यापुढे शाळांमध्ये आठवड्यातील ३ दिवस असणार ‘स्काऊट-गाईड’चा गणवेश !
मुंबई, १० जून (वार्ता.) – येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातील मंगळवार, गुरुवार आणि शनिवार हे ३ दिवस स्काऊट-गाईडचा गणवेश घालावा लागणार आहे. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या अन्य दिवशी विद्यार्थ्यांना शाळेचा नियमित गणवेश घालता येणार आहे. हे दोन्ही गणवेश राज्यशासनाकडून विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
इयत्ता १ ली ते ५ वीच्या विद्यार्थिनींसाठी स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांसाठी गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑफ फ्रॉक असा गणवेश असणार आहे, तर आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट असा नियमितचा गणवेश असणार आहे. इयत्ता ६ ते ८ वीच्या मुलींसाठी गडद आकाशी निळ्या रंगाची कमीज, सलवार आणि ओढणी असा स्काऊट-गाईडचा गणवेश असणार आहे, तर नियमितचा गणवेश आकाशी निळ्या रंगाची कमीज, निळ्या गडद रंगाची सलवार आणि ओढणी असणार आहे. इयत्ता १ ली ते ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट हा नियमितचा गणवेश आणि स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट अन् गडद निळ्या रंगाची हाफ पँट हा स्काऊट-गाईडचा गणवेश असणार आहे. इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठीही याच रंगाचा गणवेश असणार आहे; मात्र त्यांच्यासाठी फुल पँट असणार आहे.