Japan Fertility Rate Decline : जपानमध्ये जन्मदर विक्रमी नीचांकी पातळीवर : लोकसंख्या वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील !

टोकियो (जपान) –  जन्मदरामध्ये घट, हे जपानसाठी मोठे आव्हान ठरले आहे. लोकांचा मुले होऊ न देण्याकडे कल असल्यामुळे देशाला लोकसंख्येशी निगडित आव्हानांचा सामना करावा लागत आहे. जन्मदरातील अभूतपूर्व घट अल्प करण्यासाठी जपान सरकार विविध प्रयत्न करत आहे. मुले अल्प होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे लोक विवाह करण्यापासून लांब रहाणे होय. जपानमध्ये विवाह करणार्‍यांची संख्याही झपाट्याने अल्प होत आहे, तर घटस्फोट घेणार्‍यांची संख्या वाढत आहे. या प्रवृत्तीमुळे देशात लोकसंख्येचा असमतोल निर्माण होत आहे.

जपानच्या प्रजनन दरात घसरण !

जपानचा प्रजनन दर गेल्या अनेक वर्षांपासून घसरत आहे. आता तो विक्रमी नीचांकी पातळीवर पोचला आहे. आरोग्य आणि कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या नवीन आकडेवारीनुसार सुमारे १२ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात गेल्या वर्षी केवळ ७ लाख २७ सहस्र २७७  मुलांचा जन्म झाला. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार देशातील प्रजनन दर गेल्या वर्षी १.२६ वरून १.२० वर आला आहे. (प्रजनन दर म्हणजे स्त्रीच्या आयुष्यात जन्मलेल्या मुलांची संख्या) लोकसंख्येला स्थिर रहाण्यासाठी प्रजनन दर २.१ टक्के असणे आवश्यक आहे.

तरुणांना लग्न करण्यासाठी आणि कुटुंब चालू करण्यासाठी प्रोत्साहन !

देशातील लोकसंख्येचा समतोल राखण्यासाठी जपान सरकारने तरुणांना विवाह  करण्यासाठी आणि कुटुंब चालू करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. यासाठी सरकारने स्वतःचे ‘डेटिंग अ‍ॅप’ही चालू केले आहे. (युवक-युवतींची ओळख होऊन त्यांच्यात नाते निर्माण करण्यासाठी बनवण्यात आलेल्या अ‍ॅपला ‘डेटिंग अ‍ॅप’ म्हणतात) यासोबतच बाल संगोपन सुविधांचा विस्तार करणे, पालकांना गृहनिर्माण अनुदान देणे आणि मूल जन्माला आल्यावर पालकांसाठी अनुदान देणे यांसारखे उपक्रमही सरकारने चालू केले आहेत.