ये फूट पाडत आहात. तुम्ही ही पत्रके वाटल्याने दंगली होऊ शकतात. त्यामुळे आम्ही पोलिसांत तक्रार देऊ’, अशी धमकी दिली. ‘हे स्थानिक पुढारी आहेत. फार काही करणार नाहीत ?’, असे आम्हाला वाटले; पण त्यांची संख्या वाढत गेली. त्यांच्याप्रमाणे आमचे कार्यकर्तेही दुपटीने वाढले. त्या वेळी देशातील, तसेच राज्यातील प्रमुख प्रसारमाध्यमे, कन्नड दूरचित्रवाहिन्या, वृत्तपत्रे यांत यांविषयीची वृत्ते येऊ लागली होती. या आंदोलनाचा इतका प्रचार झाला की, आरंभी आमच्याकडे २० कार्यकर्ते होते; मात्र ३ दिवसांत ते १५० पर्यंत वाढले आणि हे सर्व जण प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी झाले.

४. कर्नाटकच्या अन्नपदार्थ मंत्र्यांकडून हलालविरोधी जागृतीची नोंद

आमचे हे १५० कार्यकर्ते पत्रके वितरण करण्यासाठी बेंगळुरूच्या प्रत्येक घराघरात गेले आणि त्यांनी ‘हलाल’ प्रमाणित उत्पादने खरेदी करणे भारताच्या हिताचे नाही, हे लोकांना हात जोडून सांगितले. आम्ही प्रत्येक गल्लीत आणि प्रत्येक रस्त्यावर जाऊन हा विषय मांडला. हा विषय पत्रकार परिषद घेऊन आणि दूरचित्रवाणीवरही सांगितला. त्यामुळे १५ दिवसांत हा विषय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषय बनला. कर्नाटक राज्याच्या अन्नपदार्थ मंत्र्यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलावून घेतले. त्यांनी कर्नाटक राज्याच्या अन्नपदार्थ संचालकांना एक परिपत्रक पाठवून ‘हलाल’ प्रमाणित उत्पादनांची सूची मागवून घेतली. ही आहे हिंदूंची शक्ती ! अशा प्रकारे हिंदूंच्या कष्टाला फळ मिळाले.

कर्नाटक शासनाने अन्नपदार्थ संचालकांना पाठवलेल्या पत्रकात सर्व शासनमान्य प्रमाणित उत्पादने आणि मांसविक्री करणारे विक्रेते यांना ‘कोणती उत्पादने ‘हलाल’ प्रमाणित आहेत, हे ग्राहकांना सांगितले जाते का ?’, याविषयी विचारणा केली. ‘ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे’, असे सांगून ‘मुसलमानांना ‘हलाल प्रमाणित उत्पादने हवीत म्हणून हिंदूंवर त्याची सक्ती करता येणार नाही’, असे सांगितले. त्यावर बेंगळुरू येथील ‘ऑनलाईन’ मांसविक्री करणार्‍या उत्पादकांनी ते हलाल मांस विक्री करत असल्याचे मान्य केले. ते पत्र घेऊन आम्ही बेंगळुरू उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली. ‘भारतमातेच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या प्रार्थनेला फलस्वरूप येऊन ‘हलाल उत्पादने अवैध आहेत’, असे न्यायालय घोषित करील’, याची मला निश्चिती आहे.

५. समस्त हिंदुत्वनिष्ठांनी कर्नाटकचा आदर्श घेणे आवश्यक !

याविषयी हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश शिंदे यांनी पुष्कळ संशोधन केले आहे. त्यामुळे याविषयी केवळ भाषणे देऊन चालणार नाही, तर प्रत्येक घराघरात आणि आपल्या शेजारी याविषयी चर्चा व्हायला हवी. दुकानात गेल्यावर ‘हलाल प्रमाणित’ आहे म्हणून ‘आशीर्वाद’ आस्थापनाचा आटा आणि ‘डाबर’चे मध मला नको’, असे आपण सांगायला हवे. दुकानदार याविषयी मध्यस्थाला आणि मध्यस्थ उत्पादकाला सांगेल. ही एक साखळी प्रक्रिया आहे, ज्याचा आरंभ आपल्याला करायचा आहे. हे अत्यंत महत्त्वाचे आहे; कारण उत्पादकांना ग्राहक अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्राहकाला जे हवे आहे, ते उत्पादकांना द्यावेच लागते. यासाठी आपण जनजागृती करायला हवी. ‘कर्नाटकात जे काही घडले, ते प्रत्येकाने आपल्या गावात करायला हवे’, असे मला वाटते.’

– श्री. प्रशांत संबरगी, चित्रपट वितरक आणि उद्योगपती, बेंगळुरू, कर्नाटक.