‘संतांच्या वक्तव्यांचा कार्यकारणभाव काय असतो ?’, याची साधिकेला आलेली प्रचीती !
‘माझी मुलगी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून साधना करते. तिने साधना करणे चालू करेपर्यंत अनेक प्रसंगांतून देवाने तिला आणि मलाही घडवले. मनुष्य अज्ञानी असल्यामुळे संतांच्या बोलण्याचा कार्यकारणभाव त्याच्या लक्षात येत नाही. संतांच्या वक्तव्यांचा कार्यकारणभाव कळण्याची क्षमता संत किंवा गुरुच देतात. आतापर्यंत घडलेल्या सर्व प्रसंगांचे चिंतन करतांना ‘संतांनी आम्हा दोघींकडून साधना कशी करून घेतली ? आणि त्यांच्या वक्तव्यांचा काय कार्यकारणभाव होता ?’, हे लक्षात आले. ते लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
१. संतांचा लाभलेला सत्संग
१ अ. संतांनी मुलीला जमेल तशी साधना करायला सांगणे : काही वर्षांपूर्वी रामनाथी आश्रमात मला आणि माझ्या मुलीला संतांचा सत्संग लाभला. त्या सत्संगात ते संत आणि माझी मुलगी यांच्यामध्ये पुढील संभाषण झाले.
संत : आता पुढे काय करणार ?
मुलगी : मला ईश्वरी राज्यातील चांगली आधुनिक वैद्या व्हायचे आहे.
संत : ठीक आहे. तुला आधुनिक वैद्या व्हायचे असेल, तर तू हो आणि तुला जमेल तशी साधना मात्र कर. तू सुटीतही आश्रमात आली नाहीस, तरी चालेल.
१ आ. नंतर त्या संतांनी मला सांगितले, ‘‘जोपर्यंत तुमच्या मुलीला स्वतःला साधना करावी’, असे वाटत नाही, तोपर्यंत तुम्ही तिला साधनेविषयी काही सांगायचे नाही.’’
१ इ. या वेळी ‘काय बोलावे ?’, हे मला कळत नव्हते; पण ‘माझे काहीतरी चुकले आहे’, याची मला जाणीव झाली.
१ ई. या प्रसंगात लक्षात आलेला कार्यकारणभाव : या प्रसंगात ‘संतांनी मुलीला प्रश्न विचारणे आणि त्या प्रश्नासह तिला पुढील साधनेसाठी ध्येय देणे अन् ‘मुलांवर साधनेचे संस्कार करणे आवश्यक आहे’, याची मला जाणीव करून देणे’, हा कार्यकारणभाव माझ्या लक्षात आला.
२. दीड वर्षांनी संतांचा लाभलेला सत्संग
या प्रसंगानंतर दीड वर्षांनी आम्हा दोघींना पुन्हा संतांचा सत्संग लाभला.
२ अ. त्या वेळी माझ्या मुलीने त्यांना सांगितले, ‘‘मला आता केवळ साधनाच करायची आहे.’’
२ आ. तेव्हा संतांनी मला सांगितले, ‘‘आता तुम्ही मुलीच्या पाठीशी उभ्या रहा. तिला साधना करायला साहाय्य करा.’’ प्रत्यक्षात तेव्हा मी पुष्कळ अस्थिर झाले होते. मी त्यांना ‘हो’ म्हणाले आणि ‘यासाठी तुम्हीच मला बळ द्या’, अशी मनोमन प्रार्थनाही केली.
२ इ. देवाने साधिकेला कुटुंबात घडणार्या सर्व प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी बळ देणे : या प्रसंगानंतर माझी मुलगी साधना करू लागली. तेव्हा माझ्या कुटुंबियांना हे स्वीकारणे कठीण होते. मी मुलीची साधना होण्यासाठी प्रयत्न करत होते. कुटुंबात घडणार्या सर्व प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी देव बळही देत होता. हे मी अनुभवत होते.
