अमित शहा गृह, तर राजनाथ सिंह यांचे संरक्षण खाते कायम !
केंद्रीय मंत्रीमंडळाचे खातेवाटप
नवी देहली – केंद्रीय मंत्रीमंडळाचे खातेवाटप करण्यात आले आहे. भाजप सरकारच्या मागील कार्यकाळात प्रमुख खाती ज्यांच्याकडे होती त्यांना तिच खाती पुन्हा देण्यात आली आहेत. त्यानुसार अमित शहा गृह, राजनाथ सिंह संरक्षण, नितीन गडकरी रस्ते परिवहन, डॉ. एस्. जयशंकर परराष्ट्र, निर्मला सीतारामन् यांना अर्थ मंत्री म्हणून कायम ठेवण्यात आले आहे. तसेच शिवराज सिंह चौहान यांना कृषी आणि ग्रामीण विकास, मनोहरलाल खट्टर ऊर्जा, भूपेंद्र यादव यांना पर्यावरण, श्रीपाद नाईक यांना ऊर्जा राज्य मंत्रालयाचा स्वतंत्र पदभार सोपवण्यात आला आहे.
३० मंत्री, ३६ राज्यमंत्री आणि ५ स्वतंत्र पदभार
महाराष्ट्रातील गडकरींच्या व्यतिरिक्त पियुष गोयल यांच्याकडे वाणिज्य आणि उद्योगमंत्रीपद, रामदास आठवलेंकडे सामाजिक न्याय राज्यमंत्रीपद, मुरलीधर मोहोळ यांच्याकडे हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्रीपद, प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष, आरोग्य, कुटुंबकल्याण यांचा स्वतंत्र पदभार आहे. ७१ मंत्र्यांमध्ये ३० जणांना कॅबिनेट मंत्री, तर उर्वरितांपैकी ३६ जणांना राज्यमंत्री करण्यात आले आहे. ३० मंत्र्यांपैकी २५ जण भाजपचे आहेत.
उर्वरित ५ जणांमध्ये जनता दल (संयुक्त), जनता दल (धर्मनिरपेक्ष), लोक जनशक्ती पक्ष, हिंदुस्थान अवामी मोर्चा आणि तेलुगू देसम् या पक्षांना प्रत्येकी एक कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे. राज्यमंत्र्यांमध्ये भाजपचे ३२ जण आहेत, उर्वरित ४ मध्ये भारिपला १, जनता दल(संयुक्त) १ आणि तेलुगू देसम् २ असे राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. राज्यमंत्री स्वतंत्र पदभारसाठी अवघ्या ५ खासदारांनी शपथ घेतली. त्यातही भाजपचे ३ खासदार, शिवसेना (शिंदे) १, तर राष्ट्रीय लोक दल यांना १ असे पद देण्यात आले आहे. मंत्री आणि राज्यमंत्री यांचे खातेवाटप अद्याप करण्यात आलेले नाही. महाराष्ट्राच्या वाट्याला २ कॅबिनेट,१ स्वतंत्र पदभार, ३ राज्यमंत्री अशी पदे मिळाली आहेत.