देवद आश्रमातील श्रीमती कमलिनी कुंडले (वय ६४ वर्षे) यांना डोळ्यांच्या शस्त्रकर्माच्या वेळी झालेले त्रास आणि नामजप केल्यानंतर आलेल्या अनुभूती
‘नोव्हेंबर २०२२ मध्ये माझ्या डोळ्यांचे शस्त्रकर्म कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार मी आणि एक सहसाधिका १४.११.२०२२ या दिवशी कुडाळ येथे पोचलो. तेथे आधुनिक वैद्य संजय सामंत यांच्या रुग्णालयात माझ्या दोन्ही डोळ्यांच्या मोतीबिंदूचे शस्त्रकर्म झाले. त्या वेळी मला झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. डाव्या डोळ्याचे शस्त्रकर्म निर्विघ्नपणे पार पडणे
१५.११.२०२२ या दिवशी माझ्या डाव्या डोळ्याचे शस्त्रकर्म केले. तेव्हा मला डोळ्यांचे ते शस्त्रकर्म एक आनंददायी प्रक्रिया वाटली. तेव्हा माझा नामजप आतून चालू होता आणि मला आनंदही जाणवत होता.
२. २२.११.२०२२ या दिवशी उजव्या डोळ्याचे शस्त्रकर्म करतांना आलेल्या अनुभूती
अ. माझ्या उजव्या डोळ्याचे शस्त्रकर्म चालू असतांना अनुमाने ५ मिनिटांनी ‘अकस्मात् मी बेशुद्ध होईन’, अशा संवेदना मला जाणवू लागल्या आणि आपोआपच माझा ‘परम पूज्य’ असा धावा चालू झाला. माझ्या हृदयाची धडधड वाढली. ‘शस्त्रकर्म थांबवा, मी बेशुद्ध होत आहे’, असे आधुनिक वैद्यांना (डॉक्टरांना) सांगावे’, असे मला वाटले; पण आधुनिक वैद्य आणि त्यांचे सहकारी घाबरतील. कदाचित् त्यांना ‘आपलेच काहीतरी चुकले कि काय ?’ असे वाटेल, किंवा ‘त्यांचा हात हलला, तर ऽऽ !’ या विचाराने मी शांत रहायचे ठरवले. ‘जे काही होईल, ते प.पू. डॉक्टर बघून घेतील’, असे म्हणून मी शांत राहिले.
आ. ‘काही क्षणात माझ्या संवेदना अतिशय वाढल्या आणि सगळे संपले’, असे मला वाटले; परंतु आश्चर्य म्हणजे हळूहळू माझ्या संवेदना थंडावत गेल्या आणि मी सामान्य स्थितीला आले. असे पहिल्यांदाच झाले. माझा ‘परम पूज्य’ असा धावा मात्र चालूच होता.
इ. अनुमाने ८ ते १० मिनिटांनी आधुनिक वैद्यांनी मला शस्त्रकर्म यशस्वी झाले असल्याने उठण्यास सांगितले. मीही अगदी सहजपणे उठून बसले. बाहेर येऊन कपडे पालटले.
ई. तोपर्यंत सहसाधिकेने आश्रमात संपर्क करून चालक साधकाला गाडी घेऊन रुग्णालयात येण्यास सांगितले. साधक येईपर्यंत मला पुन्हा एकदा बेशुद्धीच्या संवेदना जाणवू लागल्या; पण माझा ‘परम पूज्य’ असा धावा चालूच होता. काही वेळाने पुन्हा हळूहळू संवेदना मंदावल्या. त्यानंतर आश्रमात जातांना गाडीमध्ये पुन्हा एकदा वरील प्रक्रिया झाली; परंतु या तिन्ही वेळी मी बेशुद्ध झाले नाही.
उ. आश्रमात गेल्यावर सहसाधिकेच्या साहाय्याने एका संतांना मला होत असलेला त्रास आणि त्याची वैशिष्ट्ये सांगितली. त्यानंतर मी त्यांनी सांगितलेले नामजपाचे उपाय चालू केले.