२ ई. या प्रसंगात ‘संतांनी आधी विचारलेल्या प्रश्नामुळे मुलीची साधना करण्याची तळमळ वाढली आणि नंतर त्यांनी मला सांगितलेल्या वाक्यातून मला पुढील प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी बळ दिले’, असे माझ्या लक्षात आले.
३. एक वर्षाने संतांचा लाभलेला सत्संग
३ अ. संतांनी ‘मुलीच्या साधनेसाठी तिच्या पाठीशी उभ्या रहा’, असे पुन्हा सांगणे : नंतर एक वर्षाने मला आणि माझ्या नातेवाइकांना संतांचा सत्संग लाभला. त्या वेळी सत्संगात ‘‘माझी मुलगी आता साधनाच करणार आहे’’, असे संतांना मला सांगता आले. संतांना माझ्या मनाची स्थिती ठाऊक असल्याने त्यांनी त्या वेळी मला सांगितले, ‘‘आता तुम्ही स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांची प्रक्रिया राबवण्यासमवेत तुमच्या मुलीच्या साधनेसाठी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या रहा.’’ तेव्हाही मी केवळ ‘हो’ म्हणाले.
३ आ. घरी घडलेल्या प्रसंगांत साधिका अस्थिर झाल्यास देवाने तिला वेगवेगळ्या माध्यमांतून स्थिर रहाण्यासाठी बळ देणे : यानंतर घरी आल्यावर ‘मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवीन’, अशी माझ्या मनाची स्थितीच नव्हती. मला केवळ देवाचा धावा करणे आणि नामजपादी उपाय करणे, एवढेच शक्य होते. देवाने मला वेगवेगळ्या माध्यमांतून स्थिर रहाण्यासाठी बळ दिले.
३ इ. प्रसंगात लक्षात आलेला कार्यकारणभाव : ‘संत त्रिकालज्ञानी असतात. त्यांना ‘माझी पुढे स्थिती कशी असेल ?’, हे आधीच ठाऊक होते; म्हणून त्यांनी मला ठामपणे सांगितले आणि प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी बळ दिले’, हा कार्यकारणभाव माझ्या लक्षात आला.
४. काही मासांनी संतांचा लाभलेला सत्संग
यानंतर पुन्हा काही मासांनी मला संतांचा सत्संग लाभला. त्या वेळी माझ्या मुलीला साधना करता येण्यातील अडथळे न्यून झाले होते. माझे मनही स्थिर झाले होते.
४ अ. संतांनी व्यष्टी आणि समष्टी साधना करण्याची जाणीव करून देणे : त्या सत्संगात संतांनी मला विचारले, ‘‘आता तुमच्या साधनेचे काय ?’’ त्या वेळी माझी व्यष्टी आणि समष्टी साधना त्यांना अपेक्षित अशी होत नव्हती. त्यानंतर मी घरी आल्यावर व्यष्टी साधना करण्याचे प्रयत्न चालू केले. मी नियमित सेवा करू लागले.
४ आ. ‘संतांनी विचारलेल्या प्रश्नातून त्यांनी मला व्यष्टी आणि समष्टी साधना करण्याची जाणीव करून दिली. त्यांनी माझ्या साधनेची घडी बसण्यास आरंभ झाला’, असे मला वाटले.
५. ‘देवच आपल्याकडून साधना करून घेत असतो’, याची जाणीव होणे
या सर्व प्रसंगांतून देवाने मला पुष्कळ शिकवले. मला वाटत होते, ‘मी काहीतरी साधना करते’; पण तसे नसून ‘देवच आपल्याकडून साधना करून घेत असतो’, याची मला जाणीव झाली. ‘प्रसंग निर्माण करणाराही देवच असतो आणि त्यातून पुढे नेणाराही तोच असतो’, हे मी अनुभवले.
‘हे देवा, तुझ्याच कृपेने मी प्रत्येक क्षणी संतांची कृपा अनुभवली. संतांच्या बोलण्यातील कार्यकारणभाव शिकायला मिळाला. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.’
– एक साधिका (वर्ष २०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |