VHP On Waqf Board : वक्फ मंडळाचा निधी रहित करा, अन्यथा विधानसभा निवडणुकीत हिंदूंच्या रोषाला सामोरे जा !

विश्‍व हिंदु परिषदेची भाजप आणि शिवसेना यांना चेतावणी !

विश्‍व हिंदु परिषदेची चेतावणी

मुंबई – वक्फ मंडळाचे बळकटीकरण करण्याच्या निर्णयाचा महायुतीने पुनर्विचार करावा. वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी सरकारने घोषित केलेला १० कोटी रुपयांचा निधी रहित न केल्यास येत्या विधानसभेच्या निवडणुकीत हिंदूंच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी चेतावणी विश्‍व हिंदु परिषदेने शिवसेना आणि भाजप यांच्या महायुतीला दिली आहे.

याविषयी विश्‍व हिंदु परिषदेचे कोकणमंत्री मोहन सालेकर म्हणाले की, वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी निधी देण्याला आमचा विरोध आहे. काँग्रेस सरकारने जे करण्याचे टाळले, ते महायुती करत आहे. हे धर्माच्या आधारावर तुष्टीकरण आहे. ‘एकीकडे धर्माच्या आधारावर राजकारण करण्यात येऊ नये’, असे महायुतीचे नेते बेंबीच्या देठापासून सांगत आहेत; मात्र दुसर्‍या बाजूला धर्माच्या आधारावर अनुदान दिले जात आहे. अशा प्रकारे कट्टरतावादाचे बळकटीकरण आम्ही सहन करणार नाही.


काय आहे प्रकरण ?

वर्ष २००७ मध्ये महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता असतांना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात वक्फ मंडळासाठी अनुदान देण्याचे आश्‍वासन केंद्र सरकारला दिले होते. या आश्‍वासनाची पूर्तता करून वक्फ मंडळ बळकट करण्यासाठी वर्ष २०२४-२५ साठी १० कोटी रुपयांचे प्रावधान करण्यात आले आहे. यातील २ कोटी रुपये १० जून या दिवशी राज्य सरकारने दिले आहेत.