संपादकीय : मोदी सरकारला आतंकवाद्यांचे आव्हान !
९ जूनच्या सायंकाळी सवासात वाजता देहलीतील राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात ८ सहस्र मान्यवरांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीचा सोहळा चालू असतांना जम्मूमध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून आक्रमण करण्यात आले. वैष्णौदेवी तीर्थक्षेत्राकडे जाणार्या भाविकांच्या बसवर आतंकवाद्यांनी आक्रमण केले आणि यात ९ जण ठार, तर ३३ जण घायाळ झाले. ही घटना पंतप्रधान मोदी यांच्या नव्या सरकारला आतंकवाद्यांकडून मिळालेले आव्हान समजले जात आहे. काश्मीरमध्ये नव्हे, तर जम्मूमध्ये ही घटना घडल्याने याचे महत्त्व अधिक आहे, हे लक्षात घ्यायला हवे. अमरनाथ यात्रेवर आक्रमण होऊ नये; म्हणून सैन्य आणि सरकार, प्रशासन जीव तोडून प्रयत्न करत असते; मात्र आतंकवाद्यांनी वैष्णौदेवीच्या दर्शनासाठी जाणार्या भाविकांवर आक्रमण करून सरकारला आव्हान दिले. या आव्हानातून काश्मीरच नाही, तर जम्मूमध्येही त्यांचे अस्तित्व कायम आहे, हे आतंकवाद्यांनी दाखवून दिले, असेच म्हणावे लागत आहे.
घुसखोरी होतेच कशी ?
गेल्या १० वर्षांत मोदी सरकारने काश्मीरमधील आतंकवादावर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे केलेले दावे यातून पुन्हा फोल ठरले आहेत. ३४ वर्षांनंतरही आणि मोदी सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळातही काश्मीरमधील आतंकवाद संपुष्टात येऊ शकलेला नाही, उलट मोदी सरकारला थेट आव्हान देण्याची घटनाच त्यांनी घडवली, ही वस्तूस्थिती आहे. ‘जम्मू-काश्मीरमधील आतंकवाद पाकपुरस्कृत आहे’, हे शेंबड्या मुलालाही ठाऊक आहे. काश्मीरमधील आतंकवादाचे मूळ पाकिस्तान आहे. ते जोपर्यंत तोडले जात नाही, तोपर्यंत हा आतंकवाद नष्ट होणार नाही, हे उघड असतांना त्या दिशेने कार्य करणे अपेक्षित असतांना ते झाले आहे, असे कुठेच दिसत नाही. पूर्वी काश्मीरमधून मुसलमान तरुण पाकिस्तानमध्ये जाऊन आतंकवादी कारवायांचे प्रशिक्षण घेऊन काश्मीरमध्ये कारवाया करत होते. आता तो भाग अल्प झाल्याचा दावा सरकार करत आहे. याचा अर्थ काश्मीरमधून मुसलमान तरुण पाकमध्ये सहज जाऊ शकत होते आणि पुन्हा येऊन कारवाया करू शकत होते, हे स्पष्ट होते. आता विदेशी आतंकवादी; म्हणजे पाकिस्तानी आतंकवादी काश्मीरमध्ये येतात आणि कारवाया करतात. याचा अर्थ अद्यापही पाकमधून आतंकवादी भारतात घुसखोरी करत आहेत, हे लक्षात येते. काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी कालच माहिती दिली की, ‘७० ते ८० आतंकवादी काश्मीरमध्ये घुसले आहेत.’ ही माहिती त्यांनी देणे, हे त्यांच्यासाठी आणि सीमेवर तैनात सुरक्षादलांसाठी लज्जास्पदच म्हणावे लागेल. इतक्या वर्षांनंतरही काश्मीरमध्ये पाकिस्तानमधून आतंकवादी घुसखोरी करू शकत आहेत. एरव्हीही पोलिसांकडून काश्मीरमध्ये अमुक आतंकवादी घुसले आहेत किंवा घुसण्याच्या स्थितीत आहेत, अशी माहिती दिली जाते. असे असतांना भारतीय सैन्य ते घुसण्यापूर्वीच त्यांच्यावर कारवाई करत नाही किंवा सरकार त्यांना कारवाई करण्याचा आदेश देत नाही, असे आहे का ? तसे असेल, तर ते आकलनाच्या पलीकडे आहे.