ऊ. अनुमाने सव्वा घंट्याने डाव्या डोळ्यासह नुकतेच शस्त्रकर्म झालेला माझा उजवा डोळा त्यावर पट्टी (बँडेज) असूनही आतल्या आत आपोआपच उघडला आणि डोळ्यावरील पट्टीचे सूत (किंवा जे काही होते, ते) डोळ्यात टोचू लागले अन् तीव्र वेदना होऊ लागल्या. आधुनिक वैद्य शस्त्रकर्मकक्षात (ऑपरेशन थिएटर) असल्याने त्यांचा संपर्क होत नव्हता. त्यामुळे एक साधिका रुग्णालयात गेली; परंतु बराच वेळ होऊनही तिच्याकडूनही निरोप येत नव्हता आणि मला वेदनाही सहन होत नव्हत्या. त्यामुळे ‘हाही कदाचित् वाईट शक्तींचा त्रास असेल’, अशा विचाराने मी पुन्हा संतांना संपर्क करून सांगितले. त्यावर त्यांनी सांगितलेले नामजपाचे उपाय चालू केले आणि लगेचच रुग्णालयातून साधिकेचा निरोप आला की, आता उद्या सकाळी पट्टी काढेपर्यंत काही करू शकत नाही. त्यामुळे दोन्ही डोळे बंद करूनच रहा.
ए. मी नामजपाचे उपाय करत राहिले आणि संध्याकाळपासून आपोआप उघडझाप होणारा उजवा डोळा बंद झाला. हळूहळू वेदनाही उणावत गेल्या आणि रात्री १० पर्यंत पूर्णपणे थांबल्या.
३. बेशुद्ध होण्याच्या संवेदना जाणवणे
अ. २८.११.२०२२ या दिवशी दुपारी १२.३० वाजता पुन्हा मला बेशुद्ध होण्याच्या संवेदना जाणवल्या आणि २ – ३ मिनिटांत त्यांची तीव्रताही उणावली. माझे नामजपाचे उपाय चालूच होते. त्यानंतर पुन्हा १० मिनिटांनी वरील प्रक्रिया झाली; मात्र या वेळी मी शांत राहून ‘काय होते ?’, ते पहायचे ठरवले. त्यानंतर दिवसभर काही झाले नाही.
आ. २९.११.२०२२ या दिवशी मला अंतिम पडताळणीसाठी आधुनिक वैद्य सामंत यांच्या रुग्णालयात जायचे होते; म्हणून मी संतांना मला दुपारी होत असलेला त्रास सांगितला आणि दुसर्या दिवसासाठी नामजप विचारून घेतला आणि तो केला. त्यानंतर काही त्रास झाला नाही.
इ. ३.१२.२०२२ या दिवशी आम्ही कुडाळहून परत देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात येण्यासाठी कुडाळ रेल्वेस्थानकात आल्यानंतर काही वेळाने रेल्वे येत असल्याची उद्घोषणा झाली आणि मला बेशुद्धीच्या संवेदना जाणवू लागल्या. लगेच मी संतांना संपर्क केला. त्यांनी नामजप सांगितला आणि आश्रमात पोचेपर्यंत मी तो केला. त्यानंतर बेशुद्धीच्या संवेदना उणावल्या.
ई. एक मासानंतर मी पनवेलमध्ये उपनेत्रासाठी (चष्म्यासाठी) नेत्र चिकित्सालयात जायच्या आदल्या दिवशी संतांना नामजप विचारून घेतला आणि तो केला. तेथे माझ्या डोळ्यांची निर्विघ्नपणे पडताळणी झाली.
अशा प्रकारे सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप गुरुमाऊलीने मला सांभाळले. गुरुमाऊली आणि नामजप सांगणारे संत यांच्या कृपेने माझ्या डोळ्यांच्या शस्त्रकर्मातील सर्व त्रास आणि अडथळे दूर झाले. त्यांच्या आमच्यावरील या कृपेसाठी आम्ही त्यांच्या सुकोमल चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’
– श्रीगुरुचरणी शरणागत,
– श्रीमती कमलिनी कुंडले (वय ६४ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (जून २०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |