भाजपचे नेते समरजित घाटगे यांच्या पत्नीची बनावट ‘कस्टम’अधिकार्‍याकडून २० लाख रुपयांची फसवणूक !

भाजपचे नेते समरजित घाटगे आणि त्यांच्या पत्नी सौ. नवोदिता घाटगे

कोल्हापूर – बनावट कस्टम (सीमा शुल्क) अधिकारी आणि केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचे अधिकारी यांनी भाजपचे नेते समरजित घाटगे यांच्या पत्नी सौ. नवोदिता घाटगे यांची २० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या संदर्भात सौ. नवोदिता घाटगे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात ३ संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे.

२ जून या दिवशी सौ. नवोदिता घाटगे यांच्या भ्रमणभाषवर एक संपर्क आला. भ्रमणभाषवर बोलणार्‍या या व्यक्तीने ‘कस्टम अधिकारी बोलत आहे’, असे सांगून सौ. घाटगे यांनी मलेशियात पाठवलेल्या काही वस्तूंमध्ये अमली पदार्थ, तुमच्या नावाचे बनावट पारपत्र आणि ‘ए.टी.एम्. कार्ड’ आहे. हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. तरी तुमच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगितले. यानंतर आणखी एका व्यक्तीने अन्य क्रमांकावरून संपर्क करून केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचा अधिकारी बोलत असून ‘तुम्ही केलेला गुन्हा गंभीर असून तो नोंद करायचा नसेल, तर पैसे द्यावे लागतील’, अशी धमकी दिली. यानंतर या दोन्ही खोट्या अधिकार्‍यांनी बळजोरीने २० लाख रुपये ‘ऑनलाईन’ वर्ग करण्यास भाग पाडले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सौ. घाटगे यांनी ३ संशयितांच्या विरोधात तक्रार दिली. (ऑनलाईन फसवणुकीचे अनेक गंभीर गुन्हे घडत असतांना त्याविरुद्ध ठोस उपाययोजना अद्याप का काढण्यात आली नाही ? – संपादक)