‘नवा भारत’ आता काय करणार ?
पाकमधून जे आतंकवादी भारतात घुसतात, त्यांना पाकमध्ये प्रशिक्षण दिले जाते. अशी अनेक प्रशिक्षण स्थळे तेथे कार्यरत आहेत. ती नष्ट करण्याची मागणी भारत सातत्याने आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर करत असतो; मात्र पाकवर त्याचा काही परिणाम होत नाही आणि आंतरराष्ट्रीय समुदाय या मागणीकडे दुर्लक्षच करतो, हेच आतापर्यंत दिसून आले आहे. त्यामुळे अशा गोष्टींत वेळ घालण्यापेक्षा भारतानेच इस्रायलकडून आदर्श घेऊन आतापर्यंत कारवाई करायला हवी होती. आताही झालेल्या आक्रमणानंतर काही कारवाई होईल, अशी शक्यता नाही; कारण शपथविधीच्या कार्यक्रमात, खाते वाटपाच्या बातम्यांमध्ये सर्व देशच मग्न आहे. या घटनेकडे विशेष कुणी लक्ष देतांना दिसत नाही. सरकारकडून या घटनेनंतर पाकवर कारवाई करण्याविषयी विधान करण्यात आलेले नाही, हे लक्षात घ्यायला हवे. ‘नवा भारत घरात घुसून मारतो’, असे सरकारकडून सांगितले जात आहे; मात्र आतातर आतंकवाद्यांनी घुसून हिंदूंना मारले आहे, ही वस्तूस्थिती आहे. ‘हिंदु भाविकांची हत्या जिहादी आतंकवादी करतात आणि सारे काही शांत आहे’, असेच चित्र आहे, हे चांगले लक्षण नाहीच. यावर विचार करण्याची आवश्यकता आहे. जर खरेच काश्मीरला आतंकवादमुक्त राज्य करून तेथे हिंदूंने पुनर्वसन करायचे असेल, तर कठोर कारवाई करावीच लागणार आहे. विकासाचे सूत्र वेगळे आहे आणि केवळ हिंदूंचे नव्हे, तर भारतीय जनतेचे रक्षण करणे, त्यांना भयमुक्त करणे, त्यांच्या धार्मिक स्थळांचे रक्षण करणे, हे वेगळे सूत्र आहे. हे लक्षात ठेवायला हवे.
क्रिकेटप्रेमी मौन !
अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथे चालू असलेल्या ‘टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धे’तील ९ जूनला ज्या वेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना चालू होता, तेव्हाच जिहादी आतंकवाद्यांनी हिंदु भाविकांवर आक्रमण केले. भारताने क्रिकेटचा सामना जिंकला असला, तरी पाकिस्तानी आतंकवादी गेली अनेक वर्षे हिंदूंना ठार करून जिंकत आहेत. भारत या युद्धात जिंकलेला नाही, ही वस्तूस्थिती आहे. क्रिकेटच्या सामन्यात पाकला पराभूत करण्यात आनंद मानणारे, फटाके फोडणारे भारतीय आणि हिंदू याकडे लक्ष देत नाहीत, हे त्यांच्यासाठी लज्जास्पद आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही, असेच म्हणावे लागते. आताही क्रिकेट सामन्यांवर चर्चा होत आहे; मात्र हिंदु भाविकांच्या मृत्यूवर क्रिकेटप्रेमी मौन आहेत. हे मौन त्यांना एक दिवस बुडवणार, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे. सुरक्षादल आणि पोलीस हिंदु भाविकांना ठार करणार्या आतंकवाद्यांचा शोध घेतील अन् त्यांना ठारही करतील; मात्र मूळ समस्या तशीच रहाणार, हेही तितकेच सत्य आहे. जोपर्यंत मूळ समस्या म्हणजे पाकिस्तानचा नायनाट केला जात नाही, ती करण्याची इच्छाशक्ती दाखवली जात नाही, तोपर्यंत काश्मीरच नव्हे, तर संपूर्ण भारताला सातत्याने जिहादी आतंकवादी आक्रमणाच्या सावटाखाली रहावे लागणार आहे. हिंदूंच्या नशिबी सध्यातरी हेच आहे.
काश्मीरच नव्हे, तर संपूर्ण भारत आतंकवादमुक्त करण्यासाठी पाकचा नायनाट करण्याची इच्छाशक्ती सरकारने दाखवावी ! |