पुणे शहरातील विज्ञापन फलकांचे आकाशचिन्ह विभागाने केलेल्या अन्वेषणावर संशय !
पुणे – शहरांमध्ये किती विज्ञापन फलक (होर्डिंग) नियमानुसार आणि किती नियमबाह्य आहेत ? याचे अन्वेषण महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी महापालिकेतील स्वतंत्र यंत्रणेकडून करून घेतले. या यंत्रणेने शहरातील नियमबाह्य विज्ञापन फलकांची छायाचित्रे काढली. ती छायाचित्रे अतिरिक्त आयुक्त, क्षेत्रीय अधिकारी आणि आकाशचिन्ह निरीक्षक यांना दाखवली. काही दिवसांपूर्वी आकाशचिन्ह विभागाने केलेले अन्वेषण आणि सध्याचे अन्वेषण यामध्ये फरक दिसून आला आहे. त्यामुळे आकाशचिन्ह विभागाने केलेल्या अन्वेषणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहरांमध्ये अनेक अधिकृत विज्ञापन फलक नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात आले आहेत. काही ठिकाणी केवळ एकाच बाजूची अनुमती असतांना दोन्ही बाजूंना विज्ञापन केले आहे. काही ठिकाणी विज्ञापन फलकांची उंची अधिक आहे, तर काही ठिकाणी एकाच इमारतीवर अनेक विज्ञापन फलक लावले आहेत. काही ठिकाणी विज्ञापन फलकाचा लोखंडी सांगाडा धोकादायक स्थितीत आहे. विज्ञापन फलकांविषयी सरकारने वर्ष २०२२ मध्ये नियमावली प्रसिद्ध केली आहे; परंतु शहरामध्ये त्यानुसार दिसत नाही. नियमबाह्य विज्ञापन फलकांकडे कुणाचे आणि कसे दुर्लक्ष झाले ? त्याविरोधात कारवाई का करण्यात आली नाही ? याचा खुलासा सादर करण्याचे आदेशही देण्यात आले. अधिकार्यांनी कारवाई न केल्यास थेट सेवेतून निलंबित करण्यात येईल, अशी चेतावणी आयुक्तांनी दिली.